मराठी

आपली धन्य माता

मंगळवार, २४ जुलै २०१८

सामान्य काळातील सोळाव्या आठवड्याचा मंगळवार

आजची वाचने

संत शार्बेल मखलूफ, धर्मगुरू व एकांतवासी – ऐच्छिक स्मृतिदिन

“माझी आई कोण? माझे भाऊ कोण?” मग आपल्या शिष्यांकडे हात करून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई आहे.”  मत्तय 12:48-50

या उताऱ्यामुळे धन्य कुमारी मरियेविषयी बोलण्याची एक सुंदर संधी मिळते. हा उतारा वाचताना काही जणांचा असा गैरसमज होतो की येशू काही प्रमाणात आपल्या आईपासून स्वतःला दूर करत होता. जणू त्यांच्या मते, येशूच्या या विधानात त्याच्या जीवनातील तिच्या विशेष भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. पण सत्य याच्या अगदी उलट आहे.

खरे तर, येशूचे हे विधान सर्वांत ठळकपणे तिच्या मातृत्वालाच दुजोरा देते. का? कारण त्याच्या कुटुंबाचा खरा सदस्य कसे होता येते, हे तो सांगत आहे. जो कोणी “माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो,” तो त्याच्या कुटुंबाचा खरा सदस्य होतो.

या वाक्यावर विचार करा. स्वर्गीय पित्याची इच्छा धन्य कुमारीपेक्षा अधिक पूर्णपणे कोणी पार पाडली? प्रत्येक बाबतीत तिच्यापेक्षा अधिक आज्ञाधारक कोण होते? कोणीही नव्हते. ती आयुष्यभर पूर्ण आज्ञाधारकपणे वागली. म्हणूनच येशूच्या कुटुंबातील सदस्य होण्याची अट ती पूर्णपणे पार पाडते.

या उताऱ्यातून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या धन्य मातेचे येशूशी असलेले नाते दोन स्तरांवर होते. पहिले म्हणजे, येशूची जन्मदात्री होण्याचे वरदान तिला लाभले. ही एक विलक्षण कृपा होती आणि त्यासाठी ती मोठ्या सन्मानास पात्र आहे. पण येशूची जन्मदात्री असणे हे ती धन्य असण्याचे मुख्य कारण नव्हते. ती धन्य आहे, याचे मुख्य कारण तिचे आध्यात्मिक मातृत्व आहे. तिचे हे आध्यात्मिक मातृत्व वरील उताऱ्यात दिसून येते. प्रत्येक बाबतीत तिने देवाला मनापासून दिलेल्या, संपूर्ण “होकाराचे” ते फळ आहे. म्हणूनच युगानुयुगे तिचा सन्मान केला जावा आणि तिला “धन्य” म्हटले जावे.

आज आपल्या धन्य मातेचे तुमच्या जीवनात काय स्थान आहे, यावर चिंतन करा.  तुम्ही तिचा आदर करावा, तिच्या आदर्शाप्रमाणे वागावे आणि तिला आपल्या कुटुंबात स्थान द्यावे, अशी देवाची इच्छा आहे.  तुम्ही येशूच्या कुटुंबाचे सदस्य आहात, म्हणून तुम्ही तिला आपली आध्यात्मिक माता म्हणून स्वीकारावे, अशी त्याची इच्छा आहे.  आपल्या जीवनात पित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर येशूच्या जीवनातील आशीर्वादांतही तुम्ही सहभागी व्हाल.  त्याची माता आपलीही माता असणे, हा त्यांपैकी एक मोठा आशीर्वाद आहे.

हे प्रभू, प्रत्येक बाबतीत तुझी आज्ञा पाळण्याची आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची माझी मनापासून इच्छा आहे. पित्याची माझ्या जीवनासाठीची परिपूर्ण योजना मला स्वीकारायची आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे जगताना तुझ्या दैवी जीवनात सहभागी व्हायला आणि तुझ्या कुटुंबाचा पूर्णपणे एक भाग व्हायला मला मदत कर. त्या कुटुंबात तुझ्या मातेला माझी स्वतःची माता म्हणून स्वीकारायला मला मदत कर. प्रिय माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अधिक वाचा>>>

आजचे संत – संत शार्बेल मखलूफ