मराठी

धन्य मरिया, देवमाता

१ जानेवारी २०२०
धन्य कुमारी मरिया, देवमाता हिचा महासण 
ख्रिस्तजन्मोत्सवाचा आठवा दिवस, १ जानेवारी
आजची वाचने

आणि मरियेने या सर्व गोष्टी जपून ठेवल्या व आपल्या मनात त्यांचे चिंतन केले.  लूक 2:19 

गौरवशाली देवमातेचे विशेष स्मरण केल्याशिवाय आपल्या ख्रिस्तजन्मोत्सवाचे आठ दिवस पूर्ण होणार नाहीत! येशूची, जगाच्या तारणाऱ्याची आई मरिया हिला ‘देवमाता’ म्हणणे अगदी योग्य आहे. आपल्या धन्य मातेच्या या अर्थपूर्ण नावावर चिंतन करावे. हे नाव तिच्याविषयी जितके सांगते, तितकेच ते येशूविषयीही सांगते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मरियेला ‘देवमाता’ म्हणताना आपण मानवी जीवनातील एक सत्य विशेषत्वाने मान्य करतो. आई आपल्या मुलांना केवळ देह देत नाही; ती केवळ त्यांच्या देहाची आई नसते, तर त्या व्यक्तींची आई असते. मातृत्व ही केवळ जैविक बाब नाही; ते पवित्र आणि मंगल आहे व देवाने घडवलेल्या सृष्टीच्या दैवी व्यवस्थेचा भाग आहे. येशू तिचा पुत्र होता आणि हा पुत्र देव आहे. म्हणून मरियेला ‘देवमाता’ म्हणणे तर्काला धरून आहे.

या गोष्टीचा विचार केला तर किती आश्चर्य वाटते: देवाला आई आहे! तिने त्याला आपल्या गर्भात वाढवले, त्याला पाजले, त्याचे संगोपन केले, त्याला शिकवले, त्याच्यावर प्रेम केले आणि त्याला साथ दिली. त्याच्या संपूर्ण जीवनकाळात तो कोण आहे, याचेही तिने चिंतन केले. ही शेवटची गोष्ट विशेष सुंदर आहे.

वर दिलेल्या शुभवर्तमानाच्या उताऱ्यात म्हटले आहे, ‘आणि मरियेने या सर्व गोष्टी जपून ठेवल्या व आपल्या मनात त्यांचे चिंतन केले.’ एका ममताळू आईच्या नात्याने तिने हे केले. प्रत्येक आईचे आपल्या लेकरावरचे प्रेम जसे आगळेवेगळे असते, तसेच तिचे येशूवरचे प्रेमही होते. पण ती सर्वार्थाने आदर्श माता होती आणि तिने येशूवर परिपूर्ण प्रेम केले, हे लक्षात घ्यायला हवे. तो तिचा पुत्र तर होताच, पण तो देवही होता आणि सर्व बाबतींत परिपूर्ण होता. यातून काय दिसून येते? मरिया व येशू यांना जोडणारी माया किती गहिरी, प्रेरणादायी, गूढ, गौरवशाली आणि खरोखर पवित्र होती, हे दिसून येते! त्यांच्या प्रेमाचे रहस्य आपल्या अंतःकरणात सदैव जिवंत ठेवून आयुष्यभर त्याचे चिंतन करावे. प्रत्येक आईसाठी ती आदर्श आहे; निर्मळ आणि पवित्र अंतःकरणाने इतरांवर प्रेम करू इच्छिणाऱ्या आपल्या सर्वांसाठीही ती आदर्श आहे.

मरिया आणि तिचा दैवी पुत्र यांच्यातील पवित्र, मन मोहून टाकणाऱ्या नात्यावर आज चिंतन करा. हे प्रेम कसे असेल, याचा थांग घेण्याचा प्रयत्न करा. तिचे अंतःकरण किती गहिऱ्या भावनांनी आणि उत्कट प्रेमाने भरून गेले असेल, याची कल्पना करा. तिची निष्ठा किती अढळ असेल, याची कल्पना करा. तिच्या प्रेमातून जुळलेले अतूट नाते डोळ्यांसमोर आणा. ख्रिस्तजन्मोत्सवाच्या या आठ दिवसांची सांगता करणारा हा किती सुंदर सोहळा आहे!

हे प्रिय मरियामाते, तू आपल्या दैवी पुत्रावर परिपूर्ण प्रेम केलेस. तुझ्या अंतःकरणात मातेच्या प्रेमाची कधीही न विझणारी ज्योत तेवत होती. येशूबरोबरचे तुझे नाते सर्वार्थाने परिपूर्ण होते. तू माझ्यावरही तेच प्रेम करतेस; त्या प्रेमासाठी माझे अंतःकरण खुले करायला मला मदत कर. ये, माझी आई हो आणि जशी तू आपल्या पुत्राची काळजी घेतलीस, तशी माझीही काळजी घे. येशूने तुझ्यावर जसे प्रेम केले आणि आता स्वर्गात तो जसे तुझ्यावर भरभरून प्रेम करतो, तसेच प्रेम मलाही तुझ्यावर करता येवो. हे देवमाते मरिये, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

ख्रिस्त, आशेची मेणबत्ती

नाताळची प्रार्थना


हेही पाहा:

आईची माया

मरियेच्या निष्कलंक हृदयाचे सामर्थ्य

देवमातेच्या मनातले विचार


दैवी दयेसोबतच्या 365 दिवसांच्या प्रवासात आमच्यासोबत या!

दैवी दयेवरील दैनिक चिंतन: संत फौस्तिनासोबत 365 दिवस ही मालिका 1 जानेवारीला चिंतन 1 पासून सुरू होते. या नव्या वर्षाची तयारी करताना, येत्या वर्षभर देवाच्या विपुल दयेवर दररोज चिंतन करण्यासाठी आमच्यासोबत येण्याचे आमंत्रण आम्ही तुम्हाला देतो. या प्रवासात सहभागी होण्यासाठी तुम्हीही आपल्या कुटुंबीयांना व मित्रांना आमंत्रण द्यावे अशी आमची विनंती आहे! पुढील मार्गांनी आमच्यासोबत सहभागी होण्यास त्यांना सांगा:

  1. दैवी दयेविषयीचे दैनिक ईमेल मिळवण्यासाठी नोंदणी करून
  2. आमचे कॅथलिक दैनिक चिंतन ॲप इन्स्टॉल करून
  3. आमच्या संकेतस्थळाला दररोज भेट देऊन
  4. दैवी दयेवरील दैनिक चिंतन हे पुस्तक मऊ मुखपृष्ठाच्या छापील आवृत्तीत किंवा ई-पुस्तकाच्या स्वरूपात विकत घेऊन

या नव्या वर्षात देवाच्या विपुल दयेचा संदेश आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि मित्रांपर्यंत पोहोचवा!

ई-पुस्तक & मऊ मुखपृष्ठाची छापील आवृत्ती उपलब्ध