2 एप्रिल 2020
प्रायश्चित्तकाळाच्या पाचव्या आठवड्यातील गुरुवार
आजची वाचने
पाओलाचे संत फ्रान्सिस, एकांतवासी — ऐच्छिक स्मरण

येशू यहुद्यांना म्हणाला, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी माझे वचन पाळतो, तो मृत्यू कधीही पाहणार नाही.” तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, “तुला भूत लागले आहे, याची आता आम्हाला खात्री झाली.” योहान 8:51–52
येशूबद्दल याहून वाईट काही बोलता येईल, अशी कल्पनाही करणे कठीण आहे. दुष्ट आत्म्याने त्याला पछाडले आहे, असे त्यांना खरेच वाटत होते का? तसेच दिसते. देवाच्या पुत्राबद्दल असे बोलणे किती दुःखद आणि विचित्र आहे! इथे येशूच्या रूपाने खुद्द देवच सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देत आहे. आपल्या वचनाचे पालन करणे हाच शाश्वत आनंदाचा मार्ग आहे आणि प्रत्येकाने हे सत्य जाणून त्यानुसार जगले पाहिजे, हे पवित्र सत्य तो उघड करतो. येशू हे मोकळेपणाने आणि उघडपणे सांगतो; पण हा संदेश ऐकणाऱ्यांपैकी काहींची प्रतिक्रिया अत्यंत निराशाजनक, बदनामी करणारी आणि द्वेषपूर्ण होती.
असे बोलायला लावणारे कोणते विचार त्यांच्या मनात चालले असतील, हे जाणणे कठीण आहे. कदाचित त्यांना येशूचा हेवा वाटत असेल किंवा कदाचित ते अगदीच गोंधळून गेले असतील. कारण काहीही असो, त्यांच्या बोलण्याने गंभीर हानी झाली.
अशा विधानाने येशूची फारशी हानी झाली नाही; उलट, ते बोलणाऱ्यांची स्वतःची आणि येशूच्या भोवती असणाऱ्यांची हानी झाली. आपल्याबद्दल जे काही बोलले गेले ते झेलणे येशूला शक्य होते, पण इतरांना ते झेपले नाही. आपल्या शब्दांनी आपली स्वतःची आणि इतरांची मोठी हानी होऊ शकते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सर्वप्रथम, त्यांच्या शब्दांनी त्यांची स्वतःचीच हानी झाली. असे चुकीचे विधान उघडपणे केल्याने ते आपल्या चुकीवर हट्टाने अडून राहण्याच्या वाटेला लागले. पुढे असे विधान मागे घेण्यासाठी खूप नम्रता लागते. आपलेही असेच होते. दुसऱ्याची हानी होईल असे काही आपण बोललो, तर ते शब्द मागे घेणे कठीण जाते. नंतर क्षमा मागणे आणि आपण केलेली जखम भरून काढणेही कठीण जाते. सर्वाधिक हानी आपल्या स्वतःच्या अंतःकरणाची होते, कारण आपली चूक सोडून नम्रपणे पुढे जाणे आपल्याला कठीण जाते. पण झालेली हानी भरून काढायची असेल, तर हे केलेच पाहिजे.
दुसरे म्हणजे, या बोलण्याने ते ऐकणाऱ्यांचीही हानी झाली. काहींनी हे द्वेषपूर्ण विधान फेटाळून लावले असेल; पण इतरांनी त्यावर विचार केला असेल आणि येशूला खरोखरच भूत लागले आहे का, अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली असेल. अशा रीतीने संशयाची बीजे पेरली गेली. आपल्या शब्दांचा इतरांवर परिणाम होतो, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि शक्य तितक्या जपून व प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आज आपल्या स्वतःच्या बोलण्यावर चिंतन करा. तुम्ही इतरांना सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या होत्या किंवा त्यांच्यामुळे गैरसमज होऊ शकत होता, असे आता तुम्हाला जाणवते का? तसे असल्यास, आपले शब्द मागे घेऊन आणि क्षमा मागून झालेली हानी भरून काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? इतरांच्या द्वेषपूर्ण बोलण्यात आपण सहज ओढले जाऊ शकतो, यावरही चिंतन करा. अशा बोलण्याचा प्रभाव तुम्ही स्वतःवर पडू दिला आहे का? तसे असेल, तर अशा चुकीच्या बोलण्याला कान न देण्याचा निश्चय करा आणि सत्य बोलण्याचे मार्ग शोधा.
हे प्रभू, माझ्या मुखातून असे पवित्र शब्द निघू दे की ज्यांनी सदैव तुझा गौरव होईल आणि तुझ्या अंतःकरणात जिवंत असलेली शाश्वत सत्ये त्यांतून प्रकट होतील. असे बोलण्याची कृपा मला दे. या पापमय जगात माझ्या सभोवताली असलेले असत्यही मला ओळखता येऊ दे. तुझ्या अंतःकरणातून असत्य गाळले जाऊ दे आणि माझ्या मनात व अंतःकरणात सत्याचीच बीजे पेरली जाऊ देत. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायाशी 40 दिवस – छत्तिसावे चिंतन – “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो”
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
आजचे संत – पाओलाचे संत फ्रान्सिस




