27 जुलै 2022
सामान्य काळातील सतराव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

“आणखी, स्वर्गाचे राज्य उत्तम मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक बहुमोल मोती सापडतो, तेव्हा तो जाऊन आपले सर्वस्व विकतो आणि तो मोती विकत घेतो.” मत्तय 13:45-46
या उताऱ्यातून आपल्याला अनेक सुंदर गोष्टी उमगतात. स्वर्गाच्या राज्याची तुलना त्या ‘बहुमोल मोत्याशी’ नक्कीच करता येईल! पण प्रत्यक्षात या उताऱ्यात स्वर्गाच्या राज्याची तुलना ‘उत्तम मोत्यांच्या शोधात असलेल्या व्यापाऱ्याशी’ केली आहे. ही तुलना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट उलगडून दाखवते.
यातून आपल्याला एक गोष्ट उमगते: आपण आस्थेने शोध घेत असतानाच आपल्याला स्वर्गाचे राज्य सापडते. आपण स्वर्गाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या शोधातूनच देवाचे राज्य आपल्यासमोर उलगडते.
‘देवाचा शोध’ असे म्हणणे म्हणजे देव हे श्रद्धेचे एक गहन रहस्य आहे असे दुसऱ्या शब्दांत सांगणे. मिस्साबलिदानात आपण त्याला Mysterium Fidei असे म्हणतो. देव हे एक दैवी ‘रहस्य’ असल्यामुळे त्याचा पूर्णपणे ‘शोध लागणे’ कधीच शक्य नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण त्याला नक्कीच शोधू शकतो, त्याला समजून घेऊ शकतो, त्याची ओळख करून घेऊ शकतो आणि आपले जीवन त्याला अर्पण करू शकतो. पण यांपैकी काहीही आपण कधीच पूर्णपणे करू शकत नाही. खरे तर देवाची ओळख जसजशी वाढते, तसतसा आपण त्याचा अधिक शोध घेतो; आणि जितका अधिक शोध घेतो, तितके आपल्याला जाणवते की आपण त्याला पूर्णपणे ओळखत नाही. पण या जाणिवेमुळे आपण देवाच्या जीवनात अधिकाधिक खोलवर प्रवेश करतो आणि स्वर्गाचे राज्य अधिकाधिक प्राप्त करतो.
देवाचे आणि त्याच्या राज्याचे सौंदर्य, मोल, रहस्य, सामर्थ्य आणि वैभव शोधणे, हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. शोध घेत राहणे, जे सापडते ते जाणून घेणे आणि मग आणखी शोध घेणे, यात आपण हे जीवन घालवले पाहिजे. स्वर्गातही आपण हेच करू. स्वर्गात देवाचे राज्य आणि त्याचे अंतःजीवन आपल्यासमोर पूर्णपणे उलगडेल. पण त्याच वेळी आपल्याला उमगेल की देवामध्ये आणि त्याच्या वैभवशाली सान्निध्यात आपण अनंतकाळ अधिकाधिक खोलवर प्रवेश करत राहू.
आज, आपल्या जीवनात आपण घेत असलेल्या शोधावर चिंतन करा. तुम्ही देवाचा आस्थेने शोध घेत आहात का? की या प्रयत्नात तुम्ही ढिले पडत आहात? देवाचा मनापासून शोध घेण्याचा पुन्हा निर्धार करा. मग तुम्हाला उमगेल की या शोधातून खरे तर स्वर्गाच्या राज्याचे वैभव उलगडत जाते.
हे माझ्या सनातन राजा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यावर आणखी अधिक प्रेम करण्याची माझी इच्छा आहे. तुझा शोध घेताना माझे हृदय उत्साहाने आणि आशेने भरून टाक. मी संपूर्ण मनाने घेत असलेल्या या शोधातून तुझ्या वैभवशाली अंतःजीवनाचे रहस्य मला उलगडू दे. तुझी ओळख जसजशी वाढेल, तसतसा तुझा अधिकाधिक शोध घेण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




