मराठी

उपवासाचे महत्त्व

19 जानेवारी 2026
सामान्य काळातील दुसऱ्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

प्रतिमा सौजन्य: अडोबी स्टॉक

व्हिडिओ

योहानाचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपवास करीत असत. लोकांनी येशूकडे येऊन आक्षेप घेतला, “योहानाचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपवास करतात, पण तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?” येशूने त्यांना उत्तर दिले, “वर सोबत असताना लग्नाचे पाहुणे उपवास करू शकतात का?” मार्क 2:18–19

जुन्या कराराच्या काळात उपवास करण्याची प्रथा रूढ होती. पश्चात्ताप किंवा शोक व्यक्त करण्यासाठी, किंवा देवाच्या हस्तक्षेपासाठी स्वतःला तयार करण्यासाठी लोक उपवास करीत. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या शिष्यांच्या बाबतीत हे विशेषतः खरे होते. पश्चात्ताप करा आणि मशीहाच्या आगमनासाठी तयार व्हा, या योहानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ते उपवास करीत.

परुशी उपवास करीत असत, पण त्यांचा उपवास अनेकदा दिखाव्यासाठी असे. त्यातून ते आपल्या भक्तीचा खोटा आव आणत. परुशी आणि जकातदार यांच्या दृष्टान्तातील परुश्याची प्रार्थना आठवा: “परुशी आपल्या जागी उभा राहून मनात अशी प्रार्थना करू लागला, ‘हे देवा, मी इतर लोकांसारखा लोभी, अप्रामाणिक किंवा व्यभिचारी नाही, आणि या जकातदारासारखाही नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व उत्पन्नाचा दशांश अर्पण करतो’” (लूक 18:11–12). 

आजच्या शुभवर्तमानात येशू स्पष्ट करतो की त्याचे शिष्य आता उपवास करीत नाहीत, पण असा दिवस येईल, जेव्हा त्यांना उपवास करावा लागेल. आपण देवाच्या लोकांचा वर आहोत, अशी आपली दैवी ओळख प्रकट करताना येशू हे स्पष्ट करतो.

देवाने संदेष्ट्यांद्वारे आपल्या लोकांशी असलेल्या नात्याचे वर्णन अनेकदा विवाहाच्या कराराच्या रूपात केले. यशया म्हणाला, “कारण तुझा निर्माणकर्ता हाच तुझा पती आहे; सेनाधीश प्रभू हे त्याचे नाव आहे. इस्राएलचा पवित्र देव हाच तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात” (यशया 54:5). होशेयाने भाकीत केले, “मी तुला कायमचे माझी वधू म्हणून वरीन; न्यायाने आणि नीतीने, निष्ठेने आणि करुणेने मी तुला वरीन…” (होशेय 2:22–23).

येशू हा वर प्रत्यक्ष त्यांच्यासोबत होता, तोपर्यंत त्याचे शिष्य जणू आपल्या लग्नाच्या मेजवानीत होते. देव त्यांच्याशी जो नवा विवाहकरार करत होता, त्याचा आनंद ते साजरा करत होते. अशा मेजवानीत उपवास करणे उचित नव्हते. तरीही, “असे दिवस येतील, जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर नेले जाईल; आणि त्या दिवशी ते उपवास करतील” (मार्क 2:20). हा येशूच्या दुःखसहनाचा, मरणाचा आणि स्वर्गारोहणाचा संदर्भ आहे. आपल्या रक्ताने नव्या विवाहकरारावर शिक्कामोर्तब होईल आणि आपले पृथ्वीवरील कार्य पूर्ण होईल, तेव्हा “त्या दिवशी ते उपवास करतील,” असे त्याने भाकीत केले. तो दिवस आजच आहे!

सुरुवातीच्या ख्रिस्तसभेतही उपवासाची प्रथा रूढ होती: “ते प्रभूची उपासना करीत आणि उपवास करीत असताना पवित्र आत्मा म्हणाला, ‘ज्या कार्यासाठी मी बर्णबा आणि शौल यांना बोलावले आहे, त्या कार्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.’ मग उपवास व प्रार्थना पूर्ण केल्यावर त्यांनी त्या दोघांवर हात ठेवले व त्यांना पाठवून दिले” (प्रेषितांची कृत्ये 13:2–3). या प्रसंगी, शौल आणि बर्णबा यांना पाठवण्याची तयारी करताना, त्यांच्यावर सोपवलेले कार्य ओळखण्यास अंत्युखियातील शिक्षकांना आणि संदेष्ट्यांना उपवासाची मदत झाली.

