बुधवार, 6 मार्च 2019

हे प्रभू, आमच्यावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. स्तोत्र 51
दया. या साऱ्याचा गाभा दयाच आहे. प्रायश्चित्तकाळाला सुरुवात करताना, दयेचा अर्थ अधिक चांगल्या रीतीने समजून घेणे ही एक उत्तम सुरुवात ठरेल.
प्रायश्चित्तकाळाचा विचार करताना अनेकदा आपल्या मनात थोडी धाकधूक असते. ‘मला काहीतरी सोडावं लागणार,’ असं आपल्याला वाटतं. पण आपला विचार एवढ्यावरच थांबला, तर त्यामागचा खरा हेतू आपल्या लक्षात येत नाही. मला खरोखरच काहीतरी सोडावं ‘लागणार’ आहे का? याचं उत्तर होही आहे आणि नाहीही. आपण स्वेच्छेने काही गोष्टींचा त्याग करावा आणि आत्मसंयम पाळावा, अशी देवाची इच्छा आहे आणि त्याने आपल्या चर्चद्वारे आपल्याला ही साधना शिकवली आहे, हे खरं आहे. पण हे आपल्यावर लादलेलं ओझं नसून देवाची कृपा स्वीकारण्याचं आमंत्रण आहे.
काहीतरी सोडण्याचा खरा हेतू म्हणजे देवाच्या विपुल दयेचा अधिक खोलवर अनुभव घेणे. ज्या गोष्टी आपल्याला जखडून ठेवतात, त्या सर्वांपासून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे. ज्या नव्या जीवनाची आपल्याला मनापासून आस आहे, त्याचा अनुभव घ्यायला यामुळे मदत होते. एखादा पदार्थ खाणं किंवा एखादं पेय पिणं काही काळ टाळणं, इतकी साधी गोष्टही हा त्याग असू शकते. किंवा ज्यासाठी स्वतःच्या एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागते, अशी कोणतीही कृती आपण जाणीवपूर्वक करू शकतो. आणि हे चांगलंच आहे! का? कारण यामुळे आपलं आत्मिक बळ आणि इच्छाशक्ती वाढते. देवाला संपूर्ण मनाने ‘हो’ म्हणण्याचा आपला निर्धार अधिक पक्का होतो.
जीवनात कितीतरी वेळा आपल्या भावना आणि इच्छा आपल्यावर ताबा मिळवतात. आपल्याला हे हवंसं वाटतं, ते करावंसं वाटतं, आणि अनेकदा आपण या उर्मींच्या किंवा इच्छांच्या आहारी जातो. स्वेच्छेने त्याग करण्याच्या सरावाने आपल्या अयोग्य प्रवृत्तींच्या आहारी जाण्याऐवजी त्यांच्यावर ताबा ठेवण्याचं बळ आपल्याला मिळतं. हे केवळ खाण्यापिण्यापुरतं मर्यादित नाही. जीवनातल्या अनेक गोष्टींना ते लागू होतं. सद्गुण जोपासतानाही, विशेषतः देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करताना, हा सराव उपयोगी पडतो.
दयेच्या मुळाशी देवावर आणि इतरांवर केलेले प्रेम आहे. देवाला जसे अपेक्षित आहे, तसे प्रेम करणे म्हणजे दया. प्रेमाने आपले संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकावे, यासाठी स्वतःला मोकळे करणे म्हणजे दया. मग शेवटी प्रेम करण्यापलीकडे आपल्याला दुसरे काहीच नकोसे वाटते. अशी सवय आपल्या जीवनात रुजवणे कठीण असू शकते; पण त्यातूनच आपल्याला आनंद आणि परिपूर्णता लाभते.
दया ही प्रेमाची अशी कृती आहे, जिच्यासाठी समोरची व्यक्ती एका अर्थी पात्र नसते. ती केवळ प्रेमापोटी, उदारपणे दिलेली देणगी आहे. देव आपल्यावर नेमकं असंच प्रेम करतो. देवाचं प्रेम संपूर्णपणे दयामय आहे. ती दया आपल्याला स्वीकारायची असेल, तर आपणही इतरांवर दया केली पाहिजे. आणि इतरांवर दया करायची असेल, तर त्यासाठी आपण आपलं मन तयार केलं पाहिजे. स्वेच्छेने केलेले छोटे छोटे त्याग आपलं मन तयार करायला मदत करतात.
म्हणून हा प्रायश्चित्तकाळ फलदायी करा; पण या काळात करावे लागणारे त्याग म्हणजे ओझे आहे, या विचारात अडकू नका. देव आपल्याला जे जीवन देऊ इच्छितो, त्या जीवनाकडे नेणाऱ्या वाटेवर हे त्याग आवश्यक आहेत.
हे प्रभू, हा प्रायश्चित्तकाळ माझ्या जीवनात खरोखर फलदायी होवो. तू मला जे काही देऊ इच्छितोस, ते सर्व स्वीकारण्यात मला कृपा आणि आनंद लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रस्तावना: क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस: आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमाची नजर





