मराठी

येशूला आर्त हाक

२७ मे २०२१
सामान्य काळातील आठव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

कँटरबरीचे संत ऑगस्टीन, बिशप — ऐच्छिक स्मरण

व्हिडिओ

येशू आपल्या शिष्यांसह आणि मोठ्या लोकसमुदायासह यरीहोतून निघत होता. तेव्हा तिमयाचा मुलगा बार्तिमय हा एक आंधळा मनुष्य रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. तो नाझरेथचा येशू आहे, हे ऐकताच तो मोठ्याने हाक मारू लागला, “हे येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर.” मार्क 10:46–47

तुम्ही प्रार्थना कशी करता? तुम्ही कधी दृढ विश्वासाने आणि कळकळीने येशूला ‘आर्त हाक’ मारता का? प्रभूला कशी प्रार्थना करावी, याचा सुंदर आदर्श बार्तिमय हा आंधळा मनुष्य आपल्यासमोर ठेवतो. सर्वप्रथम, त्याला मदतीची गरज होती. त्याचे आंधळेपण हे तुमच्या जीवनातील प्रत्येक दुर्बलतेचे आणि गरजेचे प्रतीक आहे. मग जीवनात तुम्हाला सर्वांत जास्त झगडावे लागते ते कशाशी? सवयीने वारंवार घडणारे तुमचे सर्वांत मोठे पाप कोणते? किंवा कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला सर्वांत जास्त दुःख होते?

आपली दुर्बलता ओळखणे ही पहिली पायरी आहे. आपल्या सर्वांत मोठ्या गरजा लक्षात आल्या की, बार्तिमयाप्रमाणे आपणही आपल्या प्रभूला ‘आर्त हाक’ मारली पाहिजे. तो येशू आहे हे ऐकताच, येशू आपल्याला बरे करू इच्छितो, असे बार्तिमयाला कसे कोण जाणे, पण अंतरात्म्यात जाणवले. त्याला हे कसे जाणवले? त्याने आपल्या अंतर्यामी देवाचा आवाज ऐकला. होय, येशू जवळून जात असताना त्याच्याविषयी बोलणाऱ्या अनेक लोकांचा गजबजाट बार्तिमयाने ऐकला. पण केवळ त्या गजबजाटामुळे त्याला हाक मारण्याची प्रेरणा मिळाली नसती, किंवा आपल्याला ज्या दयेची गरज आहे ती येशूकडूनच मिळेल, हेही त्याला उमगले नसते. त्याला हाक मारण्यास प्रवृत्त केले ते त्याच्या अंतरात्म्यात स्पष्टपणे ऐकू आलेल्या देवाच्या आवाजाने. ती पवित्र आत्म्याची प्रेरणा होती. तिच्यामुळे त्याला उमगले की आपल्याला येशूची गरज आहे आणि येशू आपल्याला बरे करू इच्छितो.

सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनी बार्तिमयाला दटावले आणि गप्प बसायला सांगितले. त्याचा विश्वास दुबळा असता, तर कदाचित त्याने लोकांचे ऐकले असते आणि निराश होऊन तो गप्प बसला असता. पण त्याने लोकांच्या दटावणीकडे केवळ दुर्लक्षच केले नाही, तर तो ‘आणखी मोठ्याने हाक मारत राहिला,’ हे अगदी स्पष्ट आहे.

आपल्या प्रभूकडे कसे वळावे, याची साक्ष बार्तिमय आपल्याला दोन प्रकारे देतो. पहिले म्हणजे, आपल्या अंतरात्म्यात प्रभूची सौम्य, पण स्पष्टपणे जाणवणारी उपस्थिती आपण ओळखली पाहिजे. त्याचा आवाज आणि त्याच्या कृपेतून मिळणाऱ्या प्रेरणा आपण ओळखल्या पाहिजेत. त्याला आपल्याला बरे करायचे आहे, आणि आपल्या जीवनात त्याची उपस्थिती आपल्याला अंतःकरणात जाणवली पाहिजे. दुसरे म्हणजे, त्या आतल्या आवाजावर आपण आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. बार्तिमयाला दटावणारा जमाव हा आपल्या जीवनात आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक ‘आवाजांचे’ आणि मोहांचे प्रतीक आहे. आपल्याशी बोलणाऱ्या देवाला आपण विश्वासाने आणि कळकळीने हाक मारू नये, म्हणून ते आपल्याला अडवू पाहतात. आपली गरज घेऊन येशूला मनापासून हाक मारण्याच्या आपल्या निर्धारापासून कोणत्याही गोष्टीने आपल्याला विचलित करू नये.

आज बार्तिमयाच्या ठायी स्वतःला पाहा आणि त्यावर चिंतन करा. आपल्याला प्रभूची किती निकड आहे हे ओळखा आणि त्याचा स्पष्ट आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येतो का? तो जवळून जात आहे, असे तुम्हाला जाणवते का? असे जाणवेल तेव्हा त्याला कळकळीने, आर्ततेने आणि दृढ विश्वासाने हाक मारा. तुमची प्रार्थना आणि विश्वास दडपून टाकणारे मोह जाणवले, तर ‘आणखी’ कळकळीने आपल्या प्रभूला हाक मारा. तो तुमची हाक ऐकेल, तुम्हाला आपल्याजवळ बोलावेल आणि जी कृपा तो तुम्हाला देऊ इच्छितो, ती देईल.

हे माझ्या दयाळू येशू, तू सतत माझ्या जवळून जातोस आणि तुझ्या दैवी उपस्थितीने मला स्वतःकडे आकर्षित करतोस. माझी गरज ओळखण्यासाठी आणि तुला पूर्ण अंतःकरणाने हाक मारण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. हे प्रिय प्रभू, या कळकळीच्या प्रार्थनेपासून मी कधीही दूर जाऊ नये आणि मोह येईल तेव्हा मी तुला आणखी कळकळीने हाक मारावी. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – कँटरबरीचे संत ऑगस्टीन, बिशप

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वर दिलेले चित्र: आंधळ्या बार्तिमयाला बरे करणे — चित्रकार: फेर्नांदो गायेगो, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने


कॅथलिक दैनिक चिंतन
सामान्य काळ: 24 मे–31 ऑगस्ट

खालील विक्रेत्यांकडे ई-पुस्तक & पेपरबॅक स्वरूपात उपलब्ध:

अ‍ॅमेझॉन पेपरबॅक – किंडल – गूगल प्ले बुक्स – आयबुक्स – बार्न्स & नोबल