९ ऑगस्ट २०२२
सामान्य काळाच्या एकोणिसाव्या आठवड्यातील मंगळवार
आजची वाचने
क्रुसाची संत तेरेसा बेनेदिक्ता (एडिथ स्टाइन), कुमारी व रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मृतिदिन

“आमेन, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही आपली वाट बदलून लहान मुलांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात प्रवेश करणार नाही. जो कोणी या बालकासारखा नम्र होतो, तो स्वर्गराज्यात सर्वांत मोठा आहे. आणि जो कोणी अशा एखाद्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो, तो माझाच स्वीकार करतो.” मत्तय 18:3-5
आपण लहान मुलांसारखे कसे होऊ शकतो? लहान मुलांसारखे असणे म्हणजे नेमके काय? येशूच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून दाखवणारे काही गुण असे आहेत: विश्वास ठेवणे, दुसऱ्याच्या आधारावर विसंबणे, सहजपणे आणि उत्स्फूर्तपणे वागणे, विस्मय अनुभवणे, दिखाऊपणा नसणे आणि निरागस असणे. येशू जे सांगत आहे, ते समजून घेण्यासाठी कदाचित यांपैकी काही गुण, किंवा सगळेच गुण, उपयोगी ठरतील. देवाशी आणि इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांच्या दृष्टीने यांपैकी काही गुण पाहू या.
विश्वास ठेवणे: मुले आपल्या आईवडिलांवर निःशंकपणे विश्वास ठेवतात. त्यांचे ऐकावे असे मुलांना नेहमीच वाटत नाही; पण आईवडील आपल्या गरजा भागवतील आणि आपली काळजी घेतील, याबद्दल शंका घेण्याचे कारण मुलांना क्वचितच असते. अन्न आणि कपडे मिळतील हे ती गृहीत धरतात; त्यांची चिंता करावी असेही त्यांना वाटत नाही. एखाद्या मोठ्या शहरात किंवा खरेदीच्या संकुलात आई किंवा वडील जवळ असले की मुलांना सुरक्षित वाटते. या विश्वासामुळे भीती आणि काळजी दूर होण्यास मदत होते.
सहजपणा: मुले बहुतेकदा जशी आहेत तशीच मोकळेपणाने वागतात. आपण हास्यास्पद दिसू किंवा आपली फजिती होईल, याची ती फारशी चिंता करत नाहीत. इतरांना आपल्याबद्दल काय वाटेल याची काळजी न करता ती अनेकदा सहजपणे आणि उत्स्फूर्तपणे वागतात.
निरागसपणा: मुलांची दृष्टी अजून कलुषित झालेली नसते, आणि ती सर्वांकडे संशयानेही पाहत नाहीत. इतरांकडे पाहताना ती त्यांच्याबद्दल लगेच वाईट गृहीत धरत नाहीत. उलट, इतर माणसे चांगली आहेत असेच त्यांना अनेकदा वाटते.
विस्मय अनुभवणे: नव्या गोष्टी मुलांना अनेकदा मोहून टाकतात. एखादे सरोवर, एखादा डोंगर किंवा एखादे नवे खेळणे पहिल्यांदा पाहिले की ती हरखून जातात.
हे सर्व गुण देवाशी असलेल्या आपल्या नात्यातही सहजपणे जोपासता येतात. प्रत्येक बाबतीत देव आपली काळजी घेईल असा आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपले प्रेम स्वीकारले जाईल की नाकारले जाईल याची चिंता न करता, ते निर्भयपणे, सहजतेने आणि मोकळेपणाने व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पूर्वग्रहांना आणि पक्षपातीपणाला बळी न पडता, इतरांकडे निरागस नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाविषयी आणि तो आपल्या जीवनात घडवत असलेल्या सर्व नव्या गोष्टींविषयीचा विस्मय आपण सतत जपला पाहिजे.
यांपैकी कोणता गुण आपल्यात सर्वांत कमी आहे, यावर आज चिंतन करा. आपण लहान मुलांसारखे अधिकाधिक व्हावे, अशी देवाची इच्छा आहे; ती आपण कशी पूर्ण करू शकतो? स्वर्गराज्यात खऱ्या अर्थाने मोठे होण्यासाठी आपण कोणत्या बाबतीत लहान मुलांसारखे व्हावे, असे देवाला वाटते?
हे प्रभू, मला लहान मुलासारखे होण्यास मदत कर. लहान मुलाच्या नम्रतेत आणि साधेपणात खरे मोठेपण शोधण्यास मला मदत कर. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक बाबतीत माझा तुझ्यावर पूर्ण भरवसा असू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – क्रुसाची संत तेरेसा बेनेदिक्ता (एडिथ स्टाइन), कुमारी व रक्तसाक्षी
मुख्य चित्र: ‘मुलांना माझ्याकडे येऊ द्या’ — अँथनी व्हॅन डाइक यांचे चित्र (स्रोत: विकिपीडिया)




