मराठी

संपत्तीविना जीवन

रविवार, ४ ऑगस्ट २०१९

सामान्य काळातील अठरावा रविवार, वर्ष क

आजची वाचने

संत जॉन व्हियानी (आर्सचे धर्मगुरू), याजक – स्मृतिदिन

“सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला जपा. कारण मनुष्य कितीही श्रीमंत असला, तरी त्याचे जीवन त्याच्या संपत्तीवर अवलंबून नसते.” लूक 12:15

तुमच्या मालकीचे काहीच नसते, तर तुमचे जीवन कसे असते, याची कल्पना करा. अंगावरच्या कपड्यांखेरीज तुमच्याजवळ काहीच नाही आणि इतरांच्या उदारतेवर तुम्ही आयुष्य जगता, अशी कल्पना करा. अशी जीवनपद्धती प्रथमदर्शनी बेजबाबदार वाटू शकते. तरीही, एका पवित्र हेतूसाठी काही जणांना अशा प्रकारचे जीवन जगण्याचे पाचारण मिळते. ज्यांना नियमांची काटेकोर शिस्त असलेल्या व्रतस्थ जीवनाचे पाचारण मिळते, त्यांना स्वतःच्या मालकीचे काहीही न ठेवता गरिबीचे जीवन स्वीकारण्यास बोलावले जाते. त्यामागचे कारण आजच्या शुभवर्तमानात स्पष्ट होते.

आपले लक्ष अनेकदा आपल्या मालमत्तेतच इतके गुंतून जाते की बाकीचे भान राहत नाही. भौतिक वस्तूंमुळे जीवनात थोडी ‘रंगत’ येऊ शकते, हे खरे आहे. त्यांतून आनंद, करमणूक, सुखसोय वगैरे मिळू शकते. पण या जगातल्या वस्तूंची आसक्ती जडली की एक धोका निर्माण होतो: कितीतरी अधिक मोलाच्या आध्यात्मिक संपत्तीपेक्षा आपण त्या वस्तूंमधून मिळणाऱ्या सुखावर अधिक विसंबू लागतो. भौतिक संपत्ती स्वतःत वाईट आहे असे नाही. मुद्दा असा आहे की आपण मिळवावी अशी देवाची इच्छा असलेली आध्यात्मिक संपत्ती असीम पटीने अधिक मोलाची आहे.

बहुतेकांना भौतिक गरिबीत जगण्याचे पाचारण मिळत नाही; पण आत्म्याने गरीब होऊन जगण्याचे पाचारण सर्वांनाच आहे. याचा अर्थ असा की आपण जगात राहतो, तरी या जगाचे होऊन राहू नये. श्रद्धा, आशा आणि देव व शेजारी यांच्यावरील प्रेम या जीवनातल्या सर्वांत मोलाच्या ठेवींशीच आपण आपले मन जोडून ठेवावे. लोभ आणि भौतिक संपत्तीची आसक्ती आपल्याला या आध्यात्मिक ठेवींपासून दूर नेतात, तेव्हा त्यांचे खरे मोल पुन्हा जाणून घेण्याचा आपण नव्याने संकल्प केला पाहिजे.

आज लोभाशी तुमचा जिथे संघर्ष होत आहे, त्यावर चिंतन करा. हे करणे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि भौतिक वस्तूंविषयीची तुमची आसक्ती योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही लगेच करू लागत असाल, तर तुम्हाला वाटते त्यापेक्षा या चिंतनाची तुम्हाला अधिक गरज असू शकते. हे जग तुम्हाला जे काही देऊ शकते, त्याहून कितीतरी अधिक प्रभू तुम्हाला देऊ इच्छितो. शाश्वततेच्या दृष्टीने जे ‘कवडीमोलाचे’ आहे, त्यात मन गुंतवू नका. जी खरी संपत्ती सदैव तुमच्याजवळ राहील, ती आपलीशी करण्याचा प्रयत्न करा.

हे प्रभू, तू देत असलेल्या संपत्तीवर माझे मन सदैव लागून राहू दे. ज्या गोष्टी मला कधीच पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत, त्यांच्यावर मी कधीही समाधान मानू नये म्हणून मला मदत कर. हे प्रिय प्रभू, मला स्वर्गाची संपत्ती हवी आहे, पृथ्वीवरील धनसंपत्ती नको. तू मला जे आध्यात्मिक दारिद्र्य जगण्यास बोलावतोस, ते जगण्यास मला मदत कर, म्हणजे माझ्यासाठी तुझ्या इच्छेनुसार असलेले सर्व काही मला प्राप्त होईल. मला लोभ आणि स्वार्थ यांपासून मुक्त कर आणि तुझ्या पवित्र इच्छेत खरा आनंद शोधण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत – संत जॉन व्हियानी



पावित्र्याचा मार्ग:
प्रेमाचे जिवंत अर्पण बनणे