१४ सप्टेंबर २०२२

“आणि जसा मोशेने वाळवंटात सर्प उंच केला, तसाच मनुष्यपुत्रही उंच केला गेला पाहिजे, यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे.” योहान 3:14-15
आज आपण किती गौरवशाली सण साजरा करीत आहोत! आज पवित्र क्रूसाच्या उन्नतीचा सण आहे!
क्रूसाचा खरा अर्थ आपल्याला समजतो का? ख्रिस्ताच्या क्रूसाविषयी आपण जे काही शिकलो आहोत ते बाजूला ठेवून केवळ लौकिक आणि ऐतिहासिक दृष्टीने पाहिले, तर क्रूस हे एका मोठ्या शोकांतिकेचे चिन्ह आहे. हा क्रूस अशा एका माणसाच्या कथेशी जोडलेला आहे, जो अनेकांना फार प्रिय झाला होता, पण इतर काही जण त्याचा तीव्र द्वेष करीत होते. अखेरीस, त्याचा द्वेष करणाऱ्यांनी त्याला क्रूरपणे क्रूसावर खिळण्याची व्यवस्था केली. म्हणून केवळ लौकिक दृष्टीने पाहता, क्रूस ही एक भयंकर गोष्ट आहे.
पण ख्रिस्ती लोक क्रूसाकडे लौकिक दृष्टीने पाहत नाहीत. आपण त्याच्याकडे देवाच्या दृष्टीने पाहतो. सर्वांना दिसावे म्हणून येशूला क्रूसावर उंच केलेले आपण पाहतो. भयंकर यातना सोसून तो दुःखाचा कायमचा अंत करतो, हे आपण पाहतो. स्वतःच्या मृत्यूने तो मृत्यूचाच नाश करतो, हेही आपण पाहतो. शेवटी, येशू त्याच क्रूसावर विजय मिळवतो, हे आपल्याला दिसते. म्हणूनच क्रूसाकडे आपण सदैव एक उन्नत आणि गौरवशाली सिंहासन म्हणून पाहतो!
मोशेने वाळवंटात जे केले, ते क्रूसाचे पूर्वचिन्ह होते. सर्पदंशामुळे अनेक लोक मरत होते. म्हणून देवाने मोशेला सर्पाची प्रतिमा एका खांबावर उंच करण्यास सांगितले, जेणेकरून तिच्याकडे पाहणारे सर्व जण बरे होतील. आणि अगदी तसेच घडले. केवढा हा विरोधाभास! सर्पाने मृत्यूऐवजी जीवन दिले!
आयुष्यभर आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे दुःख सोसावे लागते. काहींना प्रकृतीच्या त्रासामुळे रोज ठणका आणि वेदना सहन कराव्या लागतात. तर काहींचे दुःख अधिक खोलवरचे असते—ते भावनिक, वैयक्तिक, नातेसंबंधांशी निगडित किंवा आध्यात्मिक असू शकते. खरे तर, सर्वांत मोठ्या दुःखाचे कारण पाप आहे. म्हणून ज्यांना आपल्या जीवनात पापाशी कठीण झुंज द्यावी लागते, त्यांना त्या पापामुळे खोल दुःखही सोसावे लागते.
मग येशूचे उत्तर काय आहे? आपण आपली नजर त्याच्या क्रूसाकडे वळवावी, हेच त्याचे उत्तर आहे. आपण त्याच्या दैन्यावस्थेत आणि यातनांत त्याच्याकडे पाहावे आणि असे पाहताना विश्वासाच्या नजरेने त्याचा विजय ओळखावा, असे आवाहन आपल्याला केले आहे. आपल्या दुःखातूनही, आणि प्रत्येक गोष्टीतून, देव चांगले घडवून आणतो, हे जाणून घेण्यास आपल्याला बोलावले आहे. पित्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या दुःखसहनाद्वारे आणि मृत्यूद्वारे जगाचे कायमचे रूपांतर केले. आपण आपापले क्रूस वाहत असताना आपलेही रूपांतर व्हावे, अशी त्याची इच्छा आहे.
आज ख्रिस्ताच्या क्रूसावर चिंतन करा. क्रूसावर खिळलेल्या येशूच्या प्रतिमेकडे काही वेळ शांतपणे पाहा. त्या प्रतिमेत तुमच्या रोजच्या संघर्षांचे उत्तर शोधा. दुःख सोसणाऱ्यांच्या येशू जवळ असतो, आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याचे सामर्थ्य लाभते.
हे प्रभू, क्रुसाकडे निरखून पाहण्यास मला मदत कर. तुझ्या दुःखसहनातच तुझ्या अंतिम विजयाची थोडीशी अनुभूती मला येऊ दे. तुझ्याकडे पाहताना मला बळ मिळो आणि मी बरा होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दुःखी मातेची नोव्हेना
परंपरेनुसार ही प्रार्थना ७ ते १५ सप्टेंबर या काळात केली जाते
आठवा दिवस—१४ सप्टेंबर
आजचा सण – पवित्र क्रुसाचा गौरव
वरील चित्र: पीटर पॉल रुबेन्स यांचे ‘क्रूस उभारणे’ — विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने




