मराठी

जगाचा द्वेष

२४ मे २०२५
पुनरुत्थान काळातील पाचव्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने

यान मीन्से मोलेनार, सार्वजनिक मालकीतील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने

व्हिडिओ

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “जर जग तुमचा द्वेष करत असेल, तर लक्षात ठेवा की त्याने तुमच्या आधी माझा द्वेष केला. तुम्ही जगाचे असता, तर जगाने आपले म्हणून तुमच्यावर प्रेम केले असते. पण तुम्ही जगाचे नाही आणि मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.” योहान 15:18–19

“जग तुमचा द्वेष करते,” हे वचन आपल्याला अंतर्मुख करते. म्हणजेच, जर आपल्या प्रभूने तुम्हाला जगातून बाहेर काढले असेल, तर जग तुमचा द्वेष करील, असे येशू सांगतो.

कोणी आपला द्वेष करावा, असे कुणालाही वाटत नाही. दुसऱ्या कुणाच्या संतापाला, छळाला, हल्ल्यांना किंवा उपहासाला सामोरे जावे, असेही कुणाला वाटत नाही. द्वेष कुरूप आणि वेदनादायक असतो; तो सहन करणे कठीण असते. पण हा द्वेषाच्या स्वभावाचाच एक भाग आहे. द्वेष हा केवळ छळाचा प्रकार नाही; तो दुसऱ्याला आपल्या मनाप्रमाणे वागवण्याचाही एक मार्ग आहे. द्वेष करणारी व्यक्ती दुसऱ्यावर हल्ला करून त्याला दुखावण्याचा आणि त्याच्यावर दबाव आणून त्याला बदलण्याचा व आपल्या इच्छेप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करते. लौकिक आणि ख्रिस्ती मूल्ये न मानणाऱ्या या ‘जगाला’ तुम्हाला आपल्या बाजूला वळवून देवापासून दूर नेण्याची इच्छा आहे. येशू ही शिकवण देतो, त्यामागचा एक हेतू आपल्याला तयार करणे हा आहे: जगाचा द्वेष आपल्याला खरोखर अनुभवावा लागेल, तेव्हा त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये आणि त्याच्या दबावाला बळी पडून आपण येशूपासून दूर जाऊ नये. म्हणूनच या शिकवणीतून आपल्या प्रभूची अपार दया प्रकट होते.

येशूने आपल्या आत्म्याच्या तीन शत्रूंचा उल्लेख केला होता, हे लक्षात ठेवा: देह, सैतान आणि जग. शुभवर्तमानाच्या या उताऱ्यात ‘जगाचे असणे’ म्हणजे जगात खोलवर रुजलेल्या असंख्य असत्यांचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ देणे. लौकिक प्रसारमाध्यमे, लोकप्रिय संस्कृती, पक्षपाती मते, समाजाचा दबाव, सुखाची भ्रामक चित्रे आणि अशा इतर गोष्टी सतत आपली दिशाभूल करून आपल्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. पैसा, आपले बाह्य रूप, आपल्या कर्तृत्वाला मिळणारी दाद आणि अशा इतर अनेक गोष्टींतच जीवनाचे समाधान आहे, असे मानण्याचा मोह आपल्याला वारंवार होतो. आपली मते आजच्या काळातील लौकिक मूल्यांशी जुळलीच पाहिजेत, असे जग आपल्याला सांगते. ती जुळली नाहीत, तर आपण इतरांना दोष देणारे, संकुचित विचारांचे अतिरेकी आहोत आणि आपल्याला वाळीत टाकले पाहिजे, जाहीरपणे बहिष्कृत केले पाहिजे किंवा आपला आवाज दाबला पाहिजे, असे ते मानते.

हे जगाचे मोह आणि दबाव खरे आहेत. म्हणूनच येशूची वचने आपल्याला मुक्त करतात. आपण आपली श्रद्धा सर्वांना दिसेल अशी उघडपणे जगतो, तेव्हा आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्याचे आणि फसवण्याचे जे प्रयत्न होतात, त्यांच्या प्रभावातून ही वचने आपल्याला मुक्त करतात. आपण असे जगलो, तर जग आपला द्वेष करील. पण हे आधीच ठाऊक असल्यामुळे, तसे घडते तेव्हा आपल्या मनात शांती टिकून राहते.

आज येशूच्या या सामर्थ्यशाली आणि दिलासा देणाऱ्या शब्दांवर चिंतन करा. जगाकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा द्वेष अनुभवावा लागत नसेल, तर ही काळजी करण्यासारखी आणि चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या द्वेषाला सामोरे जावे लागत असेल, तर लक्षात ठेवा: आपल्या प्रभूने तुम्हाला यासाठी तयार केले आहे आणि हा द्वेष आनंदाने सहन करता यावा म्हणून तो तुम्हाला आपले सामर्थ्य आणि धैर्य देतो. शेवटी, आपल्या प्रभूला काय वाटते, एवढेच महत्त्वाचे आहे—बाकी कशालाही महत्त्व नाही. जगाकडून कोणत्याही स्वरूपाचा द्वेष तुम्हाला सहन करावा लागत असेल, तर लक्षात ठेवा की त्यामुळे तुम्ही स्वतः ख्रिस्तासारखे अधिकाधिक होत जाता.

हे छळ सहन केलेल्या माझ्या प्रभू, जगाच्या खोट्या मूल्यांच्या आहारी गेलेल्या अनेकांचा द्वेष आणि उपहास तू सहन केलास. माझी प्रार्थना आहे की तुझ्या प्रेम आणि दयेच्या जीवनात मला सहभागी होता यावे आणि मलाही जगाचा द्वेष सहन करावा लागतो, तेव्हा तुझ्या सामर्थ्यातही मला वाटा मिळावा. मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो आणि प्रार्थना करतो की तू मला जगातून सतत बाहेर काढावे आणि आपल्या अधिक जवळ आणावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय


  Subscribe to our YouTube channel  
  to be notified about new content.