सोमवार, 1 मे 2023
कामगार संत योसेफ यांचे ऐच्छिक स्मरण

येशू आपल्या गावी आला आणि तेथील लोकांना त्यांच्या सभास्थानात शिकवू लागला. ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “याला एवढे ज्ञान आणि अशी अद्भुत कृत्ये करण्याचे सामर्थ्य कोठून मिळाले? हा सुताराचा मुलगा नाही काय?” मत्तय 13:54–55
8 डिसेंबर 2020 रोजी पोप फ्रान्सिस यांनी संपूर्ण चर्चमध्ये ‘संत योसेफ वर्ष’ साजरे करण्यास सुरुवात होत असल्याची घोषणा केली. ‘पित्याच्या हृदयाने’ या शीर्षकाच्या प्रेषितीय पत्राद्वारे त्यांनी या वर्षाची ओळख करून दिली. त्या पत्राच्या प्रस्तावनेत पोप म्हणाले, “रोजच्या जीवनात शांतपणे वावरणाऱ्या आणि कुणाच्या नजरेत न भरणाऱ्या योसेफामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला संकटाच्या वेळी आपल्यासाठी मध्यस्थी करणारा, आधार देणारा आणि मार्ग दाखवणारा एक माणूस सापडू शकतो.”
या स्मृतिदिनासाठी नेमून दिलेल्या वाचनांपैकी वर दिलेले शुभवर्तमान येशू हा ‘सुताराचा मुलगा’ होता, याकडे आपले लक्ष वेधते. योसेफ कामगार होता. धन्य कुमारी मरिया आणि देवाचा पुत्र यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी तो स्वतःच्या हातांनी सुतारकाम करत असे. त्याने त्यांना घर, अन्न आणि दैनंदिन जीवनातील इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या. देवाच्या दूताने त्याला स्वप्नांत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून योसेफाने त्या दोघांचे रक्षणही केले. पिता, पती आणि कामगार या नात्यांनी सेवा करताना योसेफाने आपल्या जबाबदाऱ्या शांतपणे आणि कुणाच्याही नजरेत न भरता पार पाडल्या.
आज आपल्या चर्चमध्ये सर्वत्र योसेफ यांना ओळखले जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणूनही त्यांना मान दिला जातो. पण त्यांच्या हयातीत त्यांच्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नसावे. आपले नेहमीचे कर्तव्य करणारा एक साधा माणूस म्हणूनच लोकांनी त्यांच्याकडे पाहिले असावे. पण अनेक दृष्टींनी, नेमकी हीच गोष्ट संत योसेफ यांना अनुकरणीय आदर्श आणि प्रेरणास्रोत बनवते. लोकांच्या नजरेसमोर राहून इतरांची सेवा करण्याचे पाचारण फार थोड्यांना मिळते. रोजची कर्तव्ये पार पाडल्याबद्दल जाहीर कौतुकही फार थोड्यांचे होते. विशेषतः आईवडिलांच्या कष्टांची अनेकदा पुरेशी दखल घेतली जात नाही. म्हणूनच नाझरेथमध्ये नम्रपणे आणि कोणाच्याही नजरेत न भरता जगलेले संत योसेफ यांचे जीवन बहुतेकांना आपापल्या दैनंदिन जीवनासाठी प्रेरणा देते.
तुमचे जीवन काहीसे एकसुरी असेल, तुम्ही जे करता त्याची लोकांना फारशी दखल नसेल, आणि तुमची कामे जिकिरीची व कधीकधी अगदी कंटाळवाणीही वाटत असतील, तर प्रेरणेसाठी संत योसेफांकडे पाहा. आजच्या स्मृतिदिनी आपण विशेषतः एक कामगार म्हणून योसेफांचा सन्मान करतो. त्यांचे काम अगदी साधे होते. पण आपल्या रोजच्या जीवनातील साध्यासुध्या गोष्टींतच पवित्रता विशेषत्वाने आढळते. या जगात फारसे कौतुक होत नसतानाही, किंबहुना अजिबात होत नसतानाही, दिवसेंदिवस सेवा करत राहण्याची निवड करणे ही प्रेमाची सेवा आहे. असे करून तुम्ही संत योसेफांच्या जीवनाचे अनुकरण करता आणि स्वतःच्या जीवनात पवित्रतेत वाढता. अशा रीतीने आणि इतर साध्यासुध्या, कुणाच्या नजरेत न भरणाऱ्या मार्गांनी केलेल्या सेवेचे महत्त्व कमी लेखू नका.
आज संत योसेफांच्या साध्यासुध्या आणि ‘विशेष लक्ष वेधून न घेणाऱ्या’ दैनंदिन जीवनावर चिंतन करा. कामगार, पती आणि पिता या नात्यांनी त्यांना आले असतील तसेच अनुभव तुम्हालाही येत आहेत, असे जाणवले, तर त्याचा आनंद माना. रोजची साधी कर्तव्ये पार पाडत असतानाच असामान्य पवित्रतेचे जीवन जगण्याचे आवाहन तुम्हालाही आहे, याचा आनंद माना. ती कर्तव्ये नीट पार पाडा. ती प्रेमाने पार पाडा. संत योसेफ आणि त्यांच्या या साध्या दैनंदिन जीवनात सहभागी असलेली त्यांची पत्नी, धन्य कुमारी मरिया, यांच्याकडून प्रेरणा घेऊन ती पार पाडा. हे लक्षात ठेवा: तुम्ही दररोज जे काही करता, ते प्रेमापोटी आणि इतरांच्या सेवेसाठी केले, तर तुमचे जीवन पवित्र होण्याचा तो सर्वांत खात्रीचा मार्ग आहे.
हे माझ्या येशू, सुताराच्या पुत्रा, या पृथ्वीवरील तुझे पिता संत योसेफ ही एक देणगी आहे आणि त्यांच्या जीवनातून मला प्रेरणा मिळते, याबद्दल मी तुझे आभार मानतो. त्यांनी मोठ्या प्रेमाने आणि जबाबदारीने जगलेल्या साध्या जीवनाबद्दल मी तुझे आभार मानतो. माझ्या रोजच्या कामाची आणि सेवेची कर्तव्ये नीट पार पाडून त्यांच्या जीवनाचे अनुकरण करण्यास मला मदत कर. माझे स्वतःचे जीवन पवित्र होण्यासाठी संत योसेफ यांच्या जीवनात मला एक उत्तम आदर्श दिसू दे. हे कामगार संत योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना करा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – कामगार संत योसेफ
पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन
वर दिलेली छायाचित्रे: कामगार संत योसेफ (फ्लिकरवरून)




