मराठी

देवाच्या परिपालनावर विसंबून राहणे

रविवार, 15 जुलै 2018

सामान्य काळातील पंधरावा रविवार, वर्ष ब

आजची वाचने

संत बोनावेंचर, बिशप व ख्रिस्तसभेचे धर्माचार्य – स्मृतिदिन

त्याने त्यांना सांगितले की प्रवासासाठी हातातल्या काठीशिवाय काहीही घेऊ नका—अन्न नको, झोळी नको, कमरेच्या पट्ट्यात पैसेही नकोत.  मार्क 6:8

तुमच्या जीवनातल्या अगदी लहानसहान गोष्टींचीही देव काळजी घेतो का?  तुम्हाला योग्य अन्न आणि निवारा मिळावा, याची त्याला काळजी आहे का?  तुम्हाला भावनिक, भौतिक आणि आध्यात्मिक आधार मिळावा, याचीही त्याला काळजी आहे का?  हो, नक्कीच आहे!

देव आपली किती पूर्णपणे काळजी घेतो, हे कधीकधी आपल्या लक्षात येत नाही. दैनंदिन प्रश्नांमुळे मनात उठणाऱ्या भीतीच्या आणि चिंतेच्या विळख्यात आपण सापडू शकतो. उद्यासाठी, किंबहुना आजच्याही गरजा भागवण्यासाठी, आपल्याकडे पुरेसे असेल की नाही, अशी काळजी आपल्याला वाटू शकते. नातेसंबंध, भावना, भौतिक गरजा, आध्यात्मिक बळ अशा जीवनाच्या सर्व अंगांबद्दल ही चिंता आपल्याला भेडसावू शकते.

एक गोष्ट आपण निःसंशयपणे जाणून घेतली पाहिजे: देवाचे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते.  त्याला सर्व काही माहीत आहे आणि तो आपल्यावर इतके पूर्ण प्रेम करतो की तो आपल्याला कधीही सोडून देणार नाही.  परिपूर्ण आणि फलदायी जीवन जगण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्यांची उणीव तो आपल्याला कधीही पडू देणार नाही.

हे तुम्हाला खरे वाटते का? कधीकधी यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. कधीकधी सगळ्याचे ओझे असह्य वाटते आणि प्रत्येक गोष्ट आपणच सांभाळली पाहिजे, असे आपल्याला वाटते. आपले सर्व सामर्थ्य आणि गुण देवाला अर्पण करण्यासाठी आपल्याला पाचारण आहे, हे खरे आहे. त्यामुळे तो आपला उपयोग करू शकतो आणि आपल्याद्वारे कार्य करू शकतो. पण शेवटी देवच आपली काळजी घेतो आणि आपल्या प्रत्येक गरजेकडे त्याचेच सर्वाधिक लक्ष असते, हे आपण कधीही विसरू नये.

आज चिंतन करा: देवाच्या परिपालनावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःला त्याच्या हाती कितपत सोपवता?  खालील प्रार्थना म्हणा आणि ती तुम्ही किती पूर्णपणे आपलीशी करू शकता, यावर विचार करा.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पूर्ण आत्मसमर्पणाची प्रार्थना

हे पित्या,
मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो;
तुझ्या इच्छेप्रमाणे माझे कर.
तू जे काही करशील त्याबद्दल मी तुझे आभार मानतो:
माझी सर्व गोष्टींसाठी तयारी आहे; मी सर्वकाही स्वीकारतो.

माझ्या ठायी आणि
तुझ्या सर्व सृष्टीत केवळ तुझीच इच्छा पूर्ण होवो —
हे प्रभू, यापेक्षा अधिक माझी कोणतीही इच्छा नाही.

मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो:
माझ्या हृदयातील सर्व प्रेमाने मी तो तुला अर्पण करतो,
कारण, हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे; म्हणून स्वतःला तुला अर्पण करणे,
काहीही राखून न ठेवता स्वतःला तुझ्या हाती सोपवणे,
तेही अमर्याद विश्वासाने, ही माझ्या मनाची गरज आहे,
कारण तू माझा पिता आहेस.

शार्ल द फुको

अधिक वाचा>>>

आजचे संत – संत बोनावेंचर