मराठी

प्रामाणिकपणा

13 जून 2020
सामान्य काळातील दहाव्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने

पादुआचे संत अंतोनी, धर्मगुरू व ख्रिस्तसभेचे धर्मपंडित — स्मरणदिन

“तुमच्या ‘हो’चा अर्थ ‘हो’ आणि तुमच्या ‘नाही’चा अर्थ ‘नाही’ असू द्या. यापलीकडचे जे काही आहे, ते दुष्टाकडून येते.” मत्तय 5:37

हे वचन विचार करायला लावणारे आहे. “यापलीकडचे जे काही आहे, ते दुष्टाकडून येते,” असे म्हणणे प्रथमदर्शनी जरा टोकाचे वाटते. पण हे येशूचे शब्द आहेत, म्हणून ते पूर्णपणे सत्य आहेत. मग येशूला नेमके काय म्हणायचे आहे?

शपथ घेण्याच्या नैतिकतेविषयी शिकवताना येशू हे वचन सांगतो. या शिकवणीत तो आठव्या आज्ञेतील सत्य बोलण्याचे मूलभूत तत्त्व मांडतो. आपले बोलणे प्रामाणिक असावे, आपल्या मनात जे आहे तेच आपण बोलावे आणि जे बोलतो ते मनापासून बोलावे, असे येशू आपल्याला सांगतो.

शपथ घेण्याविषयी शिकवताना येशू हा मुद्दा मांडतो, त्याचे एक कारण असे की आपल्या रोजच्या बोलण्यात औपचारिक शपथ घेण्याची गरज पडू नये. अर्थात, विवाहाच्या प्रतिज्ञा किंवा धर्मगुरू व व्रतस्थ स्त्री-पुरुष विधिपूर्वक घेतात ती व्रते व देतात ती वचने यांना विशेष गांभीर्य असते. खरे तर, प्रत्येक संस्कारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गंभीर वचन दिले जाते. पण लोकांना त्यांच्या वचनासाठी जबाबदार धरण्यापेक्षा आपली श्रद्धा जाहीरपणे व्यक्त करणे, हा या वचनांचा मुख्य हेतू असतो.

खरे तर, प्रामाणिक आणि सचोटीचे जीवन जगण्यास सांगणारी आठवी आज्ञा आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पुरेशी ठरली पाहिजे. या ना त्या गोष्टीसाठी ‘देवाची शपथ’ घेण्याची गरज नाही. अमुक एखाद्या प्रसंगी आपण खरे बोलत आहोत, हे इतरांना पटवून देण्याची गरज आपल्याला भासू नये. उलट, आपण प्रामाणिक आणि सचोटीचे असलो, तर आपला शब्दच पुरेसा ठरेल. आपण सांगितले आहे, एवढ्यावरूनच ते खरे आहे, याची खात्री इतरांना असेल.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही किती प्रामाणिक आहात, यावर आज चिंतन करा. जीवनातील लहान-मोठ्या गोष्टींत खरे बोलण्याची सवय तुम्ही लावून घेतली आहे का? तुमच्यातील हा गुण इतरांना जाणवतो का? सत्य बोलणे आणि सत्यनिष्ठ असणे, या दोन्ही मार्गांनी आपण आपल्या कृतीतून सुवार्तेची घोषणा करतो. आज प्रामाणिक राहण्याचा निर्धार करा आणि प्रभू तुमच्या वाणीमधून महान कार्ये घडवून आणील.

हे प्रभू, मला प्रामाणिकपणे आणि सचोटीने जगण्यास मदत कर. जेव्हा मी सत्याचा विपर्यास केला, नकळत भासेल अशा रीतीने इतरांना फसवले किंवा सरळ खोटे बोललो, त्या सर्व प्रसंगांबद्दल मला पश्चात्ताप होतो. माझा ‘हो’ नेहमी तुझ्या परमपवित्र इच्छेशी जुळणारा असू दे आणि चुकीच्या मार्गांपासून नेहमी दूर राहण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनेचा कालावधी: 10-18 जून 2020
19 जून 2020: येशूच्या पवित्र हृदयाचा महोत्सव

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – पादुआचे संत अंतोनी, धर्मगुरू व ख्रिस्तसभेचे धर्मपंडित

मिस्साच्या वाचनांचे पर्याय