25 मे 2025
पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने
छायाचित्र सौजन्य: अडोबी स्टॉक
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जो माझ्यावर प्रेम करतो तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याजवळ वस्ती करू. जो माझ्यावर प्रेम करत नाही तो माझी वचने पाळत नाही. तरी तुम्ही ऐकता ते वचन माझे नाही, तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.” योहान 14:23–24
पिता आणि पुत्र एक आहेत. त्यांचे ऐक्य सर्व बाबतींत परिपूर्ण आहे. दोघांचाही दैवी स्वभाव एकच आहे. तरीही ते भिन्न व्यक्ती आहेत. एकच देव म्हणून ते पूर्णपणे एक आहेत; त्याचबरोबर ते परस्परांशी प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या ऐक्यात राहू शकतात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या त्रैक्याचे रहस्य इतके गहन आहे की आपण त्यांना कधीही पूर्णपणे समजून घेऊ शकणार नाही. ज्या देवाला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, तोच हा ‘पूर्णपणे जाणता न येणारा देव’ आहे. म्हणून देवाशी असलेले आपले नाते हा एक अखंड प्रवास आहे. या प्रवासात आपण दररोज आणि अनंतकाळपर्यंत या रहस्यात अधिकाधिक खोलवर जात राहतो.
आजचे शुभवर्तमान आपल्याला देवाच्या गौरवशाली ऐक्याची झलक दाखवते; पण ते तेवढ्यावरच थांबत नाही. आपल्याकडे येऊन आपल्या अंतःकरणात वस्ती करण्याची देवाच्या हृदयातील इच्छाही ते प्रकट करते. आपण देवावर प्रेम केले आणि त्याचे वचन पाळले, तर पवित्र त्रैक्य आपल्याकडे येईल आणि आपल्या अंतःकरणात वस्ती करील. “जो माझ्यावर प्रेम करतो तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याजवळ वस्ती करू.” देवाच्या ऐक्यात सहभागी होण्याचे हे आमंत्रणही इतके गहन रहस्य आहे की ते शब्दांत मांडता येत नाही.
लहानपणी कदाचित तुम्हाला क्लोव्हरचे तीन पर्णिका असलेले पान दाखवून पवित्र त्रैक्याचे रहस्य शिकवले असेल. प्रत्येक पर्णिका एका दैवी व्यक्तीचे प्रतीक आहे, तर संपूर्ण पान त्यांच्या ऐक्याचे प्रतीक आहे. देव कोण आहे हे समजून घेण्याची सुरुवात करायला हे साधे उदाहरण आपल्याला मदत करते. पण प्रत्यक्षात देव स्वतः कोण आहे हे आपल्याला पूर्णपणे उलगडून दाखवायला एकच गोष्ट मदत करू शकते. ती कोणती? येशूने नेमके हेच सांगितले: देवाचे वचन प्रेमाने पाळणे.
देवाचे वचन पाळणे ही त्याच्यावरचे आपले प्रेम व्यक्त करण्याची सर्वोत्तम रीत आहे. कारण देवाचे वचन हे परिपूर्ण सत्य आहे. हे सत्य समजून घेऊन आपण त्यानुसार जगतो, तेव्हाच आपले प्रेम कृतीत उतरते. इतकेच नव्हे, तर अशा प्रेमळ आज्ञापालनातून आपल्या कल्पनेपलीकडची एक गोष्ट घडते. परमपवित्र त्रैक्य आपल्या आत्म्यांत वस्ती करते: “…आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याजवळ वस्ती करू.”
ही भाषा अस्पष्ट आणि गूढ वाटली, तरी जेव्हा परमपवित्र त्रैक्य एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात वस्ती करण्यास येते, तेव्हा धुके हळूहळू निवळू लागते आणि रहस्य उलगडू लागते. म्हणून परमपवित्र त्रैक्याच्या जीवनाचे हे आकलनापलीकडचे रहस्य जाणून घेण्याची सुरुवात करण्याचा एकच मार्ग आहे: त्रैक्याला आपल्या अंतःकरणात वस्ती करू देणे. देवाला असे आमंत्रण देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्यावर प्रेम करणे. आणि त्याच्यावर प्रेम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवाचे वचन पाळणे. येशू हाच देवाचे वचन आहे. विशेषतः पवित्र शास्त्राचे वाचन करून आणि त्यात जाहीर केलेल्या संदेशानुसार जगून आपण येशूला देवाचे वचन म्हणून ओळखू लागतो.
तुम्हाला दिलेल्या सर्वांत महत्त्वाच्या पाचारणावर आज चिंतन करा. देवाचे निवासस्थान बनणे हेच तुमचे ध्येय आहे. देवावर प्रेम केल्यानेच हे ध्येय साध्य होते, आणि ते प्रेम त्याचे वचन पाळण्यातून व्यक्त होते. आज्ञापालनाचा अर्थ मननपूर्वक विचारात घ्या. देवाला सांगा की प्रेम करण्याविषयी त्याने दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळाल. आपल्या कृतींकडे पाहा आणि आपल्या प्रभूने दिलेल्या आज्ञांपैकी कोणत्या आज्ञा पाळण्यात तुम्ही कमी पडता याचा विचार करा. जिथे तुम्ही वाट चुकत आहात असे दिसेल, तिथे स्वतःला सुधारणे हा केवळ अधिक गाढ प्रेमाकडे जाण्याचा मार्ग नाही; तुमच्या अंतःकरणात राहून तुमच्याशी एकरूप होऊ इच्छिणाऱ्या त्रिएक देवाशी अधिक पूर्ण ऐक्य साधण्याचाही तो मार्ग आहे.
हे परमपवित्र त्रैक्या, हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या ऐक्या, ये आणि माझ्या अंतःकरणात वस्ती कर. तुझ्यावर प्रेम करण्याची देणगी मला दे, अशी मी प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र वचनातून प्रकट झालेली तुझी प्रत्येक आज्ञा पाळण्यातून हे प्रेम व्यक्त होऊ दे. तुझ्या आज्ञा पाळण्यात मी कुठे कुठे दिरंगाई करतो, याची मला अधिक स्पष्ट जाणीव होऊ दे, म्हणजे मी माझे वर्तन बदलून माझे अंतःकरण तुझ्यासाठी अधिक पूर्णपणे उघडू शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – यंदा हा दिवस रविवारी येत असल्याने उपासनाविधीत या संतांचे स्मरण साजरे केले जात नाही
पूजनीय संत बीड, धर्मगुरू व चर्चचे आचार्य
संत ग्रेगरी सातवे, पोप व व्रतस्थ
संत मेरी माग्दालेन दे पाझी, कुमारी





