रविवार, २२ सप्टेंबर २०१९
सामान्य काळातील पंचविसावा रविवार, वर्ष क

“कोणताही सेवक दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रेम करील, किंवा एकाशी निष्ठावान राहील आणि दुसऱ्याला तुच्छ लेखील. तुम्ही देव आणि धन या दोघांचीही सेवा करू शकत नाही.” लूक 16:13
अनेक लोक श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात. जवळ भरपूर पैसा असला की काही प्रमाणात सुरक्षितता मिळते आणि बहुतेक लोकांना ज्या गोष्टी करता येत नाहीत, अशा अनेक गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळते. पैसा स्वतःत ना चांगला आहे ना वाईट. श्रीमंत असण्यात काही गैर नाही, आणि गरीब असण्यातही काही गैर नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे, याला देवाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही.
पण पैशाला तुम्ही आपला ‘धनी’ होऊ देता, तेव्हा खरा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, गरीब माणसेही अधिक पैसा मिळवण्याच्या इच्छेला आपल्या जीवनावर राज्य करू देतात, तेव्हा पैशाला आपला धनी बनवू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाची इच्छा आपल्या जीवनात किती स्थान घेते हे ओळखणे आणि त्याच्याबद्दल योग्य ती अनासक्ती राखणे.
तुम्ही कशात गुंतलेले आहात? तुमच्याकडे असलेल्या पैशात तुमचे मन गुंतले आहे का? की आपल्याकडे आणखी पैसा असावा, या इच्छेत तुमचे मन गुंतले आहे? पैशाचे खरे स्थान ओळखणे, हे आपले ध्येय आहे. जीवनाचा एकूण विचार केला, तर पैशाचे मोल फार थोडे आहे. आपल्या रोजच्या गरजा भागवण्याचे ते एक साधन आहे; पण जीवनातील आनंद आणि परिपूर्णता यांचा तो कधीच स्रोत होऊ शकत नाही. देवच आपल्या हृदयाचा खरा धनी आहे आणि तोच तुम्हाला खरी संपत्ती देऊ शकतो.
आज चिंतन करा: पैशाची अतिआसक्ती किंवा पैशाच्या अभावाची अतिचिंता यांपैकी कशाशी तुमचा झगडा चालला आहे का? गरजेच्या वेळी तुमची काळजी घेण्याचे वचन देव तुम्हाला देतो. म्हणून त्याच्यावर भरवसा ठेवणे अत्यावश्यक आहे. आणि तुमच्या आर्थिक गरजा भागूनही तुमच्याकडे शिल्लक राहत असेल, तर कृतज्ञ राहा आणि उदार वृत्ती जोपासा. पैसा आपल्याला सुख देईल हा भ्रम सोडून त्याची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमचे हृदय देवाच्या विपुल कृपेनेच भरून जाऊ द्या. त्या कृपेतच तुमचे खरे समाधान आहे. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हाल.
हे प्रभू, तूच माझ्या जीवनाचा एकमेव स्वामी राहावास, यासाठी मला मदत कर. या जगातील सर्व गोष्टींची आसक्ती सोडण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे, म्हणजे मला तुझ्यासाठी आणि केवळ तुझ्या इच्छेनुसार जगता येईल. हे माझ्या प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. सर्वांपेक्षा अधिक प्रेम तुझ्यावर करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




