२७ नोव्हेंबर २०२०
सामान्य काळातील चौतिसाव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने

“…देवाचे राज्य जवळ आले आहे, हे जाणून घ्या.” लूक 21:31b
‘हे आमच्या पित्या’ ही प्रार्थना प्रत्येक वेळी म्हणताना आपण हीच विनंती करतो. ‘तुझे राज्य येवो,’ असे आपण प्रार्थनेत म्हणतो. पण हे म्हणताना तुम्ही खरोखर मनापासून ही विनंती करता का?
शुभवर्तमानाच्या या उताऱ्यात येशू सांगतो की देवाचे राज्य जवळ आले आहे. ते जवळ आहे, तरीही अनेकदा ते फार दूर असते. ते दोन अर्थांनी जवळ आहे. पहिला अर्थ असा की, येशू आपल्या संपूर्ण तेजाने आणि गौरवाने पुन्हा येईल आणि सर्व काही नवे करील. अशा रीतीने त्याचे चिरंतन राज्य प्रस्थापित होईल.
दुसरा अर्थ असा की, त्याचे राज्य इतके जवळ आहे की आपण केवळ प्रार्थना केली तरी ते आपल्यात येऊ शकते. आपण येशूला आपल्या अंतःकरणात येऊ दिले, तर तिथे आपले राज्य प्रस्थापित करण्याची त्याला उत्कट इच्छा आहे. पण दुर्दैवाने, आपण अनेकदा त्याला आत येऊ देत नाही. आपण अनेकदा त्याला दूर ठेवतो; त्याच्या पवित्र आणि परिपूर्ण इच्छेला स्वतःला पूर्णपणे सोपवावे की नाही, याबद्दल आपल्या मनात आणि अंतःकरणात द्विधा असतो. त्याचा पूर्णपणे स्वीकार करायला आणि त्याचे राज्य आपल्यामध्ये प्रस्थापित होऊ द्यायला आपण कितीतरी वेळा कचरतो.
त्याचे राज्य किती जवळ आहे, याची तुम्हाला जाणीव आहे का? त्यासाठी केवळ एक प्रार्थना आणि तुमचा स्वतःचा निर्णय पुरेसा आहे, हे तुम्हाला उमगते का? आपण येशूला येऊ दिले, तर तो आपल्याकडे येऊन आपल्या जीवनाची सूत्रे हाती घेऊ शकतो. तो सर्वशक्तिमान राजा आहे; तो आपल्याला नवी सृष्टी बनवू शकतो. तो आपल्या आत्म्यात परिपूर्ण शांती आणि सुसंवाद आणू शकतो. तो आपल्या अंतःकरणात महान आणि सुंदर गोष्टी घडवू शकतो. आपण फक्त त्याला मनापासून ‘ये’ असे म्हणायचे, आणि तो येईल.
आज यावर चिंतन करा: येशूला तुमच्याकडे येऊन तुमच्या जीवनात आपले राज्य प्रस्थापित करण्याची मनापासून इच्छा आहे. तुमचा अधिपती आणि राजा व्हावे आणि तुमच्या आत्म्यावर परिपूर्ण सुसंवादाने आणि प्रेमाने राज्य करावे, अशी त्याला उत्कट इच्छा आहे. त्याला तुमच्याकडे येऊ द्या आणि तुमच्यामध्ये त्याचे राज्य प्रस्थापित करू द्या.
हे प्रभू, तू ये आणि माझ्या आत्म्याचा ताबा घे, असे आमंत्रण मी तुला देतो. माझा प्रभू आणि माझा देव म्हणून मी तुझी निवड करतो. माझ्या जीवनावरचा स्वतःचा ताबा मी सोडतो आणि माझा देव व दैवी राजा म्हणून स्वेच्छेने तुझी निवड करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आगमनकाळासाठीचे आमचे साहित्य पाहा!
वरील मुख्य चित्र: हागिया सोफियातील येशूचे मोझेक चित्र




