मराठी

देव तुम्हाला कशाचा त्याग करायला बोलावत आहे?

मंगळवार, ५ मार्च २०१९

सामान्य काळातील आठव्या आठवड्याचा मंगळवार

आजची वाचने

आजचे सर्व संत

पेत्र येशूला म्हणू लागला, “आम्ही सर्व काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत.” मार्क 10:28

काही जणांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करून ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचे पाचारण मिळते. उदाहरणार्थ, काहींना मठीय जीवनाचे, तर काही स्त्रियांना धर्मभगिनी म्हणून मठात एकांतवासाचे जीवन जगण्याचे पाचारण मिळते. अशा रीतीने संपूर्ण समर्पणाने आपल्या मागे येण्याचे ख्रिस्ताने दिलेले आमंत्रण समजून घेण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी ते खरोखरच या जगातील सर्वस्वाचा त्याग करतात.

पण आपल्या सर्वांनाच आपापल्या परीने ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी “सर्वस्वाचा” त्याग करण्याचे आवाहन आहे. सर्वस्वाचा त्याग करणे म्हणजे स्वतःची इच्छा आणि जीवनातील आवडीनिवडी पूर्णपणे बाजूला ठेवून ख्रिस्ताच्या दैवी योजनेनुसार त्याची सेवा करणे. या त्यागाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते; पण शेवटी हे आवाहन सर्वस्वाचा त्याग करण्याचेच असते.

आनंदाची बातमी अशी की, “सर्वस्वाचा त्याग करणे” म्हणजे जीवनात आपण स्वार्थापोटी जपलेल्या कल्पना आणि आवडीनिवडी सोडून देणे, एवढेच. त्याहूनही आनंदाची बातमी अशी की, त्याने आपल्यासाठी राखून ठेवलेले जीवन आपण स्वप्नात पाहू शकतो किंवा कल्पना करू शकतो त्यापेक्षाही कितीतरी उत्तम आहे. म्हणून, स्वतःच्या इच्छेला आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्याला “नाही” म्हणताना, देवाच्या परिपूर्ण मार्गाने वागण्याला आपण खरे तर “हो” म्हणत असतो.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी केवळ त्याचीच इच्छा काय आहे, हे जाणून घेण्याची आस आपण का बाळगू नये? त्याची सेवा करण्याची आणि त्याच्या परिपूर्ण योजनेनुसार वागण्याची इच्छा आपण का बाळगू नये? हे आपल्या कुटुंबीयांची सेवा करण्यातून घडू शकते. मन नसतानाही त्यांच्यासाठी काहीतरी करण्यातून घडू शकते. सेवा आणि प्रेम यांच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे, असाही याचा अर्थ असू शकतो. काही जणांसाठी याचा अर्थ, अधिक पूर्ण समर्पणाने त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी जीवनातील नेहमीच्या सर्व आसक्ती सोडून देणे असाही असू शकतो. तुमच्या जीवनातील पाचारण कोणतेही असो, देवाची इच्छा मनापासून स्वीकारणे मोलाचे आहे.

ख्रिस्ताने तुमच्याकडे काहीही मागितले, तरी त्याला “हो” म्हणण्याची तुमची किती तयारी आहे आणि तुम्ही ते किती मनापासून म्हणू शकाल, यावर आज चिंतन करा. त्याने अजून तुमच्यासमोर उघड केलेले नाही, त्यालाही “हो” म्हणण्यास तुम्ही तयार आहात का? भविष्यात तुमच्यासमोर जे काही येईल, त्याला आजच “हो” म्हणा, आणि देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल.

प्रभू, जीवनात तू मला जे काही करण्यासाठी पाचारण करशील, त्याला माझे उत्तर “हो” असेच आहे. मला निःस्वार्थपणे आणि पूर्ण समर्पणाने तुझ्या इच्छेनुसार वागायचे आहे. उदारतेने आणि प्रेमाने माझे पाचारण जगण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन