रविवार, २६ ऑगस्ट २०१८
सामान्य उपासनाकाळातील एकविसावा रविवार, वर्ष ब

यामुळे त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण आपल्या पूर्वीच्या जीवनाकडे परतले आणि पुन्हा त्यांच्याबरोबर गेले नाहीत. तेव्हा येशूंनी त्या बारा शिष्यांना विचारले, “तुम्हालाही निघून जायचे आहे का?” शिमोन पेत्राने त्यांना उत्तर दिले, “गुरुदेव, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याजवळ आहेत. तू देवाचा पवित्र पुरुष आहेस, असा आमचा विश्वास बसला आहे आणि आम्हाला त्याची खात्री पटली आहे.” योहान 6:66-69
कशामुळे असे झाले? येशूने पवित्र युखरिस्ताविषयी दिलेल्या शिकवणीमुळे “त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण आपल्या पूर्वीच्या जीवनाकडे परतले आणि पुन्हा त्याच्याबरोबर गेले नाहीत.” पवित्र युखरिस्ताविषयीची शिकवण ही येशूने दिलेली सर्वांत गहन आणि सुंदर शिकवण होती; पण काहींना ती स्वीकारणे फारच कठीण गेले. म्हणून पुष्कळ जण त्याला सोडून गेले. पण या उताऱ्यात प्रेषितांचा, विशेषतः पेत्राचा, सुंदर विश्वासही दिसून येतो.
सर्वप्रथम, पवित्र युखरिस्ताविषयी दिलेल्या आपल्या सुंदर आणि अतिशय गहन शिकवणीपासून येशू जराही माघार घेत नाहीत. त्यांनी जे सांगितले त्यावर ते ठाम आहेत: “तुम्ही मनुष्यपुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्यायले नाही, तर तुमच्यामध्ये जीवन नाही” (योहान 6:53). ते पुढे म्हणतात, “कारण माझे मांस हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे” (योहान 6:55).
त्यानंतर येशू आपल्या शिष्यांकडे वळतात आणि नुकतीच दिलेली शिकवण स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य त्यांना देतात. खऱ्या श्रद्धेपर्यंत पोहोचण्यासाठी हे स्वातंत्र्य शिष्यांना आवश्यक आहे. येशूंनी शिष्यांवर दबाव आणला असता किंवा त्यांचे मन वळवण्यासाठी डावपेच वापरले असते, तर येशूंचा आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीचा स्वतःच्या इच्छेने स्वीकार करणे शिष्यांना कठीण झाले असते.
आपल्याबाबतीतही हेच खरे आहे. येशू आपल्याला त्यांच्या मागे चालण्याची सक्ती करत नाहीत. ते आपल्याला बळजबरीने किंवा डावपेचांनी विश्वास ठेवायला लावत नाहीत. ते आपल्यावर दबाव आणत नाहीत. उलट, येशू स्वतःला आणि आपली शिकवण आपल्यासमोर ठेवतात आणि आपल्याला विश्वास ठेवण्याचे आमंत्रण देतात.
या पार्श्वभूमीवर पेत्र आपल्या विश्वासाची गहन कबुली देतो: “गुरुदेव, आम्ही कोणाकडे जावे?” दुसऱ्या शब्दांत, पेत्र असे म्हणत होता, “प्रभू, तुझी शिकवण स्वीकारणे कठीण असले, तुझ्या मागे जाणे लोकांना पसंत नसले, आणि आम्हाला दुःख सोसावे लागले, लोकांनी आम्हाला नाकारले किंवा आमच्याविषयी गैरसमज करून घेतला, तरीही तुझी निवड करणेच सर्वांत चांगले आहे.” याचा विचार करा. येशूची गहन शिकवण संपूर्णपणे स्वीकारण्याच्या निवडीची बरोबरी दुसरा कोणता पर्याय करू शकेल? त्याच्या शिकवणीचा केवळ काही भाग स्वीकारणे अधिक चांगले आहे का? तसे करणे म्हणजे एका अर्थाने त्यालाच नाकारणे होय.
जीवनात एकच चांगला पर्याय आहे, असा विश्वास ज्याच्या मनात रुजला आहे, अशा व्यक्तीची साक्ष पेत्र आपल्याला देतो. तो पर्याय म्हणजे काहीही झाले तरी येशूंच्या मागे चालण्याचा निर्णय. ख्रिस्ताऐवजी निवडावे असे जीवनात दुसरे काहीही नाही. निवड करण्यास योग्य असे एकमेव तेच आहेत, हे सत्य उमजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
आज पेत्राच्या या शब्दांवर चिंतन करा: “प्रभु, आम्ही कोणाकडे जावे?” येशू देव आहेत; तेच मशीहा आणि तारणहार आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने त्यांच्याजवळ आहेत. निवड करण्यासाठी तेच सर्वोत्तम “पर्याय” आहेत. पेत्राचे हे शब्द उच्चारा आणि ते उच्चारताना येशूंचीच निवड करा. ही निवड किती लोकप्रिय आहे किंवा इतर लोक ती करतात की नाही, याची पर्वा करू नका. प्रवाहाबरोबर वाहत गेलो, तर आपण भलत्याच दिशेला जातो. योग्य निवड केली, तर आपले पाय भक्कम जमिनीवर रोवले जातात.
हे प्रभु, तुझ्याशिवाय मी कोणाकडे जाऊ? तुझ्या मार्गाशिवाय मला दुसरा मार्ग नाही. तू सर्वांचा प्रभु आहेस आणि तूच मशीहा आहेस. मी तुझी निवड करतो आणि तू शिकवलेले सर्व स्वीकारतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.



