मराठी

गरजवंतांवर प्रेम करणे

रविवार, २३ सप्टेंबर २०१८

सामान्य काळातील पंचविसावा रविवार, वर्ष ब

आजची वाचने

पिएत्रेलचिनाचे संत पिओ (पाद्रे पिओ), धर्मगुरू — स्मृतिदिन

त्याने एका बालकाला घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले आणि त्याला मिठीत घेऊन तो त्यांना म्हणाला, “जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो; आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो.”  मार्क 9:36-37

एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगण्यासाठी येशूने लहान मुलाचे उदाहरण का दिले? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी, लहान मुलासारखी असणारी व्यक्ती आणि मोठेपणाकडे सांसारिक दृष्टीने पाहणारी व्यक्ती यांच्यातला फरक लक्षात घ्यायला हवा.

बालक हे गरीब, परावलंबी व नम्र असते आणि त्याला मदतीची गरज असते.  त्याला स्वतःच्या गरजा स्वतः भागवता येत नाहीत.  त्यासाठी त्याला आईवडिलांच्या संगोपनाची गरज असते.  देवाशी असलेल्या आपल्या नात्यातही आपली स्थिती अशीच आहे.

स्वावलंबी, सामर्थ्यवान, प्रतिष्ठित किंवा यशस्वी असण्यात खरे मोठेपण नाही. मोठेपणाची ही सांसारिक कल्पना आहे. या उताऱ्यात, आपल्यापैकी सर्वांत मोठा कोण, यावर प्रेषित वाद घालत होते. एका लहान मुलाकडे बोट दाखवून येशू स्पष्ट करतो की मोठेपण आपण काय साध्य करतो यावर अवलंबून नाही; उलट, ख्रिस्तावर अवलंबून राहण्यातच खरे मोठेपण आहे. तसेच, ज्यांना मदतीची गरज आहे अशांना शोधून (जशी लहान मुलाला सांभाळाची गरज असते) त्यांना आवश्यक ते प्रेम देण्यात आणि त्यांची काळजी घेण्यातही खरे मोठेपण आहे. आपल्यामधील गरीब आणि गरजवंतांविषयी कणव बाळगण्याचे आणि त्यांची काळजी घेण्याचे हे आवाहन आहे.

आज यावर चिंतन करा: आपल्यामधील गरजवंतांना मदतीचा हात देण्याची तुमची तयारी आणि इच्छा आहे का? ते कोण आहेत? त्यांना कशाची गरज आहे? तुम्ही त्यांना शोधून त्यांना प्रेम आणि आधार देता का? असे केल्यानेच तुम्ही देवाच्या दृष्टीने खरोखर मोठे व्हाल.

हे प्रभू, गोरगरिबांमध्ये, मनाने खचलेल्यांमध्ये, पापी जनांमध्ये आणि सर्व गरजू लोकांमध्ये मी तुझा शोध घ्यावा.  माझे हृदय इतरांविषयी करुणेने आणि आस्थेने भरून टाक.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अधिक वाचा>>>

आजचे संत – पिएत्रेलचिनाचे संत पिओ (पाद्रे पिओ)