20 फेब्रुवारी 2021
राखेच्या बुधवारनंतरचा शनिवार
आजची वाचने

व्हिडिओ आवृत्ती
कर वसूल करणारा लेवी नावाचा एक मनुष्य जकात नाक्यावर बसलेला येशूने पाहिला. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी सर्व काही मागे सोडून उठला आणि येशूच्या मागे गेला. लूक 5:27–28
लेवीचे आयुष्य सुखात चालले होते. कर वसूल करण्याचे त्याचे काम स्थिर होते आणि त्यातून त्याला चांगली कमाई होत होती. पण येशूच्या मागे जाण्यासाठी त्याने क्षणात ते सगळे सोडून दिले आणि त्याच्या आयुष्याला लगेचच चांगले वळण लागले.
येशूने लेवीला दिलेल्या पाचारणाची ही छोटीशी कथा आपण लक्षात घ्यायला हवी. तुम्ही ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा निर्णय बहुधा आधीच घेतला असेल, तरी त्या निर्णयाशी असलेली तुमची बांधिलकी दिवसेंदिवस अधिक दृढ व्हायला हवी. त्यासाठी लेवीच्या उदाहरणातून प्रेरणा घ्या.
देव आपल्याला त्याच्याशी अधिक गाढ नाते जोडायला आणि त्याच्या अधिक जवळ यायला बोलावत आहे, आपण अधिक पूर्णपणे त्याचे अनुसरण करावे अशी त्याची इच्छा आहे, असे जेव्हा आपल्याला जाणवते, तेव्हा अनेकदा आपण थबकतो आणि कचरतो. श्रद्धेने पाऊल टाकण्याआधी अशा निर्णयाचा नीट विचार करावा आणि त्याचे “फायदे-तोटे” तोलून पाहावेत, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण तसे करू नका. बाकीचे सर्व काही मागे सोडून ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा निर्णय लेवीने क्षणाचाही विलंब न लावता घेतला. त्याचे उदाहरण आपल्याला तसेच करण्याचे आमंत्रण देते.
लेवीने जसा आमूलाग्र निर्णय घेतला, तसा निर्णय घ्यायला आज येशू तुम्हाला कशा प्रकारे आमंत्रण देत आहे? प्रेमाने आणि पूर्ण समर्पणाने त्याची अधिक परिपूर्ण सेवा करता यावी म्हणून तो तुम्हाला काय सोडून द्यायला सांगत आहे? या प्रश्नाचे उत्तर माहीत नसले, तरी आपल्या प्रभूला “हो” म्हणा. त्याला सांगा की तुम्हाला लेवीचे अनुकरण करायचे आहे आणि त्याच्या पवित्र इच्छेप्रमाणे पूर्णपणे, कोणतीही तडजोड न करता जगण्यासाठी मनापासून स्वतःला वचनबद्ध करायचे आहे.
आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे: येशूच्या मागे जाण्याचा निर्णय घेतल्याबरोबर लेवीने येशूसाठी आणि इतर कर वसूल करणाऱ्यांसाठी आपल्या घरी जेवणाचा बेत केला. आपला निर्णय इतरांना कळू देण्याची त्याला भीती वाटली नाही. आपल्या मित्रांनाही येशूच्या मागे जाण्याचा निर्णय घेण्याची संधी मिळावी, अशी त्याची इच्छा होती.
आज लेवी आणि त्याला मिळालेले पाचारण यांवर चिंतन करा. प्रायश्चित्तकाळाच्या या सुरुवातीला लेवीला मिळालेले पाचारण आणि त्याने दिलेला प्रतिसाद यांवर विचार करताना, येशू तुम्हालाही बोलावत आहे, ही त्याची हाक ऐका. शब्दशः “सर्व काही मागे सोडण्याचे” पाचारण तुम्हाला नसेलही, तरी तसे करण्याची आपली तयारी प्रभूला सांगा. आपल्या प्रभूचे अनुसरण करण्याच्या निर्णयाला कोणतीही अट घालू नका. असे केल्याबद्दल तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल.
हे माझ्या प्रिय प्रभू, तू आपल्या सर्व लेकरांना काहीही राखून न ठेवता तुझ्यामागे येण्यास बोलावतोस. याहून कितीतरी अधिक मिळावे म्हणून या जीवनात जे काही मिळू शकते ते सर्व सोडून देण्याची मनापासून तयारी ठेवायला तू आम्हाला बोलावतोस. आज, उद्या आणि दर दिवशी तुला “हो” म्हणता येईल इतका तुझ्यावर विश्वास ठेवण्याची कृपा मला दे. प्रिय प्रभू, माझे जीवन तुझे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे माझे कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रूसाच्या पायथ्याशी 40 दिवस – तिसरे चिंतन – देवमातेच्या मनातील विचार
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने
वरील चित्र: जोवानी पाओलो पानिनी यांचे ‘संत मत्तय यांचे पाचारण’





