१८ जानेवारी २०२३
सामान्य काळातील दुसऱ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

मग येशूने परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी वाईट करण्याऐवजी चांगले करणे, जीव घेण्याऐवजी जीव वाचवणे, नियमाला धरून आहे काय?” पण ते गप्प राहिले. येशूने रागाने सभोवार त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे व्यथित होऊन तो त्या माणसाला म्हणाला, “तुझा हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि त्याचा हात बरा झाला. मार्क 3:4–5
पापामुळे देवाशी असलेल्या आपल्या नात्याला हानी पोहोचते. पण अंतःकरणाचा कठोरपणा त्याहून अधिक हानिकारक आहे, कारण त्यामुळे पापाने केलेली हानी कायम राहते. अंतःकरण जितके कठोर, तितकी ती हानी अधिक चिरस्थायी होते.
वरील उताऱ्यात येशूला परुश्यांचा राग आला. रागाची भावना अनेकदा पापमय असते, कारण ती अधीरतेतून आणि प्रेमाच्या अभावातून उद्भवते. पण कधी कधी इतरांवरील प्रेमातून आणि त्यांच्या पापाविषयीच्या तिटकाऱ्यातून उद्भवणारा राग चांगलाही असू शकतो. येथे परुश्यांच्या कठोर अंतःकरणामुळे येशू व्यथित झाला आणि त्या दुःखातून त्याचा पवित्र संताप उद्भवला. त्या ‘पवित्र’ संतापामुळे येशूने अविवेकी टीका केली नाही. उलट, त्या संतापाने त्याला परुश्यांसमोर त्या माणसाला बरे करण्यास प्रवृत्त केले, जेणेकरून त्यांची अंतःकरणे मृदू होतील आणि ते येशूवर विश्वास ठेवतील. दुःखाची गोष्ट म्हणजे तसे घडले नाही. शुभवर्तमानाच्या अगदी पुढच्याच ओळीत म्हटले आहे, “परुशी बाहेर गेले आणि त्याला ठार मारण्यासाठी त्यांनी लगेच हेरोदपंथीयांशी त्याच्याविरुद्ध मसलत केली” (मार्क 3:6).
आपले अंतःकरण कठोर होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. अडचण अशी आहे की ज्यांचे अंतःकरण कठोर असते, ते सहसा ही गोष्ट मान्य करायला तयार नसतात. ते हट्टी आणि दुराग्रही असतात आणि अनेकदा स्वतःलाच नीतिमान समजतात. म्हणूनच या आध्यात्मिक व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना बदलणे कठीण जाते, विशेषतः जेव्हा कोणी त्यांना त्यांच्या वृत्तीची जाणीव करून देते.
शुभवर्तमानातील हा उतारा तुम्हाला स्वतःच्या अंतःकरणात प्रामाणिकपणे डोकावण्याची एक महत्त्वाची संधी देतो. या आत्मपरीक्षणात आणि अंतर्मनातील संवादात केवळ तुम्ही आणि देव असणे पुरेसे आहे. सुरुवातीला परुश्यांच्या वागण्यावर आणि त्यांनी घालून दिलेल्या चुकीच्या उदाहरणावर चिंतन करा. त्यानंतर स्वतःकडे अतिशय प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दुराग्रही आहात का? तुम्ही आपल्या मतांवर इतके ठाम आहात का, की कधी कधी आपलीही चूक असू शकते, हा विचारसुद्धा करायला तुम्ही तयार नसता? तुमच्या आयुष्यात असे कोणी आहे का, ज्यांच्याशी झालेला तुमचा वाद अजूनही मिटलेला नाही? यांपैकी काही तुमच्या बाबतीत खरे वाटत असेल, तर कठोर अंतःकरणाच्या आध्यात्मिक व्याधीने तुम्हीही ग्रस्त असण्याची शक्यता आहे.
आज स्वतःच्या आत्म्याचे आणि इतरांशी असलेल्या नात्यांचे शक्य तितक्या प्रामाणिकपणे चिंतन करा. स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती बाजूला ठेवायला संकोच करू नका आणि देवाला तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते ऐकण्यास तयार राहा. अंतःकरण कठोर आणि हट्टी होण्याची किंचितही प्रवृत्ती तुम्हाला जाणवली, तर आपल्या प्रभूला तुमच्या अंतःकरणात येऊन ते मृदू करण्याची कळकळीने विनंती करा. असा बदल घडणे कठीण असते, पण त्यातून मिळणारे फळ मोजता येणार नाही इतके मोठे असते. संकोच करू नका, विलंबही करू नका. शेवटी हा बदल करण्यासाठी घेतलेले कष्ट सार्थ ठरतात.
हे माझ्या प्रेमळ प्रभू, आज मी स्वतःच्या अंतःकरणाचे परीक्षण करण्यास तयार आहे. गरज पडेल तेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची तयारी माझ्यात सदैव असावी, यासाठी तू मला मदत कर, अशी मी प्रार्थना करतो. विशेषतः, माझ्या अंतःकरणात कुठे कठोरपणा असेल तर तो मला ओळखता येऊ दे. माझ्यातील हट्ट, दुराग्रह आणि आपणच नीतिमान आहोत ही भावना यांवर मात करण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, मला नम्रतेचे वरदान दे, जेणेकरून माझे अंतःकरण अधिकाधिक तुझ्या अंतःकरणासारखे होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
वरील चित्र: येशू वाळलेल्या हाताच्या माणसाला बरे करतो (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)



