मराठी

भीतीच्या अंधारातून वाट काढताना

18 एप्रिल 2026
पुनरुत्थानकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील शनिवार
आजची वाचने

समुद्रावरून चालणारा ख्रिस्त आमेदे वारँ यांचे चित्र

व्हिडिओ

त्यांनी होडी वल्हवत सुमारे तीन किंवा चार मैल अंतर कापले, तेव्हा येशू समुद्रावरून चालत होडीजवळ येत असल्याचे त्यांनी पाहिले आणि ते घाबरले. पण तो त्यांना म्हणाला, “मीच आहे. भिऊ नका.” योहान 6:19–20

“मीच आहे. भिऊ नका,” हे आपल्या प्रभूचे शब्द ऐकण्यात आपल्याला किती मोठा दिलासा मिळतो! आपल्या जीवनात त्याची दैवी उपस्थिती जेव्हा जेव्हा आपल्याला जाणवते, तेव्हा तेव्हा हे शब्द आपण ऐकायला हवेत. तो नेहमीच आपल्याला जाणवतो असे नाही, पण तो आपल्याजवळ असतो. आपण श्रद्धेने त्याच्याकडे हात पुढे करतो तेव्हा तो आपल्याला प्रतिसाद देतो. आपल्याला हतबल करणारी भीती तो दूर करतो आणि तिच्या जागी तो आपल्याजवळ आहे, असा भरवसा देतो.

तुम्हाला कशाची भीती वाटते? काही प्रकारची भीती हिताची असते—उदाहरणार्थ, कड्याच्या अरुंद वाटेवरून चालताना खाली पडण्याची भीती. पण रोज आपल्याला भेडसावणाऱ्या इतर काही भीती आपल्या हिताच्या नसतात. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, आपल्याला अपयश येईल का किंवा आपल्याशी कोणी वाईट वागेल का, अशा भीती आपल्या दुर्बलतेतून आणि देवाच्या कृपेला पूर्णपणे शरण न जाण्यातून उद्भवतात. आजच्या शुभवर्तमानात, रात्री वादळ सुरू असताना येशू पाण्यावरून चालत शिष्यांच्या होडीकडे येतो. त्याची ही चमत्कारिक कृती आपल्याला अहितकारक भीतीविषयी एक धडा शिकवते.

भीतीच्या मुळाशी नम्रतेचा अभाव असतो. भीती हे अहंकाराचे फळ आहे; देवावर विसंबण्याऐवजी स्वतःवरच अवाजवी भरवसा ठेवण्यातून अहंकार जन्म घेतो. अहंकाराला सर्व काही आपल्या ताब्यात हवे असते आणि स्वतःची असुरक्षितता मान्य करणे त्याला जड जाते. याउलट, नम्रता आपल्याला हे मान्य करायला शिकवते की आपण देवावर आणि त्याच्या ईश्वरी योजनापूर्वक काळजीवर अवलंबून आहोत. आपल्या क्षमतेवर किंवा निर्णयशक्तीवर असा अवाजवी भरवसा ठेवला की अनिश्चित परिस्थितीला किंवा आपल्या आवाक्याबाहेरच्या आव्हानांना तोंड देताना भीती वाटते. म्हणायला कठीण वाटणाऱ्या नम्रतेच्या विनवणीमालेत हे सुंदर रीतीने व्यक्त केले आहे: “अपमान होण्याच्या… तुच्छ लेखले जाण्याच्या… बोलणी खावी लागण्याच्या… बदनामी होण्याच्या… विसरले जाण्याच्या… थट्टा होण्याच्या… अन्याय सहन करावा लागण्याच्या… संशय घेतला जाण्याच्या भीतीपासून—हे येशू, मला सोडव!”

आजच्या शुभवर्तमानात, भाकरी व मासे वाढवण्याचा चमत्कार केल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना आपल्याआधी पुढे पाठवले. संध्याकाळी ते होडीत बसले आणि समुद्र ओलांडण्यासाठी होडी वल्हवू लागले. त्यांनी “होडी वल्हवत सुमारे तीन किंवा चार मैल अंतर कापले” आणि “आधीच अंधार पडला होता,” तेव्हा भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली: “जोराचा वारा सुटल्यामुळे समुद्र खवळला होता.”

