मराठी

कृपेने झालेले परिवर्तन

28 जुलै 2025
सामान्य काळातील सतराव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

फिलिप मेडहर्स्ट, FAL, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने

व्हिडिओ

त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. एका स्त्रीने खमीर घेऊन ते तीन मापे गव्हाच्या पिठात मिसळले आणि अखेर सर्व पीठ फुगले.” मत्तय 13:33

खमिराचा परिणाम मोठा असतो. पावाच्या एका लादीत खमीर बहुतेकदा जेमतेम 1% असते, तरी त्याच्यामुळे लादीचा आकार दुपटीहून अधिक होतो. शिवाय, पीठ फुगत असताना ते मऊ आणि लवचीक बनवण्याचे आश्चर्यकारक कामही खमीर करते. खमीर नसते तर मळलेले पीठ घट्ट राहिले असते आणि त्याचा आकारही खूप लहान राहिला असता. त्या पिठापासून जसा पाव व्हायला हवा, तसा तो झाला नसता.

एकाच वाक्याच्या या छोट्याशा दाखल्याचे अनेक अर्थ चर्चच्या आद्य धर्मपित्यांनी सांगितले आहेत. काहींच्या मते, पिठाची तीन मापे आपल्या आत्म्याचे, जीवाचे आणि शरीराचे प्रतीक आहेत; या तिन्हींमध्ये शुभवर्तमान रुजवले जाते. इतरांच्या मते, ती तीन मापे तीन प्रकारच्या व्यक्तींचे किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या फळांच्या तीन पातळ्यांचे प्रतीक आहेत. काही जण खमीर म्हणजे पवित्र शास्त्रातील शुभवर्तमानाचा संदेश असे समजतात, तर इतरांच्या मते ते देवावर आणि शेजाऱ्यावर करायचे प्रेम आहे, जे आपल्या संपूर्ण जीवनात आणि साऱ्या जगात भिनले पाहिजे. येशूच्या दाखल्यांत आणि पवित्र शास्त्रातील प्रत्येक शिकवणीत समजून घेण्याचे अनेक स्तर आणि अर्थ आहेत. ते सर्व योग्य आहेत आणि एकमेकांशी सुसंगत आहेत. चिंतन करण्याजोग्या सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक हा आहे: या दाखल्यातून देव तुम्हाला काय सांगू इच्छितो?

आपणच ते तीन मापे पीठ आहोत आणि खमीर म्हणजे देव, त्याचे पवित्र वचन आणि आपल्याशी बोलणारा त्याचा सौम्य पण स्पष्ट आवाज आहे, असे समजा. मग त्याचा थेट परिणाम म्हणून तुमचे जीवन कोणकोणत्या ठोस मार्गांनी बहरताना तुम्हाला दिसते? देव तुमच्या जीवनात प्रवेश करतो तेव्हा, तुम्ही जसे घडावे अशी त्याची इच्छा आहे, तसे तुम्ही कसे घडत आहात, हे तुम्हाला दिसते का? आणि हा परिणाम तुमच्यात खरोखर परिवर्तन घडवतो, इतकेच नव्हे तर त्याचा प्रभाव कित्येक पटींनी वाढतो, असे तुम्हाला जाणवते का?

कधीकधी देवाच्या वचनाचा आपल्या जीवनावर फारसा परिणाम होत नाही, किंवा अजिबातच होत नाही. अर्थात, यात देवाच्या वचनाचा दोष नाही; आपणच देवाला आपल्यात परिवर्तन घडवू देत नाही. खमिराचे काम व्हावे म्हणून मळलेले पीठ काही वेळ तसेच ठेवावे लागते. आपल्या जीवनातही देवाला त्याचे कार्य करू द्यायचे असेल, तर त्याला सौम्यपणे आणि सामर्थ्याने कार्य करू दिले पाहिजे. यासाठी देव आपल्याला जे काही सांगतो ते आपण मनात खोलवर रुजवले पाहिजे. मग प्रार्थनापूर्वक त्याला आपल्या अंतरंगात कार्य करू दिले पाहिजे आणि त्याच्या दैवी योजनेनुसार परिवर्तन हळूहळू पण निश्चितपणे घडू दिले पाहिजे.

कधीकधी देवाचे कार्य होत असताना आपण अधीरही होतो. लक्षात ठेवा, खमिराला काम करण्यासाठी वेळ लागतो. देवाच्या कृपेचा परिणाम दिसण्याची वाट पाहताना आपण अधीर झालो, तर ते खमिराला काम करायची संधी मिळण्याआधीच पीठ पुन्हा पुन्हा मळण्यासारखे होईल. पण आपण प्रार्थनेत धीर धरला आणि देवाला त्याच्या इच्छेनुसार, त्याने ठरवलेल्या वेळी, आपल्या जीवनात कार्य करू दिले, तर त्याने सुरू केलेले परिवर्तन आपल्याला हळूहळू अनुभवता येईल.

आज या छोट्याशा पण प्रभावी दाखल्यावर चिंतन करा. स्वतःला त्या मळलेल्या पिठासारखे समजा, आणि देव व तुमच्या जीवनातील त्याचे कार्य हे त्या खमिरासारखे आहे असे पाहा. हे चित्र मनात ठेवून प्रार्थना करताना, देवाला तुमच्या अंतःकरणात कसे कार्य करायचे आहे आणि तो तुम्हाला कसे बदलू इच्छितो, हे त्यानेच तुम्हाला उलगडून दाखवू द्या. धीर लाभावा म्हणून प्रार्थना करा. तुम्हाला बदलून टाकणारे त्याचे वचन तुम्ही आपल्या आत्म्यात स्वीकारले, तर देव आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करील, असा त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि असे घडले, तर तुम्ही जसे व्हावे अशी देवाची इच्छा आहे, तसे तुम्ही खरोखर व्हाल, असाही विश्वास ठेवा.

हे माझे परिवर्तन घडवणाऱ्या प्रभू, माझ्या जीवनाच्या खोलवर प्रवेश करून माझे संपूर्ण अस्तित्व व्यापण्याची तुझी इच्छा आहे. मला हळूहळू बदलून, मी जसे व्हावे अशी तुझी इच्छा आहे, तसे मला घडवायचे आहे. माझ्यात तुला जे काही घडवायचे आहे त्याकडे लक्ष देण्यास आणि तू आधीच सुरू केलेल्या परिवर्तनाची धीराने वाट पाहण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय