मराठी

पृथ्वीचे मीठ होणे

९ फेब्रुवारी २०२०
 सामान्य काळातील पाचवा रविवार, वर्ष अ
आजची वाचने

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण मिठाची चव गेली, तर त्याला पुन्हा चव कशाने आणता येईल? ते बाहेर फेकून पायांखाली तुडवण्याशिवाय कशाच्याही उपयोगाचे राहत नाही.” मत्तय 5:13

चव गेलेले “मीठ” बनू नका!  असे मीठ शेवटी बाहेर फेकले जाते आणि पायांखाली तुडवले जाते.  मग आपली चव कशी जाते?

सर्वप्रथम, मिठाचा उपयोग काय आहे ते पाहूया.  मीठ हा अन्नाला चव आणणारा एक अप्रतिम पदार्थ आहे.  नुसते मीठ फारसे रुचकर नसते.  पण ते निरनिराळ्या पदार्थांत घातले की त्यांच्यात मिसळून त्यांची चव कितीतरी वाढवते.

आपल्याला “पृथ्वीचे मीठ” होण्याचे पाचारण आहे.  मिठाप्रमाणेच आपले कामही केवळ उठून दिसणे आणि सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणे नाही.  आपली निर्मिती केवळ आपल्यापुरती झालेली नाही.  उलट, जगाच्या जीवनात सहभागी होऊन ते समृद्ध करणे हे आपले ख्रिस्ती कर्तव्य आहे, जेणेकरून त्याचे रूपांतर कृपा आणि दयेने भरलेल्या, देवाच्या राज्याची “चव” असलेल्या जगात होईल.  हे विशेषतः नाती दृढ केल्याने घडते.  एकावेळी एका व्यक्तीच्या जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याने, तिचे जीवन समृद्ध होते आणि तिला ख्रिस्ताच्या अधिक जवळ येण्यास मदत होते.  मीठ जसे अन्नात मिसळून त्याची चव वाढवते, तसेच देवाचे प्रेम आपण आपल्या जगात आणि आपल्याला भेटणाऱ्या लोकांच्या जीवनात आणतो तेव्हा ते त्यांचे जीवन समृद्ध करते.

आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा वळूया.  आपली चव कशी जाते?  दुसऱ्या शब्दांत, “पृथ्वीचे मीठ” होण्यात आपण कसे कमी पडतो?  जगात वावरताना आपल्याला अनेक लोक भेटतात; पण त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात आपण कमी पडतो, तेव्हा असे होते.  आपल्या उपस्थितीमुळे इतरांच्या जीवनात फारसा चांगला बदल होत नाही किंवा अजिबातच होत नाही, तेव्हा आपली कृत्ये बेचव मिठासारखी ठरतात. ते मीठ बाहेर फेकून “पायांखाली तुडवण्याशिवाय” कशाच्याही उपयोगाचे नसते.  यावरून आपल्याला कळते की इतरांच्या जीवनात चांगला बदल घडवणे हे आपले कर्तव्य आहे.  ज्यांच्याशी आपली नियमित भेट होते, त्यांच्यातील चांगुलपणा आणि श्रद्धा वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.  इतरांच्या जीवनात चांगला बदल घडवण्यात आपण कमी पडलो, तर त्या नात्यांचा खरा हेतू आपल्या लक्षात आलेला नाही आणि आपण पृथ्वीचे मीठ होण्यातही कमी पडत आहोत.

ख्रिस्ताने तुम्हाला दिलेल्या या कर्तव्यावर आज चिंतन करा.  इतरांच्या जीवनात चांगला बदल घडवण्याच्या पाचारणावर मनन करा.  इतरांच्या जीवनातील तुमच्या उपस्थितीमुळे त्यांची श्रद्धा आणि प्रेम वाढते, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताची ही मूलभूत आज्ञा पाळत असता.  पृथ्वीचे मीठ होण्याचा निर्धार करा, जेणेकरून आपले हे जग अधिक चांगले होईल आणि त्यात देवाच्या राज्याची चव भरून राहील.

हे प्रभू, तुझ्या सेवेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी मी स्वतःला तुला अर्पण करतो.  माझा उपयोग करून आपल्या जगाचे रूपांतर एका पवित्र स्थानी कर, जिथे तुझा चांगुलपणा वास करील, अशी मी प्रार्थना करतो.  तुझ्या कार्याचे साधन होण्याचा मान मला दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर, अशी मी प्रार्थना करतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण