रविवार, 29 जुलै 2018
सामान्य काळातील सतरावा रविवार, वर्ष ब

“इथे एक मुलगा आहे. त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकऱ्या आणि दोन मासे आहेत; पण एवढ्या लोकांना त्यांचा काय पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” योहान 6:9-10a
तुम्हाला कधी ‘अशक्य’ वाटणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे का? येशूलाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले. पण त्याने दाखवून दिले की, त्याची इच्छा असेल तर तो अशक्य वाटणाऱ्याही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो. तो देव आहे, हे खरे; पण त्याची इच्छा असेल ते सर्व तो करू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या जीवनातही तो असे करू शकतो!
केवळ पाच भाकऱ्या आणि दोन मासे यांवर अनेक हजार लोकांना जेवू घालण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे, असा येशूला असलेला विश्वास वरील उताऱ्यातून दिसून येतो. मानवी दृष्टीने हे अशक्य आहे, पण देवासाठी ते सहज शक्य आहे.
येशूचा हा चमत्कार दाखवतो की, सर्व प्रकारे ‘आपले पोषण करण्यास’ तो कटिबद्ध आहे. होय, त्या प्रसंगी त्याने लोकांना अन्न दिले; पण हे एक चिन्हही आहे: जीवनात कोणतेही संकट किंवा आव्हान आले, तरी त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्या आत्म्यांचे आपल्या कृपेने पोषण करणे त्याला शक्य आहे आणि तसे करण्याची त्याची इच्छाही आहे. त्याची कृपा आपल्याला पुरेशी आहे!
अनेकदा आपल्यासमोर दोन अडचणी असतात. पहिली अशी की, जीवनात एखादे आव्हान उभे राहते आणि त्यावर मात कशी करावी हे आपल्याला कळत नाही. यातून नैराश्य आणि भ्रमनिरास उद्भवू शकतात. पण असे घडते तेव्हा आपण यासारख्या चमत्कारांवर मनन करावे आणि देवाला सर्व काही शक्य आहे हे लक्षात घ्यावे.
दुसरी अडचण अशी की, देवाची इच्छा आणि आपल्या स्वतःच्या मर्यादित कल्पना यांतील फरक ओळखणे आपल्याला अनेकदा कठीण जाते. काय चांगले आणि योग्य आहे हे आपणच ठरवतो आणि आपल्याला वाटते तसे घडावे म्हणून प्रार्थना करू लागतो. पण देवाच्या मनात काही अगदी वेगळे आणि अर्थातच कितीतरी मोठे असेल तर? आपल्या कल्पनेच्याही पलीकडची एखादी योजना देवाकडे असेल तर? खरे तर, आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही इतकी अधिक परिपूर्ण योजना देवाने आपल्या जीवनासाठी आखली आहे. आपल्यासाठी सर्वांत चांगले काय आहे हे त्याला ठाऊक आहे आणि ती योजना तो पूर्णत्वास नेऊ शकतो. आपल्या परीने आपण ती योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ती शरणागत भावाने स्वीकारली पाहिजे आणि त्याच्या परिपूर्ण प्रेमावर, दयेवर, सामर्थ्यावर आणि प्रेमावर श्रद्धा ठेवली पाहिजे.
आज आपल्या भविष्याचा विचार करा. तुम्हाला सर्वांत जास्त काळजी कशाची वाटते? कोणत्या गोष्टीने तुमचे मन चिंतेने भरून जाते? त्या परिस्थितीसाठी देवाची एक परिपूर्ण योजना आहे. ती योजना शोधणे आणि ती पूर्णत्वास जाईल असा विश्वास ठेवणे, हे तुमचे काम आहे.
हे प्रभू, तू सर्व काही करू शकतोस आणि प्रत्येक गोष्टीत चांगले घडावे अशी तुझी इच्छा आहे, हे मला ठाऊक आहे. तुझ्याकडे वळण्यास आणि तुझ्या परिपूर्ण दैवी इच्छेला शरण जाण्यास मला मदत कर. तुझ्या इच्छेला शरण जाताना, तू ती पूर्णत्वास नेशील अशी पूर्ण श्रद्धा मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजची संत – संत मार्था – स्मरणदिन



