३ फेब्रुवारी २०२१
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने
संत ब्लेझ, बिशप व रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरण
संत अन्सगार, बिशप — ऐच्छिक स्मरण

“हा तो सुतार नाही काय? हा मरियेचा मुलगा आणि याकोब, योसेफ, यहूदा व शिमोन यांचा भाऊ नाही काय? आणि त्याच्या बहिणी इथे आपल्यामध्ये नाहीत काय?” आणि त्यांना त्याच्यामुळे ठेच लागली. मार्क 6:3
गावोगावी फिरून चमत्कार केल्यानंतर, जमलेल्या लोकांना शिकवल्यानंतर आणि अनेक अनुयायी मिळवल्यानंतर, येशू जिथे लहानाचा मोठा झाला त्या नाझरेथला परतला. येशूबरोबर त्याच्या गावी परतताना त्याच्या शिष्यांना कदाचित उत्साह वाटला असेल. येशूच्या चमत्कारांविषयी आणि तो अधिकाराने देत असलेल्या शिकवणीविषयी इतक्या गोष्टी लोकांच्या कानावर गेल्या होत्या की, त्याला पुन्हा पाहून त्याच्या गावकऱ्यांना खूप आनंद होईल, असे शिष्यांना वाटले असेल. पण लवकरच त्यांना मोठे आश्चर्य वाटणार होते.
नाझरेथला पोहोचल्यावर येशू शिकवण्यासाठी सभास्थानात गेला. तो इतक्या अधिकाराने आणि सुज्ञतेने शिकवत होता की गावकरी चकित झाले. ते एकमेकांना म्हणाले, “याला हे सगळे कुठून मिळाले? याला देण्यात आलेले हे ज्ञान कसले?” येशू त्यांच्या ओळखीचा असल्यामुळे ते बुचकळ्यात पडले. तो त्यांच्याच गावचा सुतार होता. त्याचे वडीलही सुतार होते आणि त्यांच्याबरोबर त्याने कित्येक वर्षे काम केले होते. तो मरियेचा मुलगा होता, आणि त्याच्या इतर नातेवाइकांची नावेही त्यांना माहीत होती.
येशूच्या गावकऱ्यांची मुख्य अडचण हीच होती की येशू त्यांच्या अगदी ओळखीचा होता. ते त्याला ओळखत होते. तो कुठे राहत होता हे त्यांना माहीत होते. त्यांनी त्याला लहानाचा मोठा होताना पाहिले होते. ते त्याच्या कुटुंबालाही ओळखत होते. त्याच्याविषयी त्यांना सगळे काही माहीत होते. त्यामुळे त्याच्यात असे काही विशेष कसे असू शकते, असा प्रश्न त्यांना पडला. आता तो इतक्या अधिकाराने कसा शिकवू शकतो? आता तो चमत्कार कसे करू शकतो? ते थक्क झाले खरे, पण त्या आश्चर्याचे रूपांतर शंकेत झाले; ते त्याच्याविषयी निवाडा करू लागले आणि त्याच्यावर टीका करू लागले.
आपल्या लक्षात येते त्यापेक्षा जास्त वेळा आपल्यालाही अशाच मोहाला सामोरे जावे लागते. आपल्या चांगल्या ओळखीच्या व्यक्तीचे कौतुक करण्यापेक्षा एखाद्या अनोळखी व्यक्तीचे दुरून कौतुक करणे अनेकदा सोपे असते. कोणी प्रशंसनीय काम करत आहे असे आपण पहिल्यांदाच ऐकतो, तेव्हा इतरांबरोबर त्या व्यक्तीचे कौतुक करणे आपल्याला सहज जमते. पण आपल्या चांगल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीविषयी चांगली बातमी ऐकली, तर आपल्याला सहज हेवा किंवा मत्सर वाटू शकतो; आपण त्याविषयी शंका घेण्याच्या, इतकेच नव्हे तर टीका करण्याच्याही मोहात पडू शकतो. पण खरे पाहता, प्रत्येक संताला एक कुटुंब असते. आणि प्रत्येक कुटुंबात असे भाऊ-बहीण, चुलत, मावस, मामे किंवा आते भावंडे आणि इतर नातेवाईक असू शकतात, ज्यांच्याद्वारे देव मोठी कार्ये करील. याचे आपल्याला आश्चर्य वाटण्याऐवजी यातून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी! आणि आपला चांगुलपणाने परिपूर्ण देव आपल्या जवळच्या, चांगल्या ओळखीच्या व्यक्तींद्वारे सामर्थ्याने कार्य करतो, तेव्हा आपण आनंद मानायला हवा.
आज आपल्या जीवनातील परिचित व्यक्तींचा, विशेषतः आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा, विचार करा. वरवर दिसणाऱ्या गोष्टींपलीकडे पाहणे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात देव वास करतो हे स्वीकारणे तुम्हाला कठीण जाते का, हे स्वतःला विचारा. आपल्या सभोवती सर्वत्र, विशेषतः आपल्या अगदी जवळच्या ओळखीच्या व्यक्तींच्या जीवनात, देवाची उपस्थिती शोधण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे.
हे माझ्या सदैव उपस्थित असलेल्या प्रभू, माझ्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात तू असंख्य प्रकारे उपस्थित आहेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझ्या सर्वांत जवळच्या व्यक्तींच्या जीवनात तुला पाहण्याची आणि तुझ्यावर प्रेम करण्याची कृपा मला दे. त्यांच्या जीवनात तुझी गौरवमय उपस्थिती मला जाणवत असताना माझे अंतःकरण गाढ कृतज्ञतेने भरून टाक. त्यांच्या जीवनातून प्रकट होणारे तुझे प्रेम ओळखण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत ब्लेझ, बिशप आणि धर्मसाक्षी
वर दिलेले चित्र: सभास्थानात येशू ग्रंथाची गुंडाळी उलगडतो — जेम्स तिसो यांचे चित्र




