८ नोव्हेंबर २०२०
सामान्य काळातील बत्तिसावा रविवार, वर्ष अ
आजची वाचने

“म्हणून जागे राहा, कारण तुम्हाला तो दिवसही माहीत नाही आणि ती वेळही माहीत नाही.” मत्तय 25:13
या जगातून तुम्ही कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी निरोप घ्याल, हे तुम्हाला माहीत आहे, अशी कल्पना करा. अर्थात, आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे मृत्यू जवळ आला आहे, याची काहींना जाणीव असते. पण स्वतःच्या आयुष्याच्या संदर्भात याचा विचार करा. उद्याच तो दिवस आहे, असे येशूने तुम्हाला सांगितले तर? तुम्ही तयार आहात का?
बहुधा, आटोपायच्या अनेक व्यवहाराच्या गोष्टी तुमच्या मनात येतील. अनेक जण आपल्या सर्व प्रियजनांचा आणि याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार करतील. तूर्तास हे सगळे बाजूला ठेवा आणि फक्त एका दृष्टीने या प्रश्नाचा विचार करा: तुम्ही येशूला भेटायला तयार आहात का?
या जगातून निरोप घेतल्यावर एकच गोष्ट महत्त्वाची ठरेल: येशू तुम्हाला काय म्हणेल? वर उद्धृत केलेल्या शास्त्रवचनाच्या अगोदर येशू दहा कुमारींचा दाखला सांगतो. त्यांच्यापैकी काही शहाण्या होत्या आणि त्यांच्या दिव्यांसाठी त्यांच्याकडे तेल होते. वर रात्री उशिरा आला, तेव्हा त्या दिवे पेटवून त्याला भेटायला तयार होत्या आणि त्याने त्यांचे स्वागत केले. मूर्ख कुमारींची मात्र तयारी नव्हती आणि त्यांच्या दिव्यांसाठी त्यांच्याकडे तेलही नव्हते. वर आला तेव्हा त्याची भेट घेण्याची संधी त्यांनी गमावली आणि त्यांना हे शब्द ऐकावे लागले: “आमेन, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही” (मत्तय 25:12).
त्यांच्या दिव्यांत तेल असणे किंवा नसणे, हे त्यांच्या ठायी ख्रिस्ती प्रीती असण्याचे किंवा नसण्याचे प्रतीक आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी प्रभूला भेटण्यासाठी तयार राहायचे असेल, तर आपल्या जीवनात ख्रिस्ती प्रीती असली पाहिजे. प्रीती म्हणजे केवळ प्रेमाची उत्कट भावना नव्हे. ख्रिस्ताच्या हृदयाने इतरांवर प्रेम करण्याची संपूर्ण बांधिलकी म्हणजे प्रीती. इतरांना प्राधान्य देण्याची निवड करून आणि येशू आपल्याला जे काही द्यायला सांगतो ते सर्व त्यांना देऊन, आपण ही सवय रोजच्या जीवनात लावून घेतो. कधी त्यासाठी एखादा छोटासा त्याग करावा लागेल, तर कधी मोठे धैर्य दाखवून क्षमा करावी लागेल. प्रसंग कोणताही असो, आपल्या प्रभूच्या भेटीसाठी तयार राहायला ही प्रीती आपल्याला आवश्यक आहे.
तुमच्या जीवनात ज्या व्यक्तींवर तुम्ही प्रेम करावे असे देवाला वाटते, त्यांच्याविषयी आज चिंतन करा. तुम्ही त्यांच्यावर किती चांगल्या रीतीने प्रेम करता? या प्रेमाशी तुमची बांधिलकी किती पूर्ण आहे? त्यांच्यासाठी तुम्ही किती दूरवर जायला तयार आहात? प्रीतीच्या या देणगीची उणीव तुम्हाला जिथे जाणवते, तिकडे लक्ष द्या आणि प्रभूकडे त्याच्या कृपेची कळकळीने याचना करा. म्हणजे तुम्हीही शहाणपणाने वागाल आणि कोणत्याही वेळी प्रभूला भेटायला तयार असाल.
हे प्रभू, माझ्या जीवनात ख्रिस्ती प्रीतीचे अलौकिक दान मला लाभावे, अशी मी प्रार्थना करतो. माझे हृदय इतरांबद्दलच्या प्रेमाने भरून टाक आणि हे प्रेम उदार मनाने देण्यास मला मदत कर. यांत मी काहीही राखून ठेवू नये, म्हणजे तू मला आपल्या घरी बोलावशील तेव्हा तुला भेटण्यासाठी मी पूर्णपणे तयार असेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
वरील चित्र: फिबी अॅना ट्रॅक्वेअर यांचे दहा कुमारींचा दाखला (चित्राचा एक भाग)



