15 जून 2026
सामान्य काळातील अकराव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “ ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट माणसाला प्रतिकार करू नका… कोणी तुम्हाला त्याच्याबरोबर एक मैल जाण्याची सक्ती केली, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.” मत्तय 5:38–39, 41
“डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात” हे वचन मोशेच्या नियमशास्त्रातील जसास तसा प्रतिकार करण्याच्या नियमाचा संदर्भ देते (पाहा: निर्गम 21:23–25). मोशेने हा नियम घालून दिला, त्या काळी एखाद्याला इजा झाली की त्याचा सूड घेतला जाई आणि त्यातून हिंसा वाढतच जाई. हा नियम नैसर्गिक न्यायाचे एक रूप होता. त्याने अपराधाच्या प्रमाणातच प्रतिकार होईल याची खात्री केली आणि संघर्ष हाताबाहेर जाण्यापासून रोखले.
प्रतिशोधाच्या नियमाचा उद्देश अतिरेकी सूडाला आळा घालणे आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे हा होता. पण येशूने दाखवून दिले की खरा समेट आमूलाग्र दयेनेच घडतो. अमर्याद दया हा वैर मिटवण्याचा कितीतरी प्रभावी मार्ग आहे, कारण ती सूडाची साखळी मुळाशीच तोडते, असे त्याने शिकवले. येशूच्या येण्यापूर्वी आणि पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्यापूर्वी, या उच्चतर पाचारणाला आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आवश्यक ती कृपा मानवजातीला लाभली नव्हती. पण ख्रिस्तामध्ये त्याच्या अनुयायांना दैवी कृपेने सूडाचे चक्र तोडण्याचे सामर्थ्य मिळाले—प्रतिशोधाने नव्हे, तर दयेने.
समेटाचा हा उच्चतर मार्ग समजावून सांगण्यासाठी येशू एका रोमन कायद्याचा दाखला देतो. या कायद्यानुसार सैनिक यहुद्यांना आपले लष्करी सामान एक रोमन मैल वाहून नेण्याची सक्ती करू शकत असत. हे अंतर सुमारे 4,855 फूट होते, म्हणजे आजच्या मैलापेक्षा थोडे कमी. हा कायदा यहुद्यांसाठी अपमानास्पद होता. अनेकदा हातातले काम सोडून त्यांना आपल्यावर जुलूम करणाऱ्यांची सेवा करावी लागे. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास फारसा वाव नव्हता, त्यामुळे त्यांना आपल्या पारतंत्र्याची वेदनादायक जाणीव होत असे.
येशू या अन्यायाचे समर्थन करत नाही. उलट, कायदा जितके करायला लावतो त्याहून अधिक स्वेच्छेने करा, असे आपल्या अनुयायांना सांगून तो त्या प्रसंगाचे स्वरूप बदलतो. लादलेले ओझे नाखुशीने वाहण्याऐवजी त्यांनी ते काम स्वतःहून दुप्पट करावे—एका मैलाऐवजी दोन मैल जावे. अशा अनपेक्षित प्रतिसादाने रोमन सैनिक थक्क झाले असते. सक्तीने करावी लागणारी सेवा अशा रीतीने अनपेक्षित उदारतेचे कृत्य ठरले असते.
या आज्ञेचे शहाणपण ती देत असलेल्या स्वातंत्र्यात आहे. दुसऱ्याचे ओझे वाहणे हे मुळात वाईट नव्हते; वेदना अन्यायामुळे नव्हे, तर झालेल्या अपमानामुळे होत होती. ते ओझे स्वेच्छेने स्वीकारून—दुसरा मैल आनंदाने चालून—येशूचे अनुयायी दुखावलेल्या अभिमानावर आणि मनातील कटुतेवर मात करू शकले असते. केवळ अन्यायाचे बळी न राहता ते देवाच्या अशा दयेचे साक्षीदार झाले, जी कोणाच्या पात्रतेवर अवलंबून नसते. खरे सामर्थ्य प्रतिशोधात नव्हे, तर उदारतेत आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
न्यायाविषयीच्या या उच्चतर शिकवणीमागचे तत्त्व आपल्या जीवनात असंख्य प्रसंगी लागू होते. जेव्हा आपल्यावर अन्याय होतो किंवा आपल्याला अनुचित वागणूक मिळते, तेव्हा आपल्यापुढे एक निवड असते: आपण नैसर्गिक न्यायाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरू शकतो किंवा अलौकिक प्रीतीचा मार्ग निवडू शकतो. केवळ न्यायालाच धरून राहणारे लोक अनेकदा संताप, दोषारोप आणि कटुता यांच्या चक्रात अडकतात. पण इतरांची पात्रता न पाहता त्यांच्यावर भरभरून प्रीती करण्याचा मार्ग जे निवडतात, जे मनापासून क्षमा करतात आणि अपेक्षेपेक्षा अधिक करतात, त्यांना अंतःकरणात खोल स्वातंत्र्य अनुभवायला मिळते.
प्रीती मानवी विवेकाच्या विरुद्ध नाही; उलट, ती विवेकाच्या पलीकडे जाते, त्याला उंचावते आणि केवळ मानवी पातळीवरच्या न्यायाला दैवी स्वरूप देते. हे सत्य समजून घेण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आपल्याला ज्ञानाचे वरदान हवे. त्या वरदानामुळे आपण जीवनाकडे आपल्या मर्यादित दृष्टीने नव्हे, तर देवाच्या दृष्टीने पाहू शकतो. या दैवी ज्ञानामुळे जगाच्या अपेक्षेप्रमाणे नव्हे, तर ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे प्रतिसाद देणे आपल्याला शक्य होते. अशा रीतीने दयेच्या परिवर्तन घडवणाऱ्या सामर्थ्याने आपण सूडाची साखळी तोडतो.
आज तुमच्यावर कोणकोणत्या प्रकारे अन्याय झाला आहे, यावर चिंतन करा. कधी कधी अन्यायाची वेदना खरी असते आणि आपल्या बाबतीत चुकीचे घडले, हे नाकारता येत नाही. तरीही खरा प्रश्न आपल्याला वाईट वागणूक मिळाली का, हा नाही; आपण त्याला कसा प्रतिसाद देणार, हा आहे. येशू आपल्याला दुखावलेल्या अभिमानाच्या पलीकडे जाऊन, दयाळूपणे वागण्यास आणि समोरच्या व्यक्तीची पात्रता न पाहता उदारतेने प्रतिसाद देण्यास बोलावतो. हा उच्चतर मार्ग स्वीकारल्याने आपण कटुतेच्या बंधनातून मुक्त होतो आणि दैवी ज्ञानाने मिळणारे स्वातंत्र्य अनुभवतो.
हे परम उदार देवा, ज्या काटेकोर न्यायाचा मी अनेकदा आग्रह धरतो, त्याहून तुझी दया कितीतरी श्रेष्ठ आहे. मला ज्ञानाचे वरदान दे, म्हणजे दयेचे अमोल मूल्य मला उमजेल आणि माझ्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला सामोरे जाताना मी मुक्तपणे दया दाखवू शकेन. काय योग्य आहे याबद्दलच्या माझ्या स्वतःच्या समजुतीवर विसंबून न राहता, प्रीतीद्वारे खरा न्याय घडवून आणणाऱ्या तुझ्या दैवी इच्छेवर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





