२० मे २०२२
पुनरुत्थानकाळातील पाचव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने
सिएनाचे संत बर्नार्दिन, धर्मगुरू — ऐच्छिक स्मृतिदिन

“तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्ही जाऊन टिकणारे फळ द्यावे म्हणून तुम्हाला नेमले.” योहान 15:16
मुलांना खेळ खेळायला फार आवडते. दोन संघांमध्ये खेळ ठरला की, आपली निवड होण्याची वाट पाहत मुले बहुतेकदा रांगेत उभी राहतात. आपली निवड सर्वांत आधी व्हावी, अशी प्रत्येक मुलाची आशा असते. संघात आपल्याला घ्यायला ते उत्सुक आहेत, हे जाणवल्याने मुलांना आपले महत्त्व कळते. पण एखाद्या मुलाची निवड सर्वांत शेवटी झाली, तर ते त्याला जड जाऊ शकते आणि त्याचे मन दुखू शकते.
यातून आपल्या प्रत्येकाच्या मनातली एक इच्छा दिसून येते: आपण कुणातरी गटाचा भाग असावे आणि कुणालातरी आपण हवे असावे. आनंदाची बातमी अशी की, देव आपल्या प्रत्येकाची खरोखरच निवड करतो. आपण त्याच्या कुटुंबाचा भाग व्हावे आणि त्याचेच होऊन राहावे, अशी त्याची इच्छा आहे. हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे; आणि ते उमगले की, आपण देवाला किती मोलाचे आहोत याची जाणीव होते.
आपला जन्म होण्याआधीच देवाने आपल्याला निवडले, या सत्यावर नियमितपणे चिंतन करणे ही एक चांगली आध्यात्मिक साधना आहे. तो आपल्याला अनादिकाळापासून ओळखत होता. त्याची नजर आपल्यावर होती आणि आपल्याला आपल्या कळपात सामावून घेण्याची त्याला उत्कंठा होती. हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे, स्वीकारले पाहिजे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण खरोखरच देवाचे आहोत.
देव आपल्याला केवळ त्याचे होण्यासाठी निवडत नाही, तर त्याचे कार्य करण्यासाठीही निवडतो. आपण जावे आणि त्याच्या राज्यासाठी फळ द्यावे, यासाठी त्याला आपल्याद्वारे कार्य करायचे आहे. एका पवित्र हेतूसाठी त्याला आपल्याद्वारे कार्य करायचे आहे, आणि त्यासाठीच तो आपल्याला बोलावतो. त्याच्या “संघाचे” सदस्य असणे म्हणजे आपल्या जीवनाला उद्देश आणि अर्थ असणे. काही वेळा आपल्याला वाटते की, काही बदल घडवून आणण्यास आपण “पात्र” नाही. पण आपल्याला तसे कितीही वाटले, तरी देव आपल्याकडे त्या नजरेने पाहत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. उलट, आपल्या प्रत्येकामधील अमर्याद क्षमता तो पाहतो आणि आपल्या राज्याच्या उभारणीसाठी त्या क्षमतेचा उपयोग करण्याचे ठरवतो.
आज या दोन छोट्या वाक्यांवर चिंतन करा: “मी तुम्हाला निवडले आहे” आणि “जा आणि फळ द्या.” देवाचे बोलावणे स्वीकारल्याने तुमचे जीवन बदलेल आणि ज्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला बोलावले आहे, त्यांचेही जीवन बदलेल.
हे माझा प्रेमाने स्वीकार करणाऱ्या प्रभू, तू मला निवडले आहेस, हे मला माहीत आहे. माझ्या जीवनात तू दिलेले पाचारण मी स्वीकारतो. तुझे कार्य एका आगळ्यावेगळ्या आणि गौरवशाली रीतीने पूर्ण करण्यासाठी तू मला नेमले आहेस, हे मी मान्य करतो. तुझ्या पाचारणाला सतत “हो” म्हणण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – सिएनाचे संत बर्नार्दिन, धर्मगुरू




