१३ नोव्हेंबर २०२२
सामान्य काळातील तेहतीसावा रविवार, वर्ष क
आजची वाचने

“तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सावध राहा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन म्हणतील, ‘तो मीच आहे’ आणि ‘वेळ आली आहे.’ त्यांच्या मागे जाऊ नका!” लूक 21:8
हे वचन किती विचार करायला लावणारे आहे! याचा अर्थ काय? येशू ज्यांच्याविषयी बोलतो ते ‘पुष्कळ जण’ कोण आहेत? ते आज आपल्यामध्ये आहेत का?
येशूच्या नावाने खोटा दावा करत येणारे ते ‘अनेक’ लोक म्हणजे अमुक व्यक्ती किंवा अमुक गट, असे ठरवण्याचा प्रयत्न कदाचित उपयोगी ठरणार नाही. पण काही सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वांविषयी बोलणे उपयुक्त ठरेल.
सर्वप्रथम, येशू ‘फसवले जाणे’ असा शब्दप्रयोग करतो. लोकांना फसवू शकणारे अनेक खोटे संदेष्टे असतील. आपण सत्याचे संदेशवाहक आहोत आणि देवाची इच्छा लोकांना सांगतो, असे ते भासवतील. त्यांचे बोलणे पटण्यासारखे असेल आणि अनेक जण त्यांच्या मागे जातील.
यावरून आपल्याला समजते की ‘देवाच्या नावाने’ बोलतो असे म्हणणारा प्रत्येक जण खरोखर देवाच्या नावाने बोलत असतोच असे नाही. एखाद्या व्यक्तीचे बोलणे कितीही पटण्यासारखे असले आणि पुष्कळ लोक तिच्या मागे जात असले, तरी त्यावरून ती व्यक्ती प्रभूची खरी संदेष्टी आहे असे सिद्ध होत नाही.
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून येशूचे हृदय बोलत आहे, हे आपण कसे ओळखावे? शेवटी, हे केवळ प्रार्थनामय वृत्तीतूनच शक्य होते. ‘प्रार्थनामय वृत्ती’ म्हणजे आपले अंतःकरण देवाचा आवाज ऐकण्यास सज्ज असणे. देव एखाद्या व्यक्तीद्वारे बोलतो आणि आपले अंतःकरण त्याच्याकडे लागलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या बोलण्यातून आपल्याला त्याचा आवाज सहज ओळखू येतो.
याउलट, आपण खऱ्या प्रार्थनामय वृत्तीने जगत असताना कोणी खोटा आणि फसवा संदेश दिला, तर तो आपल्या मनाला पटणार नाही. काहीतरी बरोबर नाही, असे आपल्याला आत्म्याच्या गाभ्यात जाणवेल. ही आध्यात्मिक जाणीव आहे आणि आपली सदसद्विवेकबुद्धी योग्य रीतीने कार्य करत असल्याचे ते फळ आहे. देवाने प्रकट केलेल्या सत्याविषयीचे कॅथलिक चर्चचे शिक्षण आणि इतर सदाचारी ख्रिस्ती बांधवांचा सल्ला हे आपल्याला बाहेरून मिळणारे मार्गदर्शन आहे. पण शेवटी, आपल्या सदसद्विवेकबुद्धीत देवाला बोलू दिले पाहिजे आणि या पवित्र स्थानी ऐकू येणाऱ्या त्याच्या आवाजाप्रमाणे चालले पाहिजे.
तुमच्या सदसद्विवेकबुद्धीच्या गाभ्यात देव तुमच्याशी बोलतो, तेव्हा तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न तुम्ही दररोज करता का आणि तो तुम्हाला ऐकू येतो का, यावर आज चिंतन करा. बारकाईने आणि लक्षपूर्वक ऐका. त्याचा आवाज ओळखायला शिका आणि इतरांच्या बोलण्यातून तो काय सांगतो ते ऐकण्याचा प्रयत्न करा. इतरांचे बोलणे तुमच्या आत्म्यात ऐकू येणाऱ्या आवाजाच्या विरुद्ध असेल, तेव्हा तुमच्या अंतर्यामी बोलणाऱ्या देवाशी निष्ठावान राहा. इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा तो तिथेच तुम्हाला अधिक मार्गदर्शन करील.
हे प्रभू, तुझी वाणी ओळखण्याची आणि ऐकण्याची कृपा मला दे. सर्व गोष्टींपेक्षा मी तुलाच निवडतो आणि तुला अधिक स्पष्टपणे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्या जीवनात आता आणि सदैव मला तुझ्या मार्गाने चालू दे आणि आपल्या काळातील अनेक खोट्या संदेष्ट्यांकडून माझी कधीही फसवणूक होऊ देऊ नकोस. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
रविवारची आणखी व्हिडिओ चिंतने पाहा
आजची संत – संत फ्रान्सिस झेवियर काब्रिनी, कुमारी
यंदा हा दिवस रविवारी येत असल्याने उपासनेत हे स्मरण पाळले जात नाही





