मराठी

जगाचा प्रकाश

5 फेब्रुवारी 2023
सामान्य काळातील पाचवा रविवार (वर्ष अ)
आजची वाचने

व्हिडिओ

“तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपून राहू शकत नाही. दिवा लावून तो टोपलीखाली ठेवत नाहीत, तर दिवठणीवर ठेवतात. तिथून तो घरातील सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश इतरांसमोर असा चमकू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहावीत आणि तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा.” मत्तय 5:14–16 

दिवे गेले आणि आपण अंधारात राहिलो, असा अनुभव आपल्या सर्वांनाच कधी ना कधी आला आहे. अशा वेळी एखादी मेणबत्ती लावून खोलीच्या मध्यभागी ठेवली, तर तिच्या प्रकाशाने किती फरक पडतो! अंधाऱ्या खोलीत एकच मेणबत्ती लावली तरी ती खोली बदलून जाते आणि तिथे वावरणे अधिक सुखद होते.

हे चित्र मनात ठेवून येशूच्या वरील रूपकातील पहिल्या वाक्यावर विचार करा. “तुम्ही जगाचा प्रकाश आहात.” अंधारात तेवणारी ती एकच मेणबत्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात, अशी कल्पना करा. हेच तुमचे ध्येय आहे. एकच मेणबत्ती जशी संपूर्ण खोली उजळू शकते, तसे तुम्हीही अनेकांसाठी प्रकाशाचा स्रोत होऊ शकता.

देवाच्या कृपेचा प्रकाश “इतरांसमोर चमकू देणे” हे आपल्या सर्वांना जीवनात सोपवलेल्या प्रमुख कार्यांपैकी एक आहे. आपण हे कार्य पार पाडतो तेव्हा देवाच्या प्रेरणेने केलेली आपली सत्कृत्ये इतरांना दिसतात आणि ती पाहून ते स्वर्गातील पित्याचा गौरव करतात. अशा रीतीने, तुम्ही इतरांसाठी ख्रिस्ताचा प्रकाश पसरवता तेव्हा देवाची स्तुती होते आणि त्याचा गौरव होतो.

आपण गर्वाशी झगडत असतो तेव्हा येशूच्या या संपूर्ण विधानावर विचार करणे विशेष उपयुक्त ठरते. गर्वामुळे आपण स्वतःकडे लक्ष वेधतो. इतरांनी आपली प्रशंसा करावी म्हणून स्वतःला सर्वांच्या नजरेसमोर आणणे ही स्वार्थी वृत्ती आहे. पण येशू आपल्याला सांगतो की, जेव्हा आपण जगाचा प्रकाश होण्याची आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडतो आणि ख्रिस्ताचा प्रकाश पसरवतो, तेव्हा लोकांना आपली प्रशंसा करण्याची नव्हे, तर आपल्याद्वारे कार्य करणाऱ्या देवाचा गौरव करण्याची प्रेरणा मिळते. या दोन्हींत मोठा फरक आहे.

यातली सुंदर गोष्ट अशी की, देवाचा गौरव होतो तेव्हा अनेकदा आपणही त्या गौरवात सहभागी व्हावे, अशी त्याची इच्छा असते. समजा, तुम्ही एखाद्यासाठी प्रेमाने काही केले आणि त्या व्यक्तीने मनापासून कृतज्ञता व्यक्त करून तुमचे आभार मानले. तुम्ही ते देवावरील प्रेमापोटी केले, हे लक्षात घेतले तर त्या व्यक्तीने तुमचे आभार मानणे हाही देवाचा गौरव करण्याचा एक मार्ग ठरतो. आपण देवाची मुले आहोत. आपल्या श्रद्धेमुळे जेव्हा आपण एकमेकांना प्रेम आणि आदर देतो व एकमेकांकडून ते स्वीकारतो, तेव्हा देवाची स्तुती होते.

आज दोन गोष्टींवर मनन करा. पहिली, ज्यांच्यापर्यंत देवाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी त्याने तुम्हाला बोलावले आहे, त्यांचा विचार करा. तुमच्या जीवनात अशी कोणती व्यक्ती आहे जिला तुमच्याकडून प्रेमाची, सेवाभावाची, दयेची, क्षमेची किंवा करुणेची एखादी कृती हवी आहे? त्यांच्या अंधारात त्यांच्यासाठी देवाचा प्रकाश होण्याचा निश्चय करा. दुसरी, ज्यांनी तुमच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश पाडला, त्यांचा विचार करा. असे घडले तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद दिलात? आशा आहे की तुम्ही कृतज्ञतेने प्रतिसाद दिलात आणि त्या कृतज्ञतेतून त्या व्यक्तीच्या प्रेमाला प्रेमाने उत्तर दिले, तसेच देवाचाही गौरव केला. प्रकाशाची गरज असलेल्या जगासाठी जगाचा प्रकाश व्हा, आणि इतरांमधून तेजाने झळकणारा तोच प्रकाश शोधा. जो अंधार सतत आपल्याला व्यापून टाकू पाहतो, त्यातून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग आहे.

हे प्रभू, जीवनातील सारा अंधार दूर करणारा खरा प्रकाश तूच आहेस. तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस आणि सर्वांना दिसावा असा तेजाने झळकतोस. इतरांवर पडणारा तुझा प्रकाश मला दिसू दे आणि त्या देणगीबद्दल तुझा गौरव करण्यास मला मदत कर. ज्यांना तुझ्या प्रकाशाची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहोचवण्याचे साधन मला बनव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजची संत – संत आगाथा, कुमारिका आणि रक्तसाक्षी
या वर्षी हा दिवस रविवारी येत असल्यामुळे उपासनाविधीत हे स्मरण साजरे केले जात नाही

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य प्रतिमा: पिक्साबेवरून