19 जानेवारी 2025
सामान्य काळातील दुसरा रविवार, वर्ष क
आजची वाचने
छायाचित्र : दिमित्रिस वेत्सिकास (स्रोत: पिक्साबे)
गालीलमधील काना येथे येशूने हे पहिले चिन्ह केले. अशा रीतीने त्याने आपले गौरव प्रकट केले आणि त्याचे शिष्य त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. योहान 2:11
योहानाच्या शुभवर्तमानाचे सामान्यतः चार भाग मानले जातात: प्रस्तावना, चिन्हांचे पुस्तक, गौरवाचे पुस्तक आणि उपसंहार (ज्यात पुनरुत्थित येशूने गालीलमध्ये दर्शन दिल्याचा वृत्तान्त आहे). आजचे शुभवर्तमान चिन्हांच्या पुस्तकाच्या सुरुवातीचा भाग आहे. हे पुस्तक 1:19 पासून सुरू होते आणि 12 व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत चालते. या भागात प्रेषित योहान आपल्यासमोर सात ‘चिन्हे’ मांडतो; ती म्हणजे येशूने केलेले सात चमत्कार. प्रत्येक चिन्हाचा एक सखोल आध्यात्मिक अर्थ आहे, जो येशूचे देवत्व आणि त्याचे कार्य प्रकट करतो. अनेक प्रकारे, संपूर्ण चिन्हांचे पुस्तक आपल्याला गौरवाच्या पुस्तकासाठी तयार करते. गौरवाच्या पुस्तकात येशूच्या गौरवाची ‘घटिका’ म्हणजे तो क्रुसाच्या गौरवशाली सिंहासनावर आरूढ होतो, सर्वांच्या तारणासाठी स्वतःचे जीवन अर्पण करून ‘देवाचे कोकरू’ म्हणून आपले कार्य पूर्ण करतो आणि आपल्या जखमी कुशीतून कृपा व दया विपुलपणे ओततो, ती घटिका होय.
योहानाच्या शुभवर्तमानात येशूने केलेल्या सात चिन्हांपैकी पहिले चिन्ह म्हणजे काना येथील लग्नात पाण्याचे द्राक्षारसात केलेले रूपांतर. आणि तो द्राक्षारस किती मुबलक होता! काठोकाठ पाण्याने भरलेल्या सहा दगडी रांजणांतील पाण्याचे रूपांतर तब्बल 180 गॅलन उत्तम प्रतीच्या द्राक्षारसात झाले. येशूने आपल्या आईच्या विनंतीवरून पाण्याचे द्राक्षारसात रूपांतर केले. ‘तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा,’ असे तिने सेवकांना सांगितले होते.
या अद्भुत चमत्कारात चिंतन करण्यासारखे खरोखरच पुष्कळ आहे. या चिन्हांपैकी पहिल्या चिन्हाचा वृत्तान्त वाचताना एक गोष्ट विशेष लक्षात घ्यावी: येशू आपल्या चमत्कारांद्वारे शिष्यांना येणाऱ्या कृपेच्या आणि गौरवाच्या ‘घटिकेसाठी’ तयार करतो. येशूची ती घटिका इतिहासात आधीच येऊन गेली असली, तरी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनात त्या घटिकेसाठी स्वतःची तयारी करून घेणे आवश्यक आहे. त्या गौरवाच्या घटिकेसाठी ख्रिस्ताने आपल्याला सतत तयार करावे, यासाठी आपण त्याला वाव दिला पाहिजे. त्या घटिकेत आपण त्याचा आणि त्याने क्रुसावर आपल्यासाठी मिळवलेल्या सर्व कृपेचा स्वीकार करतो. योहानाच्या शुभवर्तमानात दाखवल्याप्रमाणे ही तयारी आपल्या जीवनातही घडेल. येशूने सात चिन्हे, म्हणजेच सात चमत्कार, केले ते क्रुसावर त्याने दिलेल्या सर्व देणग्या स्वीकारण्यास आपल्या शिष्यांना तयार करण्यासाठी. वर्षभर योहानाने नोंदवलेल्या या चिन्हांवर आपण प्रार्थनापूर्वक चिंतन केले पाहिजे. त्याचबरोबर आपला प्रभू आपल्यापैकी प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या देत असलेली अनेक चिन्हेही आपण शोधली पाहिजेत.
काना येथील लग्नाला उपस्थित असलेले लोक येशूचा चमत्कार पाहून थक्क झाले. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनात तो जे करतो त्याचे आपल्याला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटू द्यावे. पवित्र शास्त्रात नोंदवलेली ही सात चिन्हे आणि त्यांवरील आध्यात्मिक चिंतनातून आपल्यात घडणारा बदल हे दोन्ही आपल्यासाठी मार्गदर्शक दीप ठरले पाहिजेत. त्यामुळे आपल्या प्रभूला अधिक पूर्णपणे ओळखण्यास आणि त्याने आपल्या गौरवशाली क्रुसाद्वारे मिळवलेल्या कृपेचा स्वीकार करण्यास आपण तयार होऊ.
आज येशूच्या या पहिल्या चिन्हावर चिंतन करा. आपल्या जीवनात त्याची कृपा अधिक पूर्णपणे स्वीकारण्याची तयारी म्हणून या प्रसंगाचे मनन करा. या चमत्कारात दिसलेल्या विपुलतेचा विचार करा आणि देव तुम्हाला किती विपुल कृपा देऊ इच्छितो, हे ती विपुलता कसे दाखवते यावर चिंतन करा. हा चमत्कार येशूच्या प्रिय मातेच्या मध्यस्थीने घडला, याचाही विचार करा. ती तुमच्याही गरजा आधीच ओळखेल आणि मातेच्या ममतेने तुमच्यासाठी प्रार्थना करेल. या उताऱ्यातील सुंदर अर्थ आणि प्रतीके यांचे मनन करा, म्हणजे तुम्हाला देवाच्या विपुल गौरवात अधिक पूर्णपणे सहभागी होता येईल.
हे माझ्या गौरवशाली प्रभू, पापांच्या क्षमेसाठी तू क्रुसावर आपले जीवन बलिदान म्हणून अर्पण केलेस, त्या घटिकेची तयारी म्हणजे तुझे संपूर्ण पृथ्वीवरील जीवन होते. तुझा अधिक पूर्णपणे स्वीकार करण्यास आणि तुझ्यासाठी व तुझ्या प्रेमाच्या परिपूर्ण बलिदानाद्वारे तू मला दिलेल्या सर्व देणग्यांसाठी माझे हृदय उघडण्यास मला सतत तयार कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.





