29 मार्च 2020
प्रायश्चित्तकाळातील पाचवा रविवार (वर्ष अ)
आजची वाचने

तेव्हा दिदिमुस म्हणून ओळखला जाणारा थोमा आपल्या सहशिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊया.” योहान 11:16
किती परिणामकारक उद्गार! ते समजून घेण्यासाठी त्यांचा संदर्भ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आपला मित्र लाझर आजारी असून मरणाच्या दारी आहे, म्हणून आपण यरुशलेमला जात आहोत, असे येशूने आपल्या प्रेषितांना सांगितले. त्यानंतर थोमाने हे उद्गार काढले. पुढे कथेत आपण पाहतो की येशू लाझरच्या घरी पोहोचण्यापूर्वीच लाझर मरण पावला होता. अर्थात, शेवटी काय झाले हे आपल्याला माहीत आहे: येशूने लाझरला मरणातून उठवले. पण येशूने यरुशलेमला जाऊ नये म्हणून प्रेषितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. कारण तिथे पुष्कळ लोक त्याच्याशी वैरभावाने वागत होते आणि त्याला ठार मारू इच्छित होते, हे त्यांना माहीत होते. तरीही येशूने जाण्याचे ठरवले. अशा वेळी संत थोमा इतरांना म्हणाला, “चला, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊया.” खरोखर, किती परिणामकारक उद्गार!
हे उद्गार इतके परिणामकारक आहेत, कारण यरुशलेममध्ये जे काही घडेल ते स्वीकारण्याच्या निर्धाराने थोमा बोलला, असे वाटते. येशूला विरोध आणि छळाला सामोरे जावे लागेल, याची त्याला जाणीव होती असे दिसते. येशूबरोबर त्या छळाला आणि मृत्यूलाही सामोरे जाण्यास तो तयार होता, असेही वाटते.
अर्थात, थोमा हा शंका घेणारा म्हणून ओळखला जातो. येशूच्या मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानानंतर इतर प्रेषितांनी येशूला खरोखर पाहिले होते, हे मान्य करायला त्याने नकार दिला. पण तो आपल्या शंकेसाठी ओळखला जात असला, तरी त्या क्षणी त्याने दाखवलेले धैर्य आणि निर्धार आपल्या नजरेतून सुटू नयेत. त्या क्षणी येशूबरोबर जाऊन त्याच्यावर होणाऱ्या छळाला आणि त्याच्या मृत्यूला सामोरे जाण्याची त्याची तयारी होती. इतकेच नव्हे, तर स्वतः मरणालाही सामोरे जाण्यास तो तयार होता. येशूला अटक झाली तेव्हा तो पळून गेला खरा; पण पुढे तो सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी भारतात गेला आणि तिथे त्याला हौतात्म्य आले, असे मानले जाते.
येशूबरोबर पुढे जाऊन वाटेत येणाऱ्या कोणत्याही छळाला सामोरे जाण्याची आपली कितपत तयारी आहे, यावर चिंतन करण्यास हा उतारा आपल्याला मदत करतो. ख्रिस्ती म्हणून जगायला धैर्य लागते. आपण इतरांपेक्षा वेगळे असू. आपल्या सभोवतालच्या संस्कृतीत आपण सहज बसणार नाही. आपल्या काळाच्या चालीरीतींप्रमाणे वागण्यास आपण नकार दिला, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा छळ सहन करावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? हे सहन करण्याची तुमची तयारी आहे का?
आपण कमी पडलो, तरी पुन्हा सुरुवात करू शकतो, हेही आपण संत थोमाकडून शिकले पाहिजे. थोमाची तयारी होती, पण छळ होताना पाहून तो पळून गेला. नंतर त्याने शंकाही घेतली; पण शेवटी येशूबरोबर जाऊन मरण पत्करण्याचा आपला निर्धार त्याने धैर्याने कृतीत उतरवला. आपण किती वेळा कमी पडतो, यापेक्षा ही शर्यत आपण कशी पूर्ण करतो, हे अधिक महत्त्वाचे आहे.
आज संत थोमाच्या मनातील निर्धारावर चिंतन करा आणि त्या प्रकाशात स्वतःच्या निर्धाराकडे पाहा. या निर्धाराला जागण्यात तुम्ही कमी पडलात, तरी काळजी करू नका. तुम्ही पुन्हा उभे राहून प्रयत्न करू शकता. संत थोमाने हौतात्म्य पत्करताना केलेल्या अंतिम निश्चयावरही चिंतन करा. त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याचे ठरवा, म्हणजे स्वर्गातील संतांमध्ये तुमचीही गणना होईल.
प्रभू, तू मला जिथे नेशील तिथे तुझ्यामागे येण्याची माझी इच्छा आहे. तुझ्या मार्गाने चालण्याचा आणि संत थोमासारखे धैर्य दाखवण्याचा दृढ निर्धार मला दे. मी कमी पडलो, तर पुन्हा उभे राहून नव्याने निर्धार करण्यास मला मदत कर. प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या संपूर्ण जीवनाने तुझ्यावर प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – बत्तिसावे चिंतन – “बाई, पाहा, हा तुझा पुत्र… पाहा, ही तुझी आई”
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य




