मराठी

दुसरा गाल पुढे करणे

15 जून 2020
सामान्य काळातील अकराव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

“पण मी तुम्हांला सांगतो, दुष्ट माणसाला प्रतिकार करू नका. कोणी तुमच्या उजव्या गालावर मारले, तर त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा.” मत्तय 5:39

अरेरे! ही शिकवण स्वीकारणे किती कठीण आहे!

येशूला खरोखरच असे म्हणायचे होते का? कोणी आपल्यावर अन्याय केला किंवा आपल्याला दुखावले, तर अनेकदा आपण लगेच काहीतरी कारण शोधून शुभवर्तमानातील हा उतारा आपल्याला लागू होत नाही असे गृहीत धरतो. होय, ही शिकवण मान्य करणे कठीण आहे; पण ती आचरणात आणणे त्याहूनही कठीण आहे.

“दुसरा गाल पुढे करणे” म्हणजे काय? प्रथम आपण या शब्दांचा शब्दशः अर्थ पाहूया. येशू जे बोलला, ते त्याला खरोखरच म्हणायचे होते. त्याचे सर्वांत उत्तम उदाहरण तो स्वतःच आहे. त्याच्या गालावर केवळ चापट मारण्यात आली असे नाही, तर त्याला निर्दयपणे मारहाण करून क्रुसावरही टांगण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही.” म्हणून, जे करण्यास येशू स्वतः तयार नव्हता, असे काहीही करण्यास तो आपल्याला सांगत नाही.

दुसरा गाल पुढे करणे म्हणजे दुसऱ्याचे अपमानास्पद बोलणे किंवा छळ करणारी वागणूक झाकून ठेवणे नव्हे. त्यांनी काहीच चुकीचे केले नाही, असे सोंग आपण आणू नये. स्वतः क्षमा करताना आणि पित्यालाही त्यांना क्षमा करण्याची विनंती करताना, पापी लोकांनी आपल्यावर घोर अन्याय केला आहे, ही वस्तुस्थिती येशूने मान्य केली. पण महत्त्वाचे हे की, त्याने त्यांच्या दुष्टपणात स्वतःला ओढले जाऊ दिले नाही.

कोणी आपल्यावर चिखलफेक केली असे वाटले, तर अनेकदा त्याच्यावर उलट चिखलफेक करण्याचा मोह आपल्याला होतो. आपल्याला दटावणाऱ्याशी भांडून त्याला मागे हटवावेसे वाटते. पण दुसऱ्याच्या दुष्टपणावर आणि क्रूरतेवर मात करायची असेल, तर आपण त्या चिखलात उतरण्यास नकार दिला पाहिजे. दुसरा गाल पुढे करून आपण दाखवतो की, क्षुल्लक कुरबुरी आणि वादावादीत पडून आपण स्वतःची पातळी घसरू देणार नाही. कोणी अविवेकीपणे वागले, तर आपण त्याच्या वागण्याला तशाच रीतीने उत्तर देत नाही. उलट, जे घडले ते शांतपणे स्वीकारून आणि त्या व्यक्तीला क्षमा करून, तिच्या वागण्यातला दुष्टपणा तिला स्वतःला आणि इतरांनाही दिसू देण्याचा मार्ग आपण निवडतो.

याचा अर्थ असा नाही की, आपल्याला सहन होण्यापलीकडे छळ होत असलेल्या नात्यात आपण कायम राहावे, अशी येशूची इच्छा आहे. पण आपल्या सर्वांनाच अधूनमधून अन्यायाला सामोरे जावे लागेल. अशा वेळी आपण दयेने वागावे, लगेच क्षमा करावी आणि दुष्टपणाला दुष्टपणाने प्रत्युत्तर देण्याच्या मोहात पडू नये.

आज, ज्या नात्यांत तुम्हाला अडचणी येतात, त्यांवर चिंतन करा. विशेषतः, क्षमा करण्याची आणि दुसरा गाल पुढे करण्याची तुमची कितपत तयारी आहे, याचा विचार करा. असे केल्याने त्या नात्यात तुम्ही शोधत असलेली शांती आणि स्वातंत्र्य कदाचित तुम्हाला लाभेल.

हे प्रभू, तुझ्या अपार दयेचे आणि क्षमाशीलतेचे अनुकरण करण्यास मला मदत कर. ज्यांनी मला दुखावले आहे त्यांना क्षमा करण्यास आणि मला सहन करावा लागणाऱ्या कोणत्याही अन्यायावर मात करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनेचा कालावधी: 10-18 जून 2020
19 जून 2020: येशूच्या पवित्र हृदयाचा महोत्सव

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

चित्र: ‘काट्यांचा मुकुट घालण्याचा प्रसंग’ — कारावाज्यो