मराठी

‘अशक्य’ वाटणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाताना?

25 जुलै 2021
सामान्य काळातील सतरावा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

व्हिडिओ

“इथे एक मुलगा आहे. त्याच्याकडे जवाच्या पाच भाकऱ्या आणि दोन मासे आहेत; पण इतक्या लोकांना त्यांचा काय उपयोग?” येशू म्हणाला, “लोकांना जेवायला बसवा.” योहान 6:9–10a

तुम्हाला कधी ‘अशक्य’ वाटणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे का? येशूलाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले. पण त्याने दाखवून दिले की, त्याची इच्छा असेल तर तो अशक्य वाटणाऱ्याही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो. तो देव आहे, हे खरे; पण त्याची इच्छा असेल ते सर्व तो करू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या जीवनातही तो असे करू शकतो!

केवळ पाच भाकऱ्या आणि दोन मासे यांनी हजारो लोकांना जेवू घालणे आपल्याला शक्य आहे, असा येशूला असलेला आत्मविश्वास वरील उताऱ्यातून दिसून येतो. मानवी दृष्टीने हे अशक्य आहे; पण देवासाठी ते सहज शक्य आहे.

येशूचा हा चमत्कार दाखवतो की, सर्व प्रकारे ‘आपले पोषण करण्यास’ तो कटिबद्ध आहे. होय, त्या प्रसंगी त्याने लोकांना अन्न दिले; पण हे एक चिन्हही आहे: जीवनात कोणतेही संकट किंवा आव्हान आले, तरी त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्या आत्म्यांचे आपल्या कृपेने पोषण करणे त्याला शक्य आहे आणि तसे करण्याची त्याची इच्छाही आहे. त्याची कृपा आपल्याला पुरेशी आहे!

अनेकदा अडचण दोन प्रकारची असते. पहिली अशी की, जीवनात एखादे आव्हान आपल्यासमोर उभे राहते आणि त्यावर मात कशी करावी, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण निराश होऊ शकतो आणि आपला भ्रमनिरास होऊ शकतो. पण असे घडते तेव्हा आपण यासारख्या चमत्कारांवर चिंतन केले पाहिजे आणि देवाला सर्व काही शक्य आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आपल्यासमोर अनेकदा येणारी दुसरी अडचण म्हणजे देवाची इच्छा आणि आपल्या स्वतःच्या मर्यादित कल्पना यांच्यातला फरक ओळखणे. बऱ्याचदा काय चांगले आणि योग्य आहे हे आपणच आपल्या कल्पनेने ठरवतो आणि तसे घडावे म्हणून प्रार्थना करू लागतो. पण देवाच्या मनात काहीतरी अगदी वेगळे असेल आणि त्याची इच्छा अर्थातच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी महान असेल, तर? आपल्या कल्पनेतही येऊ शकली नसती अशी एखादी योजना देवाकडे असेल, तर? खरे तर, आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही, इतकी अधिक परिपूर्ण योजना देवाकडे आपल्या जीवनासाठी आहे. आपल्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे त्याला माहीत आहे आणि ती योजना तो पूर्णत्वास नेऊ शकतो. आपल्या परीने आपण ती योजना शोधली पाहिजे, तिला स्वतःला समर्पित केले पाहिजे आणि त्याच्या परिपूर्ण प्रेमावर, दयेवर व सामर्थ्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे.

आज आपल्या भविष्याचा विचार करा. तुम्हाला सर्वांत जास्त काळजी कशाची वाटते? कोणत्या गोष्टीने तुमचे मन चिंतेने भरून जाते? त्या परिस्थितीसाठी देवाची एक परिपूर्ण योजना आहे. ती योजना शोधणे आणि ती पूर्णत्वास जाईल असा विश्वास ठेवणे, हे तुमचे काम आहे.

हे प्रभू, तुला सर्व काही शक्य आहे आणि सर्व गोष्टींत जे कल्याणकारक आहे तेच घडावे, अशी तुझी इच्छा आहे, हे मला माहीत आहे. तुझ्याकडे वळण्यास आणि तुझ्या परिपूर्ण दैवी इच्छेला स्वतःला समर्पित करण्यास मला मदत कर. मी असा समर्पित होत असताना, तू तुझी इच्छा पूर्णत्वास नेशील, असा पूर्ण विश्वास ठेवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – प्रेषित संत याकोब
हा दिवस यंदा रविवारी येत असल्याने त्यांचे स्मरण उपासनाविधीत साजरे केले जात नाही

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वर दिलेले छायाचित्र: रॉबर्ट शेइब यांचे; स्रोत: पिक्साबे