मराठी

पापापासून मुक्ती

1 एप्रिल 2020
प्रायश्चित्तकाळाच्या पाचव्या आठवड्यातील बुधवार
आजची वाचने

येशूने त्यांना उत्तर दिले, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो: जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. गुलाम घरात कायमचा राहत नाही, पण पुत्र कायम राहतो. म्हणून पुत्राने तुम्हाला मुक्त केले, तर तुम्ही खरोखर मुक्त व्हाल.” योहान 8:34–36

येशूला तुम्हाला मुक्त करायचे आहे, पण तुम्हाला स्वतःला मुक्त व्हायचे आहे का? केवळ विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे वाटेल. अर्थातच तुम्हाला स्वातंत्र्य हवे आहे! ते कोणाला नको असेल? पण प्रत्यक्ष जीवनात या प्रश्नाचे उत्तर देणे अधिक कठीण आहे. अनेकांना पापात जगण्यात काहीच खटकत नाही. पापातून मिळणारे समाधान भ्रामक असते, पण त्यापासून दूर जाणे कठीण जाऊ शकते. पापामुळे त्या क्षणी तुम्हाला बरे ‘वाटू’ शकते, पण कालांतराने ते तुमचे स्वातंत्र्य आणि आनंद हिरावून घेते. तरीही ते क्षणिक ‘समाधान’ पुष्कळांना पुन्हा पुन्हा पापाकडे खेचण्यासाठी पुरेसे ठरते.

मग तुमचे काय? परात्पर देवाचा पुत्र किंवा कन्या म्हणून जगता यावे, यासाठी तुम्हाला मुक्त व्हायचे आहे का? तुमचे उत्तर ‘हो’ असेल, तर यात वेदना होतील, पण त्या वेदनेतही आनंद असेल, यासाठी तयार राहा. पापावर मात करण्यासाठी शुद्धीकरण आवश्यक आहे. पाप ‘सोडून देण्याच्या’ या प्रक्रियेत खरा त्याग आणि दृढ निश्चय आवश्यक असतो. प्रभूकडे पूर्ण विश्वासाने वळून स्वतःला त्याच्या स्वाधीन करावे लागते. असे करताना तुमचा अहंभाव, तुमच्या वासना आणि तुमची स्वार्थी इच्छा यांना जणू मरण येते, असा अनुभव तुम्हाला येतो. निदान तुमच्या पतित मानवी स्वभावाला तरी हे वेदनादायक वाटते. पण हे कर्करोग किंवा एखादा संसर्ग दूर करण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेसारखे आहे. शस्त्रक्रिया वेदनादायक असू शकते, पण त्या रोगातून मुक्त होण्याचा तोच एक मार्ग आहे. पुत्र हाच दैवी शल्यचिकित्सक आहे आणि तो स्वतःच्या दुःखसहन व मरणाद्वारे तुम्हाला मुक्त करतो. येशूचे क्रूसारोपण आणि मरण यांमुळे जगात जीवन आले. त्याच्या मरणाने पापाच्या रोगाचा नाश केला. त्याचे मरण हाच उपाय आपण स्वेच्छेने स्वीकारतो, याचा अर्थ असा की, त्याच्या मरणाद्वारे आपल्यातील पापाच्या रोगाचा नाश त्याला करू दिला पाहिजे. आपल्या प्रभूने तो रोग जणू ‘कापून काढावा’ आणि दूर करावा.

इतर कोणत्याही काळापेक्षा प्रायश्चित्तकाळात आपल्या पापांकडे प्रामाणिकपणे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे. कारण तुम्हाला कशामुळे बंधनात राहावे लागते हे ओळखले, तर तुम्ही दैवी वैद्याला तुमच्या जखमांमध्ये प्रवेश करून तुम्हाला बरे करण्यासाठी आमंत्रित करू शकाल. आपल्या सदसद्विवेकबुद्धीचे सखोल आणि प्रामाणिक परीक्षण केल्याशिवाय आणि आपल्या पापांबद्दल मनापासून पश्चात्ताप केल्याशिवाय हा प्रायश्चित्तकाळ जाऊ देऊ नका. तुम्ही मुक्त व्हावे अशी प्रभूची इच्छा आहे! तुम्हीही त्या मुक्तीची इच्छा बाळगा आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत पाऊल टाका, म्हणजे तुमच्या जड ओझ्यांतून तुम्हाला मुक्ती मिळेल.

आज आपल्या स्वतःच्या पापांकडे पाहण्याची आपली वृत्ती कशी आहे, यावर चिंतन करा. पहिले, तुम्ही आपली पापे नम्रपणे कबूल करू शकता का? सबबी देऊन त्यांचे समर्थन करू नका किंवा त्यांचा दोष दुसऱ्यावर ढकलू नका. त्यांना सामोरे जा आणि ती तुमची स्वतःची पापे आहेत हे मान्य करा. दुसरे, तुमची पापे कबूल करा. समेटाच्या संस्काराकडे तुम्ही कसे पाहता, यावर चिंतन करा. हा मुक्ती देणारा संस्कार आहे. तो अगदी सोपा आहे. तिथे जा, आपली सर्व पापे कबूल करा, त्यांबद्दल पश्चात्ताप व्यक्त करा आणि मुक्त व्हा. हे तुम्हाला कठीण वाटत असेल, तर तुम्ही सत्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या मनातल्या भीतीवर भरवसा ठेवत आहात. तिसरे, देवाचा पुत्र तुम्हाला देऊ करीत असलेल्या स्वातंत्र्यात आनंद माना. आपल्या पात्रतेपलीकडची ही देणगी आहे. आज आणि उरलेल्या प्रायश्चित्तकाळात या तीन गोष्टींवर चिंतन करा. मग तुमचा पुनरुत्थानाचा सण खऱ्या कृतज्ञतेचा सण ठरेल!

 हे प्रभू, मला सर्व पापांपासून मुक्त व्हायचे आहे, जेणेकरून तुझे लेकरू म्हणून मला स्वातंत्र्यात जगता येईल. हे प्रिय प्रभू, माझ्या पापांना प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने सामोरे जाण्यास मला मदत कर. समेटाच्या संस्कारात माझी पापे कबूल करण्यासाठी मला आवश्यक ते धैर्य दे, म्हणजे तुझ्या दुःखसहन व मरणाद्वारे तू मला जे काही दिले आहेस, त्या सर्वांचा मला आनंद घेता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रूसाच्या पायाशी 40 दिवस – पस्तिसावे चिंतन – “पूर्ण झाले आहे”

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय