28 एप्रिल 2022
पुनरुत्थानकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील गुरुवार
आजची वाचने
संत पीटर शनेल, धर्मगुरू व रक्तसाक्षी—ऐच्छिक स्मृतिदिन
संत लुई ग्रिन्यों द मॉंफोर, याजक — ऐच्छिक स्मृतिदिन

तो पवित्र आत्म्याचे दान मोजूनमापून देत नाही. योहान 3:34
युद्धकाळात सैनिकांकडे अन्नाचा साठा कमी असतो, तेव्हा त्यांना तो पुरवून वापरावा लागतो. तो शक्य तितके दिवस टिकावा म्हणून ते दररोज मोजून थोडेच अन्न खातात. तसे केले नाही, तर अन्न संपून त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते.
देव आणि त्याची कृपा यांच्या बाबतीतही असेच असते तर? पवित्र आत्मा आपल्याला असे म्हणाला तर, “पाहा, आता मी तुम्हाला थोडीच मदत करणार आहे. मी देत असलेली कृपा वापरून संपवलीत की मग तुम्हाला स्वतःच सगळे सांभाळावे लागेल.” अरेरे! किती अडचणीचे झाले असते!
पण आनंदाची बातमी ही आहे की देव आपल्याशी याच्या अगदी उलट वागतो. तो पवित्र आत्म्याचा भरभरून वर्षाव करण्यास कटिबद्ध आहे आणि आपल्याला कधीही लागेल किंवा हवी असेल तितकी कृपा तो देऊ करतो. अडचण अशी आहे की तरीही आपण अनेकदा त्याची कृपा ‘मोजूनमापून’च स्वीकारतो. देवाच्या सामर्थ्याला मर्यादा आहेत असे आपल्याला वाटते म्हणून आपण असे करत नाही. उलट, देवाने आपल्या जीवनात त्याचे सर्वशक्तिमान सामर्थ्य पूर्णपणे प्रकट करावे, याचीच आपल्याला अनेकदा भीती वाटते.
आज यावर चिंतन करा: देवाला तुमच्या जीवनात त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू दिले, तर तुमचे जीवन कसे असेल? काय बदलेल? तुमचे दैनंदिन जीवन, तुमची नाती, तुमचे बोलणे, तुमच्या कृती आणि तुमचे भविष्य कसे वेगळे असेल? सर्व बाबतींत देवाची इच्छा पूर्णपणे स्वीकारणे योग्य आहे, हे आपल्याला बुद्धीने पटते. पण प्रत्यक्षात तसे करण्याची वेळ येते, तेव्हा अनेकदा आपण फार कचरतो. पुढे काय होईल हे माहीत नसल्याची भीती त्यामागे असू शकते. किंवा मनापासून बदलण्याची आपली तयारी नसेल. कारण काहीही असो, पवित्र आत्म्याचा भरभरून वर्षाव करून देव तुम्हाला अमर्याद कृपा देऊ करीत आहे. ती मोजूनमापून स्वीकारायची की नाही, हे तुमच्या हाती आहे.
हे उदार प्रभू, माझ्या जीवनात तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडू द्यावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला तुझ्या कृपेत पूर्णपणे बुडून जायचे आहे. त्यातून पुढे काहीही घडले तरी तुला ‘हो’ म्हणायला मला मदत कर. तू मला जो गौरवशाली ‘हो’ उच्चारायला बोलावत आहेस, त्या ‘हो’वर विश्वास ठेवायलाही मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत पीटर शनेल, धर्मगुरू आणि रक्तसाक्षी
संत लुई ग्रिन्यों द मॉंफोर, याजक




