मराठी

देवाच्या राज्याची अद्भुते

13 जून 2021
सामान्य काळातील अकरावा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

व्हिडिओ

येशू लोकसमुदायाला म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे: जणू एखाद्या माणसाने जमिनीत बी पेरले. रात्रंदिवस तो झोपतो आणि उठतो; दरम्यान ते बी अंकुरते आणि वाढते, पण हे कसे घडते ते त्याला कळत नाही.” मार्क 4:26–27

आपल्यामध्ये देवाचे राज्य कसे अंकुरते, वाढते आणि फळ देते, याचे हे किती सुंदर चित्र आहे!

आपले राज्य यावे, अशी देवाची इच्छा आहे. ‘हे आमच्या पित्या’ या प्रार्थनेत आपण ही विनंती करतो. देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना आपण करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? पहिले म्हणजे, देवाला आपल्यामध्ये येऊन वास करायचा आहे आणि आपल्या हृदयात व आत्म्यात आपले राज्य प्रस्थापित करायचे आहे. आपण त्याच्या राज्याचे जिवंत सदस्य झाले पाहिजे आणि तो आपला अधिपती व मार्गदर्शक असला पाहिजे.

दुसरे म्हणजे, देवाचे नियम आपल्या जगात प्रस्थापित व्हावेत आणि त्याची इच्छा येथे पूर्ण व्हावी, असा याचा अर्थ आपण घेतो. यासाठी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे देवाच्या कृपेने परिवर्तन झाले पाहिजे, जेणेकरून ती त्याच्या राज्यात सहभागी होईल आणि त्या राज्याचे फळ देईल. यात आपल्यालाही काम करायचे आहे!

तिसरे म्हणजे, येशू तेजाने आणि वैभवाने परत येईल, तेव्हा त्याचे राज्य अंतिमतः वैभवाने प्रकट होईल, याची आपण वाट पाहतो. शेवटी सर्व गोष्टींचे परिवर्तन होईल आणि देव जगाचा अंतिम न्याय करील व सर्व काही नवे करील.

पण वरचा उतारा विशेषतः हे ‘कसे’ घडेल ते आपल्याला उलगडून दाखवतो. देवाचे राज्य हळूहळू, अलगद आणि चमत्कारिक रीतीने रुजेल, हे त्यातून दिसते. ते आपल्या जीवनात रुजेल; आपण ख्रिस्ती या कार्याला स्वतःला वाहून घेत असताना ते आपल्या जगातही रुजेल; आणि काळाच्या शेवटी येशू परत येईल, तेव्हा हे चमत्कारिक रीतीने घडेल.

येशूने आपल्यासमोर ठेवलेल्या या चित्राचा विचार करा. शेतकरी बी पेरतो. ते हळूहळू अंकुरते, वाढते आणि फळ देते. हे सगळे ‘कसे घडते ते त्याला कळत नाही.’

देव कोणकोणत्या गूढ मार्गांनी आपले राज्य प्रस्थापित करतो, यावर आज चिंतन करा. या कार्याची धुरा सर्वप्रथम त्याच्याच हाती आहे. पण तुम्हीही तुमच्या वाट्याचे काम केले पाहिजे. तुमचे हृदय आणि तुमच्या सभोवतालचे जग सुपीक जमीन बनले पाहिजे. बी पेरा, गरजेप्रमाणे त्याला पाणी द्या आणि मग देवाला त्याचे कार्य करू द्या. तुमच्या जीवनात आणि जगात आपले राज्य बहरावे, अशी देवाची इच्छा आपल्यापैकी कोणाच्याही इच्छेपेक्षा कितीतरी अधिक प्रबळ आहे. तुम्ही तुमच्या वाट्याचे काम केले, तर त्याच्या कृपेचे हे वैभवशाली कार्य बहरताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हे प्रभू, माझे हृदय तुझ्या राज्यासाठी सुपीक जमीन बनावे म्हणून मला मदत कर. माझ्या हृदयात तुझे राज्य वाढवण्याचे कार्य तुला करू द्यायला आणि आपल्या जगात त्या राज्याचे साधन व्हायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – पादुआचे संत अंतोनी, धर्मगुरू आणि चर्चचे धर्मविद्यापंडित
यंदा हा दिवस रविवारी येत असल्यामुळे उपासनेत त्यांचे स्मरण साजरे केले जात नाही

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य चित्र: फ्लिकर