मराठी

येशूचे कुटुंब

२० सप्टेंबर २०२२
सामान्य काळातील पंचविसाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

संत आंद्रेआ किम ते-गॉन, याजक, संत पौल चॉंग हा-सांग आणि त्यांचे सहकारी, धर्मसाक्षी — स्मृतिदिन

व्हिडिओ

“जे देवाचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”  लूक 8:21

आपल्या कुटुंबात एखादी सामर्थ्यवान आणि प्रसिद्ध व्यक्ती असली तर कसं वाटेल, असा विचार कदाचित तुमच्या मनात आला असेल.  तुमचा भाऊ, बहीण किंवा आई-वडिलांपैकी कोणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असतं, तर कसं वाटलं असतं?  किंवा ती व्यक्ती एखादी नावाजलेली क्रीडापटू असती तर?  किंवा इतर कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती?  त्यातून तुम्हाला बहुधा एक वेगळाच आनंद मिळाला असता आणि सार्थ अभिमानही वाटला असता.

येशू या पृथ्वीवर वावरत होते, तेव्हा ते, असं म्हणायला हरकत नाही, बरेच ‘प्रसिद्ध’ होत होते.  अनेकांना त्यांच्याबद्दल आदर वाटत होता, अनेक जण त्यांच्यावर प्रेम करत होते आणि त्यांचे अनुयायी झाले होते.  ते बोलत असताना त्यांची आई आणि त्यांचे भाऊ (बहुधा त्यांचे चुलत किंवा इतर नात्यातले भाऊ) बाहेर येऊन थांबले.  लोकांनी त्यांच्याकडे आदराने आणि कौतुकाने पाहिलं असेल, यात शंका नाही; कदाचित काहींना त्यांचा थोडासा हेवाही वाटला असेल.  येशूंचं प्रत्यक्ष नातेवाईक असणं किती छान असेल!

आपलं नातेवाईक असणं, आपल्या कुटुंबाचा एक भाग असणं, हा किती मोठा आशीर्वाद आहे, याची येशूंना जाणीव आहे.  म्हणूनच ते या शब्दांद्वारे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपण त्यांच्या अगदी जवळच्या कुटुंबातले आहोत, असं मानण्याचं आमंत्रण देतात.  आपली धन्य माता मरिया हिचं येशूंशी असलेलं नातं नेहमीच अद्वितीय राहील; पण येशू सर्वांनाच आपल्याशी अशा कौटुंबिक नात्याने जोडले जाण्याचं आमंत्रण देतात.

हे कसं घडतं?  जेव्हा आपण “देवाचे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो,” तेव्हा हे घडतं.  हे इतकं सोपं आहे.  देव जे काही सांगतो ते तुम्ही ऐकलंत आणि त्याप्रमाणे वागलात, तर येशूंच्या कुटुंबाशी अगदी जवळचं, वैयक्तिक आणि जिवाभावाचं नातं जोडण्याचं आमंत्रण तुम्हालाही आहे.

एका अर्थाने हे सोपं असलं, तरी जीवनाला मुळापासून नवं वळण देणारं हे पाऊल आहे.  कारण त्यासाठी देवाच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित व्हावं लागतं.  देव बोलतो, तेव्हा त्याच्या शब्दांत आपलं रूपांतर करण्याचं सामर्थ्य असतं.  त्याच्या शब्दांप्रमाणे वागल्याने आपलं जीवन बदलेल.

येशू तुम्हाला आपल्या अगदी जवळच्या कुटुंबात सामील होण्याचं आमंत्रण देतात. आज त्या आमंत्रणावर मनन करा.  ते आमंत्रण ऐका आणि त्याला ‘हो’ म्हणा.  आणि या आमंत्रणाला ‘हो’ म्हणताना, येशूंच्या वाणीने आणि त्यांच्या दैवी इच्छेने तुमचं जीवन बदलू द्यायला मनापासून तयार राहा.

हे प्रभू, तुझ्या जिव्हाळ्याच्या कुटुंबाचा एक भाग होण्याचे तुझे आमंत्रण मी स्वीकारतो.  तुझी वाणी मला ऐकू येवो आणि तू जे काही सांगतोस त्याप्रमाणे मला वागता येवो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – संत आंद्रे किम तेगॉन (याजक), संत पौल चॉंग हासांग आणि त्यांचे सहकारी, श्रद्धेसाठी प्राण अर्पण करणारे

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

चित्र: ख्रिस्त जब्दीच्या पत्नीला आणि मुलांना भेटतो – पाओलो व्हेरोनेझे यांचे चित्र, विकिमीडियावरून