चर्चचे अनेक आद्य धर्मपिते या उताऱ्याकडे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे वर्णन म्हणून पाहतात. त्यातील प्रतीकांमधून आपल्याला अधिक सखोल आध्यात्मिक बोध मिळतो. योहान आपल्या शुभवर्तमानात प्रकाश आणि अंधार या प्रतिमा वारंवार वापरतो. अंधार हे जगाचा प्रकाश असलेल्या ख्रिस्ताच्या अनुपस्थितीचे प्रतीक आहे. रात्रीच्या अंधारात वारा आणि लाटांना तोंड देत होडी वल्हवणारे प्रेषित आपल्या जीवनप्रवासाचे प्रतीक आहेत. समुद्र म्हणजे जग, तर होडी म्हणजे चर्च. जगात येणाऱ्या अडचणींतून वाट काढायला चर्च आपल्याला मदत करते. वारा आणि लाटांचा मारा होत असताना येशू होडीत नसला, तरी तो फार दूर नाही. दुरून त्यांचे काय होत आहे याकडे त्याचे लक्ष आहे, पण तो त्यांना वादळाला तोंड देऊ देतो.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात वादळे येतात. कधीकधी ती आपल्याला गोंधळात टाकतात, तरी भीतीवर मात करायला आपल्याला मदत व्हावी म्हणून देव ती येऊ देतो. नम्रता हा असा सद्गुण आहे जो विशेषतः भीती दूर करतो, कारण तो आपल्याला स्वतःवर विसंबण्याऐवजी देवावर भरवसा ठेवायला शिकवतो. केवळ स्वतःच्या बळावर आपण या जगाचा समुद्र पार करू शकत नाही. लाटा आपल्याला असे हेलकावे देतात की पुढे जाणे कठीण होते, कधी अशक्यही होते. एवढेच नव्हे, तर कधी कधी आपण वाट चुकतो आणि एका वादळातून दुसऱ्या वादळात अडकत राहतो.

आज तुमच्या जीवनात कशामुळे भीती किंवा चिंता वाटते, यावर चिंतन करा. देव तुम्हाला जे स्वातंत्र्य आणि आनंद देऊ इच्छितो, त्यांकडे नेणाऱ्या वाटेवर तुमच्या पावलांना कशाचे ओझे जड होते आणि तुम्हाला वाटेवरून कोणती गोष्ट भरकटवते? कोणत्या गोष्टीला स्वतःच्या बळावर तोंड देणे तुमच्या आवाक्याबाहेर आहे? ती गोष्ट कोणतीही असो, तिला एकट्याने हाताळणे आपल्या शक्तीपलीकडे आहे आणि आपल्याला देवाची गरज आहे, हे स्वतःशी आणि देवासमोर नम्रपणे कबूल करा. असे करताना त्याच्या कृपेच्या सौम्य प्रेरणांकडे कान द्या. तो तुम्हाला म्हणत आहे, “मीच आहे. भिऊ नका,” हे ऐका. त्याला तुमच्या जीवनात येऊ द्या, लाटा शांत करू द्या आणि तो तुम्हाला जिथे नेऊ इच्छितो तिथे सुखरूप पोहोचवू द्या. आपल्या प्रभूवर नम्रपणे विसंबून राहिलात, तर तुम्ही कोणत्याही अंधारातून वाट काढू शकाल.

हे माझ्या सदैव जवळ असणाऱ्या प्रभू, कधीकधी मी तुझ्यापेक्षा स्वतःवरच अधिक विसंबतो. विशेषतः जेव्हा मी दुर्बल असतो आणि मोहाला सहज बळी पडू शकतो, तेव्हा असे घडते. हे प्रभू, मला नम्र कर, म्हणजे या जगाच्या लाटांतून आणि अंधारातून वाट काढताना मला जाणवणाऱ्या प्रत्येक भीतीवर आणि चिंतेवर मात करण्यासाठी माझ्या जीवनातील तुझी उपस्थिती हेच एकमेव उत्तर आणि तोच एकमेव मार्ग आहे, हे मला उमगेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन