मराठी

देवाचा न्याय

२८ जुलै २०२२
सामान्य काळातील सतराव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

व्हिडिओ

“युगाच्या शेवटी असेच होईल. देवदूत बाहेर पडतील, दुष्टांना नीतिमानांपासून वेगळे करतील आणि दुष्टांना धगधगत्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात खाणे चालेल.” मत्तय 13:49-50

पहिल्यांदा वाचताना हे वचन फारसे प्रेरणादायी वाटत नाही, नाही का? पण ज्या हेतूने ते सांगितले गेले, त्या दृष्टीने ते आपल्याला प्रेरणा देणारे ठरावे. आपल्या मनात एक प्रकारचे “पवित्र भय” जागवणे आणि त्याच वेळी देवाच्या न्यायाची खात्री देणे, हा त्यामागचा हेतू होता. हीसुद्धा प्रेरणाच आहे, फक्त आपण सहसा समजतो त्या अर्थाने नव्हे.

पण कधीकधी आपल्या जीवनात देवाचे आणि त्याच्या न्यायाचे थोडे पवित्र भय असणे गरजेचे आहे. आजच्या काळात पापाला अधिकाधिक मान्यता मिळत आहे आणि ते “सामान्य” मानले जाऊ लागले आहे. जगभरची आपली संस्कृती हळूहळू धर्मापासून दूर जात आहे असे दिसते. अनेक प्रकारचे अनैतिक आचरण वाढताना दिसते. त्यामुळे पाप ही सामान्य, इतकेच नव्हे तर स्वीकारण्याजोगी गोष्ट आहे, असे आपल्यालाही सहज वाटू लागते. उलट, आपण पापाला पाप म्हटले की, आपण इतरांना दोष देतो आणि द्वेष बाळगतो, असा आरोप जग आपल्यावर अनेकदा करते.

आपल्या सभोवतालच्या अनैतिकतेपुढे नमते घेऊन ती “स्वीकारून टाकावी,” असा दबाव तुम्हाला कधी जाणवत असेल, तर वरचे वचन तुम्हाला नेमके उलट करण्याची प्रेरणा देऊ शकेल. निर्विवाद सत्य हे आहे की येशूने काही गोष्टींना पाप म्हटले आहे आणि ती पापे केल्याने गंभीर परिणाम होतात.

प्रभूचा दिवस (रविवार) हा विश्रांतीचा दिवस राहू न देता तो इतर कशासाठीही वापरण्याची, सहज लक्षातही न येणारी सामाजिक रीत हे त्याचे एक उदाहरण असू शकते. किंवा विवाहाची व्याख्या बदलून वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाच्या पावित्र्याला गंभीर धक्का पोहोचवणे हेही त्याचे उदाहरण असू शकते. आपल्या श्रद्धेला निरनिराळ्या प्रकारे आव्हान दिले जाते, इतकेच नव्हे तर तिच्यावर हल्लाही होतो, असे प्रसंग आपल्यापैकी प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात येतील. तुम्हालाही असे वाटत असेल, तर पवित्र शास्त्रातील हे वचन तुमच्यासाठी आहे. पाप आणि त्याचे परिणाम यांविषयी येशू अत्यंत गंभीर आहे. यातून आपल्याला केवळ पवित्र जीवन जगण्याचीच नव्हे, तर संस्कृतीतील चुकीच्या प्रवाहांत अडकलेल्या लोकांना आपले जीवन बदलण्यास शक्य ती सर्व मदत करण्याचीही प्रेरणा मिळावी.

आज चिंतन करा: तुम्ही पापाला किती ठामपणे विरोध करता? पाप वाईट आहे आणि ते विनाश घडवते. पाप करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही नेहमी प्रेम केले पाहिजे; पण त्या व्यक्तीच्या देवाच्या नियमाविरुद्ध असलेल्या कृतींना कधीही पाठिंबा किंवा मान्यता देऊ नका. समाजातील प्रचलित प्रवाहांचा विरोध होत असतानाही आपल्या भूमिकेवर ठाम राहणे ही प्रेमाची मोठी कृती आहे. त्यामुळे येशूने सांगितलेल्या “आक्रोश आणि दात खाणे” यांपासून काही जणांची एके दिवशी सुटका होऊ शकेल.

हे माझ्या कृपाळू प्रभू, जिथे पाप वाढते, तिथे कृपा त्याहून अधिक वाढते.  आज आमच्या जगाला आणि माझ्या जीवनाला तुझ्या कृपेची फार गरज आहे.  वाईटाचा आणि पापाचा विरोध करताना मला खंबीर राहण्यास मदत कर, म्हणजे ज्यांना तू तुझ्या राज्यात एकत्र करशील त्यांच्यात माझाही समावेश होईल.  विनाशाच्या वाटेवर असलेल्यांना मदत करण्यासाठी माझ्या परीने सर्व काही करण्याचे धैर्य मला दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

प्रमुख चित्र: जिओत्तो, सार्वजनिक मालकीचे, विकिमीडिया कॉमन्समार्फत