मराठी

समुद्र शांत करणे

1 फेब्रुवारी 2020
सामान्य काळातील तिसऱ्या आठवड्याचा शनिवार 
आजची वाचने

येशू नावेत मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. शिष्यांनी त्याला जागे केले आणि म्हटले, “गुरुजी, आम्ही बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही का?” तो उठला, त्याने वाऱ्याला दटावले आणि समुद्राला म्हटले, “शांत हो! थांब!” वारा थांबला आणि सर्वत्र गाढ शांतता पसरली. मार्क 4:38-39

आणि सर्वत्र गाढ शांतता पसरली! होय, हे समुद्र शांत झाल्याचे वर्णन आहे; पण जीवनात कधीकधी आपल्याला ज्या उलथापालथीला सामोरे जावे लागते, तिच्याविषयीही यात एक संदेश आहे. येशूला आपल्या जीवनात गाढ शांतता आणायची आहे.

जीवनात निराश होणे किती सहज घडते! आपल्या सभोवतालच्या गोंधळातच आपले सगळे लक्ष अडकून पडते. कुणाचे कठोर, बोचरे बोल असोत, कौटुंबिक अडचण असो, समाजातील अशांतता असो किंवा पैशांची चिंता असो—भीती, वैफल्य, खिन्नता आणि काळजी यांच्या जाळ्यात अडकण्याची कारणे आपल्यापैकी प्रत्येकाकडे पुष्कळ आहेत.

पण याच कारणासाठी येशूने आपल्या शिष्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडू दिला. तो त्यांच्याबरोबर नावेत चढला आणि स्वतः झोपलेला असताना त्यांना एका भयंकर वादळाचा सामना करू दिला, जेणेकरून त्या अनुभवातून तो आपणा सर्वांना एक स्पष्ट आणि खात्री पटवून देणारा संदेश देऊ शकेल.

या प्रसंगात शिष्यांच्या मनात एकच विचार होता: आपण बुडत आहोत! समुद्राच्या लाटांवर त्यांची नाव हेलकावे खात होती आणि आता आपत्ती ओढवणार, अशी त्यांना भीती वाटत होती. पण हे सगळे घडत असताना येशू तिथेच गाढ झोपला होता. त्यांनी आपल्याला जागे करावे, याची तो वाट पाहत होता. त्यांनी त्याला जागे केले तेव्हा त्याने वादळ आवरले आणि सर्वत्र पूर्ण शांतता नांदली.

आपल्या जीवनातही असेच घडते. रोजच्या जीवनातील ताणतणाव आणि अडचणींमुळे आपण सहज अस्वस्थ होतो. अनेकदा आपण समस्यांना आपल्यावर हावी होऊ देतो. अशा वेळी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली नजर येशूकडे वळवणे. तो तिथे तुमच्यासमोर झोपला आहे आणि तुम्ही त्याला जागे करावे म्हणून वाट पाहत आहे, असे मनात पाहा. तो सदैव तिथे असतो, सदैव वाट पाहतो आणि सदैव तयार असतो.

आपल्या प्रभूला जागे करणे अगदी सोपे आहे: खवळलेल्या समुद्रावरून नजर हटवायची आणि त्याच्या दैवी उपस्थितीवर भरवसा ठेवायचा. सगळे काही या भरवशावरच अवलंबून आहे—पूर्ण आणि अढळ भरवशावर. तुम्ही त्याच्यावर असा भरवसा ठेवता का?

आज, रोज तुम्हाला कशामुळे चिंता, भीती किंवा संभ्रम वाटतो, यावर मनन करा. तुम्हाला इकडे तिकडे हेलकावे देऊन ताण आणि काळजीत टाकणारी गोष्ट कोणती? हे ओझे पाहताना, येशूही तिथे तुमच्याबरोबर आहे हे लक्षात घ्या. तुम्ही विश्वासाने त्याच्याकडे यावे म्हणून तो वाट पाहत आहे, जेणेकरून तुमच्या जीवनात उद्भवणारी प्रत्येक परिस्थिती तो आपल्या हाती घेऊ शकेल. त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुमची नक्कीच काळजी घेईल.

हे प्रभू, जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना मी तुझ्याकडे वळतो आणि तुला जागे करून माझ्या मदतीला बोलावू इच्छितो. तू सदैव जवळ आहेस आणि मी प्रत्येक गोष्टीत तुझ्यावर भरवसा ठेवावा म्हणून वाट पाहत आहेस, हे मला माहीत आहे. माझी नजर तुझ्याकडे वळवायला आणि माझ्यावर असलेल्या तुझ्या परिपूर्ण प्रेमावर श्रद्धा ठेवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण