4 फेब्रुवारी 2023
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने

“तुम्ही एकटेच एखाद्या निर्जन ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.” मार्क 6:34
बारा प्रेषित गावोगावी फिरून शुभवर्तमानाची घोषणा करून नुकतेच परतले होते. ते थकले होते. येशूला त्यांची कणव आली आणि त्याने त्यांना थोडी विश्रांती घेण्यासाठी आपल्याबरोबर एकांतात येण्यास सांगितले. म्हणून ते नावेत बसून पलीकडच्या एका एकांतस्थळी निघाले. पण लोकांना हे कळताच नाव ज्या ठिकाणी जात होती तिकडे ते पायीच घाईघाईने गेले. त्यामुळे नाव तिथे पोहोचली तेव्हा लोकांचा जमाव त्यांची वाट पाहत होता.
अर्थात, येशू नाराज होत नाही. त्याच्यासोबत आणि बारा प्रेषितांसोबत राहण्याची लोकांची तीव्र इच्छा पाहून तो निरुत्साहीही होत नाही. उलट, शुभवर्तमान सांगते की त्यांना पाहून “त्याच्या अंतःकरणात करुणा दाटून आली” आणि तो त्यांना अनेक गोष्टी शिकवू लागला.
आपल्याही जीवनात, इतरांची मनापासून सेवा केल्यानंतर विश्रांती घ्यावीशी वाटणे साहजिक आहे. येशूलाही स्वतःसाठी आणि आपल्या प्रेषितांसाठी अशी विश्रांती हवी होती. पण त्याच्यासोबत राहण्याची आणि त्याच्या उपदेशातून आध्यात्मिक पोषण मिळवण्याची लोकांची इच्छा त्याला स्पष्ट दिसली. केवळ याच कारणासाठी त्याने आपल्या विश्रांतीत “व्यत्यय” येऊ दिला. आपल्या प्रभूच्या या उदाहरणातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे.
उदाहरणार्थ, आईला किंवा वडिलांना अनेकदा थोडा वेळ एकांतात घालवावासा वाटतो; पण नेमक्या त्याच वेळी घरात एखादी बाब उद्भवते आणि तिच्याकडे लक्ष द्यावे लागते. धर्मगुरू आणि व्रतस्थ स्त्री-पुरुष यांच्यावरही सेवाकार्यातून अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्यामुळे आपल्या बेतात व्यत्यय येतो आहे असे त्यांना वाटू शकते. जीवनातील कोणत्याही पाचारणाला किंवा परिस्थितीला हे लागू पडते. आपल्याला एका गोष्टीची गरज आहे असे वाटत असते; पण कर्तव्याची हाक येते, तेव्हा आपली गरज भलत्याच कामासाठी आहे, हे लक्षात येते.
आपले कुटुंबीय, ख्रिस्तसभा, आपले समुदाय किंवा मित्र यांच्यामध्ये ख्रिस्ताच्या प्रेषितकार्याचा वाटा उचलण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला वेळ व शक्ती उदारपणे देण्याची तयारी ठेवणे. काही वेळा विवेक आपल्याला विश्रांती घेण्याची गरज आहे असे सांगतो, हे खरे. पण इतर वेळी, विश्रांतीची आणि निवांतपणाची आपली गरज रास्त वाटत असली, तरी प्रेमाने सेवा करण्याच्या हाकेला पहिले स्थान द्यावे लागते. जेव्हा खरे प्रेम आपल्याकडून अशी सेवा मागते, तेव्हा आपला वेळ उदारपणे देण्यासाठी आवश्यक ती कृपा प्रभू आपल्याला देतो, याचा अनुभव आपल्याला नेहमी येईल. अनेकदा अशाच क्षणी प्रभू आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात खरा बदल घडवून आणतो.
आज आपल्या सभोवतालच्या लोकांच्या खऱ्या गरजांवर चिंतन करा. आज तुम्ही दिलेल्या वेळेचा आणि लक्षाचा कोणाला मोठा फायदा होईल का? इतरांच्या अशा काही गरजा आहेत का, की ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे बेत बदलावे लागतील आणि कठीण वाटले तरी स्वतःला त्यांच्या सेवेसाठी द्यावे लागेल? इतरांसाठी स्वतःला उदारपणे देण्यास कचरू नका. खरे तर, अशा प्रेमळ सेवेमुळे केवळ आपण ज्यांची सेवा करतो त्यांच्या जीवनातच बदल घडत नाही; आपल्यालाही अशा सेवेतून अनेकदा विलक्षण विसावा आणि नवी उमेद मिळते.
हे माझ्या उदार प्रभू, तू कोणताही हातचा राखून न ठेवता स्वतःला दिलेस. गरज पडली तेव्हा लोक तुझ्याकडे आले आणि तू प्रेमाने त्यांची सेवा करण्यास कचरला नाहीस. तुझ्यासारखे उदार अंतःकरण मला दे आणि प्रेमाने सेवा करण्यासाठी जेव्हा मला बोलावले जाते, तेव्हा नेहमी “हो” म्हणायला मला मदत कर. इतरांची सेवा करण्यात, विशेषतः जीवनात अचानक आणि अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या प्रसंगी, मला मोठा आनंद मिळवायला शिकू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत पॉल मिकी आणि त्यांचे सहकारी, रक्तसाक्षी