आज येशू आपल्याला नियमित उपवास करण्याचे आणि आत्मसंयमासाठी इतर त्याग करण्याचे आवाहन करतो. एवढेच नव्हे, तर हे आचरण आपल्या आध्यात्मिक वाटचालीचा अत्यावश्यक भाग आहे. नव्या करारात ही शिकवण स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, आपल्या सेवाकार्याच्या सुरुवातीला येशू वाळवंटात गेला आणि त्याने “चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला” (मत्तय 4:2). आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्याचा आणि दुष्टाच्या प्रलोभनांवर मात करण्याचा प्रयत्न करताना उपवास किती मोलाचा आहे, हे येशूने स्वतःच्या उदाहरणाने दाखवले.

आपल्याला आपल्या प्रभूचे अनुकरण करायचे असेल, त्याच्याशी असलेले कराराचे नाते अधिक दृढ करायचे असेल आणि त्याचे कार्य पुढे न्यायचे असेल, तर आपण नियमित उपवास केला पाहिजे. वर्षातून केवळ दोन दिवशी—राखेच्या बुधवारी आणि पवित्र शुक्रवारी—उपवास करणे बंधनकारक असले, तरी दर आठवड्याला, विशेषतः शुक्रवारी, उपवास करण्यास आणि त्याची सांगड आपल्या प्रार्थनाजीवनाशी घालण्यास आपल्याला प्रोत्साहन दिले जाते.

आज तुम्ही उपवास कसा करता आणि आत्मसंयमासाठी नियमितपणे कोणते इतर त्याग करता, यावर चिंतन करा. उपवास ही अंतःकरणाची शिस्त आहे. ती आपल्याला दुःख सहन करणाऱ्या ख्रिस्ताशी एकरूप करते आणि त्याची विपुल कृपा स्वीकारण्यासाठी आपली अंतःकरणे तयार करते. देहाच्या मोहांवर आणि या जगात आपले लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींवर मात करण्यास उपवास आपल्याला मदत करतो. त्यामुळे स्वर्गात आपली वाट पाहत असलेल्या शाश्वत विवाहभोजनाकडे आपले मन पुन्हा वळते. उपवास हा ओझे आहे असे न मानता, पवित्रतेत वाढण्याची, वराशी असलेले कराराचे नाते अधिक दृढ करण्याची आणि तो तुम्हाला ज्या कार्यासाठी पाठवतो त्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होण्याची आनंदाची संधी म्हणून त्याचा स्वीकार करा.

हे माझ्या प्रभू, माझ्या वरराजा, तू आपले रक्त सांडून माझ्याशी प्रेमाचा आणि तारणाचा नवा करार प्रस्थापित केला आहेस. हा करार अधिक दृढ करावा आणि तू माझ्यावर सोपवलेल्या कार्याशी एकनिष्ठ राहावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे. माझ्या अनियंत्रित वासनांमुळे मला मोह होतो किंवा जगाच्या आमिषांमुळे माझे लक्ष विचलित होते, तेव्हा उपवासाची गरज आणि त्यातून मिळणारी कृपा यांची मला आठवण करून दे. उपवासाच्या आध्यात्मिक फळांची आनंदाने वाट पाहत आणि तुझ्या दैवी तरतुदीवर अधिक भरवसा ठेवत, ही पवित्र साधना मनापासून स्वीकारण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

जीवनासाठी नऊ दिवसांची नोव्हेना
‘जीवनासाठी ९ दिवस’ ही मानवी जीवनाच्या रक्षणासाठीची नोव्हेना आहे. प्रत्येक दिवसाच्या प्रार्थनेच्या हेतूसोबत एक छोटे चिंतन आणि जीवनाचा आदर करणारी संस्कृती घडवण्यासाठी काही कृती सुचवल्या आहेत. 

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय