१४ जानेवारी २०२३
सामान्य काळातील पहिल्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने

तेथून जात असताना येशूने अल्फयाचा मुलगा लेवी याला जकात नाक्यावर बसलेले पाहिले. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि येशूच्या मागे गेला. मार्क 2:14
आपल्या जीवनाविषयी देवाची इच्छा काय आहे, हे तुम्हाला कसे कळते? लोयोलाचे संत इग्नेशियस यांनी आपल्या आध्यात्मिक साधना या अभिजात आध्यात्मिक ग्रंथात देवाची इच्छा ओळखण्याचे तीन मार्ग सांगितले आहेत. (अधिक माहितीसाठी mycatholic.life/ignatius पाहा.) पहिला मार्ग सर्वांत स्पष्ट आणि निर्णायक आहे. अशा वेळी देवाच्या विशेष कृपेमुळे त्या व्यक्तीला इतकी स्पष्ट जाणीव होते की “शंकेला जागाच उरत नाही.” या अनुभवाचे वर्णन करताना संत इग्नेशियस यांनी वर उद्धृत केलेला उतारा उदाहरण म्हणून दिला आहे.
लेवीला मिळालेल्या या पाचारणाविषयी मार्कच्या शुभवर्तमानात फार थोडे सांगितले आहे. मत्तयच्या शुभवर्तमानातही या प्रसंगाची नोंद आहे (मत्तय 9:9). मत्तय या नावानेही ओळखला जाणारा लेवी आपल्या जकात नाक्यावर नेहमीप्रमाणे कर वसूल करीत होता. येशू लेवीला एवढेच म्हणाला असे दिसते: “माझ्यामागे ये.” या साध्या शब्दांमुळे लेवी आपले जुने जीवन सोडतो आणि येशूचा अनुयायी बनतो. लेवीने असे का केले असेल? येशूच्या मागे जाण्याची खात्री त्याला कशाने पटली असेल? त्याच्या प्रतिसादामागे येशूच्या त्या मोजक्या शब्दांतल्या आमंत्रणापेक्षा कितीतरी अधिक काहीतरी होते, हे स्पष्ट आहे.
लेवीला ही खात्री पटली ती देवाच्या विशेष कृपेमुळे. त्या कृपेने त्याच्या अंतरात्म्यात इतकी स्पष्ट जाणीव निर्माण झाली की “शंकेला जागाच उरली नाही.” आपले जुने जीवन सोडून या नव्या जीवनाचा स्वीकार करण्यासाठी देव आपल्याला बोलावत आहे, हे लेवीला कसे कोण जाणे, पण उमगले. त्याने यावर लांबलचक चर्चा केली नाही, फायदे-तोटे तोलून पाहिले नाहीत, की बराच वेळ विचार करत बसला नाही. लेवीला ते उमगले आणि त्याने त्या हाकेला प्रतिसाद दिला.
जीवनात अशी स्पष्टता क्वचितच लाभते. तरीही देव कधीकधी अशा रीतीने कार्य करतो, याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. असे घडते तेव्हा ती देवाची मोठी देणगी असते! देव आपल्याशी बोलतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला इतकी सखोल आणि तत्काळ स्पष्टता लाभतेच असे नाही. तरीही तो कधीकधी आपल्याशी अशा रीतीने बोलतो, हे मान्य करणे महत्त्वाचे आहे.
आज लेवीला मिळालेल्या या पाचारणावर चिंतन करा. त्या क्षणी त्याला अंतःकरणात लाभलेल्या खात्रीचा विचार करा. त्याला काय अनुभव आला असेल आणि येशूच्या मागे जाण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल इतरांना काय वाटले असेल, याची कल्पना करा. हीच कृपा स्वीकारण्यास मन खुले ठेवा. देव तुमच्याशी इतक्या स्पष्टपणे बोलत आहे असे कधी जाणवले, तर क्षणाचाही संकोच न करता प्रतिसाद देण्यास मनापासून तयार राहा.
हे माझ्या प्रिय प्रभू, कोणताही संकोच न करता तुझ्या मागे चालण्यासाठी तू आम्हा सर्वांना बोलावतोस, त्याबद्दल तुझे आभार. तुझा शिष्य होण्याचा आनंद दिल्याबद्दल तुझे आभार. माझ्या जीवनासाठी तुझी इच्छा काय आहे, हे मला नेहमी समजावे म्हणून मला कृपा दे. पूर्ण विश्वासाने स्वतःला तुझ्या हाती सोपवून तुझ्या हाकेला प्रतिसाद देण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
वरील चित्र: संत मत्तयाला पाचारण — जियोव्हानी पाओलो पानिनी यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्सवरून




