19 फेब्रुवारी 2023
सामान्य काळातील सातवा रविवार (वर्ष अ)
आजची वाचने

“‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर आणि आपल्या शत्रूचा द्वेष कर,’ असे सांगितलेले तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हांला सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याची मुले व्हाल. कारण तो वाईट आणि चांगल्या अशा दोघांवरही आपला सूर्य उगवतो आणि नीतिमान व अनीतिमान अशा दोघांवरही पाऊस पाडतो.” मत्तय 5:43–45
आपण आपल्या शत्रूंचा द्वेष करावा, असे जुन्या करारात कुठेही म्हटलेले नाही. लक्षात घ्या, येशू “असे लिहिले आहे…” असे म्हणत नाहीत. त्याऐवजी ते म्हणतात, “असे सांगितलेले तुम्ही ऐकले आहे…” मग हे कोणी सांगितले? शास्त्री आणि परुशी यांच्यातील काही परंपरांमध्ये ही चुकीची समजूत मान्य केली जात होती. काही जण असे मानत असल्यामुळे येशूंनी त्या समजुतीविषयी भाष्य केले.
या उताऱ्यात आणि इतर अनेक ठिकाणी येशू आपल्याला अशा सखोल प्रेमाकडे बोलावतात, जे अनेकांना अशक्य वाटत होते. खरे तर, या उताऱ्याच्या शेवटी येशू स्वतःच आपल्या शिकवणीची उंची दाखवून देतात: “म्हणून तुमचा स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.” जीवनात परिपूर्णतेपेक्षा कमी असलेल्या गोष्टींवर आपण कितीतरी वेळा समाधान मानतो. या जीवनात पवित्रतेची ती पातळी आपण कदाचित कधीच गाठू शकणार नाही, तरीही ते आपले निरंतर ध्येय असले पाहिजे. आपल्या ‘शत्रूंवर’ परिपूर्ण प्रेम करणे हे आपले रोजचे ध्येयकार्य बनले पाहिजे.
मग माझा ‘शत्रू’ कोण? येशू त्याची व्याख्या देत नाहीत; पण ज्या कोणाशी आपल्या नात्यात काही तणाव किंवा वितुष्ट आहे, त्या व्यक्तीचा आपण यात विचार केला पाहिजे. कदाचित कोणी तुमचा द्वेष करत असेल किंवा तुम्हाला पसंत करत नसेल आणि तुमच्याविषयी वाईट बोलत असेल किंवा तुम्हाला वाईट वागणूक देत असेल. किंवा एखादी व्यक्ती तुम्हालाच आवडत नसेल आणि तिचा तुम्हाला राग येत असेल किंवा तुम्ही तिला दोषीही ठरवत असाल. म्हणून, कोणाकोणाविषयी तुमच्या मनात पूर्ण आपुलकी नाही, हे ओळखण्यापासून सुरुवात करा. खरे पाहता, तुम्ही ज्यांच्यावर ‘प्रेम करता’ त्यांच्या यादीपेक्षा या यादीत बरीच जास्त नावे असू शकतात.
कमी-अधिक प्रमाणात शत्रू या गटात मोडणाऱ्या व्यक्ती ओळखल्यावर, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता का, याचा विचार करा. चर्चच्या एका आद्य धर्मपित्याच्या मते, आपण आपल्या शत्रूवर तेव्हा प्रेम करतो, “जेव्हा त्याच्या यशाने आपल्याला दुःख होत नाही किंवा त्याच्या पतनाने आपल्याला आनंद होत नाही.” विचार करण्यासाठी ही व्याख्या फार उपयुक्त आहे. शेवटी, दुसऱ्याच्या यशाने दुःखी होणे किंवा त्याच्या पतनाने आनंदित होणे, हाच मत्सर आहे.
तुम्हाला न आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्रशंसनीय कामात यश मिळवले, तर तुमच्या मनात काय प्रतिक्रिया उमटते? मनात लगेच तीव्र प्रतिक्रिया उमटत असेल किंवा त्या व्यक्तीचे अभिनंदन तरी का करावे, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर कदाचित तुम्ही मत्सराच्या पापाशी झुंजत असाल. किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीला एखादी समस्या भेडसावत आहे, ती अडचणीत सापडली आहे किंवा तिच्यावर काही दुर्दैव ओढवले आहे, असे ऐकल्यावर तुम्ही काय विचार करता, काय बोलता किंवा तुम्हाला काय वाटते, याचा विचार करा. अशा वेळी त्या व्यक्तीची व्यथा समजून घेणे आणि तिचे भले व्हावे अशी इच्छा बाळगणे, ही योग्य प्रतिक्रिया आहे. तुमच्या मनात अशी प्रतिक्रिया उमटत नसेल, तर त्याकडे लक्ष द्या.
आपल्या शिकवणीचा समारोप करताना येशू म्हणतात की त्यांचा पिता “वाईट आणि चांगल्या अशा दोघांवरही आपला सूर्य उगवतो आणि नीतिमान व अनीतिमान अशा दोघांवरही पाऊस पाडतो.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देव सर्वांना सारखेच परिपूर्ण प्रेम आणि दया देतो. फरक इतकाच की काही जण त्या दयेचा स्वीकार करतात, तर काही जण ती नाकारतात. आपणही आपल्या प्रेमळ देवाप्रमाणे भेदभाव न करता सर्वांवर प्रेम केले पाहिजे आणि शक्य तितक्या पूर्णपणे सर्वांना दया दाखवली पाहिजे. काही जण देवाचे प्रेम नाकारतात तसे आपले प्रेमही नाकारतील; तरी आपण ते देत राहिले पाहिजे आणि कधीही मागे घेतले नाही पाहिजे. हेच शेजाऱ्यावरचे प्रेम आणि हेच आपल्या शत्रूंवरचेही प्रेम.
ज्यांच्यावर परिपूर्ण प्रेम करणे तुम्हाला कठीण जाते, अशा व्यक्तींविषयी आज चिंतन करा. कदाचित ही यादी मोठी असेल. ज्यांची तुमच्याशी वारंवार भेट होते किंवा ज्यांच्याविषयी तुमच्या मनात तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटते, त्यांच्यापासून सुरुवात करा. त्यांना आठवून त्यांच्यासाठी प्रार्थना करा: त्यांचे भले व्हावे आणि देवाचा आशीर्वाद त्यांना लाभावा, अशी विनंती करा. त्यांच्यातील काही चांगुलपणा पाहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबद्दल देवाचे आभार मानण्याचा प्रयत्न करा, आणि त्यांच्याविषयी तुमच्या मनात असलेले अनुचित विचार किंवा भावना दूर करण्याचा प्रयत्न करा. येशूंची प्रेमाची नवी आज्ञा पाळण्याच्या तुमच्या ध्येयकार्याची ही पहिली पायरी आहे.
हे माझ्या प्रेमळ प्रभू, चांगले असोत वा वाईट, तू सर्व लोकांवर प्रेम करतोस आणि त्यांच्यावर अमर्याद दया करतोस. त्या प्रेमासाठी माझे अंतःकरण सदैव खुले राहो आणि ते प्रेम माझ्या जीवनात खोलवर रुजो, अशी मी प्रार्थना करतो. ज्यांना तुझ्या प्रेमाची सर्वांत जास्त गरज आहे, त्यांच्या जीवनात ते माझ्याद्वारे उजळून निघो, अशीही मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





