सोमवार, 9 नोव्हेंबर 2020
रोममधील लातेरान बॅसिलिकाच्या समर्पणाचा सण

येशू यरुशलेमला गेला. मंदिराच्या आवारात बैल, मेंढरे आणि कबुतरे विकणारे लोक त्याला दिसले. नाणी बदलून देणारेही तिथे बसले होते. त्याने दोऱ्यांचा चाबूक बनवला आणि त्या सर्वांना मेंढरांसह व बैलांसह मंदिराच्या आवारातून हाकलून दिले. त्याने नाणी बदलून देणाऱ्यांची नाणी विखरून टाकली आणि त्यांची मेजे उलथून टाकली. कबुतरे विकणाऱ्यांना तो म्हणाला, “ही इथून घेऊन जा आणि माझ्या पित्याच्या घराचा बाजार करू नका.” योहान 2:13b-16
येशू किती संतापला होता! त्याने नाणी बदलून देणाऱ्यांना चाबकाने मंदिरातून हाकलून लावले आणि त्यांना खडसावत त्यांची मेजे उलथून टाकली. तो प्रसंग पाहणाऱ्यांवर केवढा परिणाम झाला असेल!
इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशूचा ‘संताप’ नेमका कशा प्रकारचा होता, हे समजून घेणे. आपण सहसा संतापाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या ताब्याबाहेर गेलेल्या आणि उलट आपल्यावरच ताबा मिळवणाऱ्या भावनेविषयी बोलत असतो. अशा रीतीने स्वतःवरचा ताबा गमावणे हे पाप आहे. पण येशूचा संताप तसा नव्हता.
येशू सर्व बाबतींत परिपूर्ण होता. त्यामुळे त्याचा संताप आणि आपल्याला नेहमी येणारा राग हे एकच समजण्याची चूक आपण करू नये. होय, त्यालाही ती भावना तीव्रतेने जाणवली; पण आपल्याला नेहमी येणाऱ्या रागापेक्षा ती वेगळी होती. त्याचा संताप त्याच्या परिपूर्ण प्रेमातून उद्भवला होता.
पापी माणसांवरचे प्रेम आणि त्यांनी पश्चात्ताप करून देवाकडे वळावे ही इच्छा, यांतून येशूच्या संतापाला प्रेरणा मिळाली. त्याचा संताप ते ज्या पापात गुरफटले होते त्या पापाविरुद्ध होता. त्याला दिसलेल्या अनिष्ट गोष्टीला त्याने जाणीवपूर्वक आणि निर्धाराने विरोध केला. होय, हा प्रसंग पाहणाऱ्यांना कदाचित धक्का बसला असेल; पण त्या परिस्थितीत त्यांना पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याचे आवाहन करण्याचा हा सर्वांत परिणामकारक मार्ग होता.
कधी कधी आपल्यालाही पापाविरुद्ध संताप वाटणे आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येईल. पण सावध राहा! येशूच्या या उदाहरणाचा आधार घेऊन स्वतःवरचा ताबा सुटण्याचे समर्थन करणे आणि क्रोधाच्या पापात पडणे आपल्याला फार सोपे जाते. येशूने दाखवलेल्या न्याय्य संतापामुळे मनात नेहमी शांती राहते आणि ज्यांना खडसावले आहे त्यांच्याविषयी प्रेमही टिकून राहते. त्यांना आपल्या पापाचा खरा पश्चात्ताप झाला आहे, हे जाणवताच क्षमा करण्याची तयारीही असते.
देवाला कधी कधी तुमच्या अंतःकरणात जो न्याय्य संताप जागवावासा वाटेल, त्यावर आज चिंतन करा. तो खरोखर न्याय्य आहे की नाही, हे पुन्हा एकदा काळजीपूर्वक ओळखा. या तीव्र भावनेने स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. त्याऐवजी, इतरांवरील देवाचे प्रेम तुमच्या कृतीची प्रेरणा होऊ द्या आणि पापाविषयीचा पवित्र तिटकारा तुम्हाला पवित्र व न्याय्य रीतीने वागण्यास मार्ग दाखवू दे.
हे प्रभू, माझ्या अंतःकरणात जो पवित्र आणि न्याय्य संताप असावा अशी तुझी इच्छा आहे, तो जोपासण्यास मला मदत कर. काय पापमय आहे आणि काय न्याय्य आहे, हे ओळखण्यास मला मदत कर. माझा हा संताप आणि माझ्या सर्व तीव्र भावना नेहमी तुझी पवित्र इच्छा पूर्ण करण्याकडे वळोत. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचा सण – लातेरान बॅसिलिकाचे समर्पण




