मराठी

चांगल्या हेतूंपलीकडे

10 ऑक्टोबर 2021
सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार, वर्ष ब
आजची वाचने

व्हिडिओ

येशू प्रवासाला निघत असताना एक मनुष्य धावत आला, त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने विचारले, “उत्तम गुरू, सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे?”  मार्क 10:17

या कथेची सुरुवात आशादायक वाटते.  एक अतिशय श्रीमंत तरुण श्रद्धेतून उद्भवलेला प्रश्न घेऊन येशूकडे येतो.  सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हे त्याने येशूला विचारले. यावरून असे वाटते की येशूकडे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे, असा त्याचा विश्वास असावा.  मोठ्या उत्साहाने तो येशूकडून मार्गदर्शन मागत होता.

येशू त्याला सांगतो की त्याने आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्यावर तो तरुण उत्तर देतो की त्याने लहानपणापासून त्या पाळल्या आहेत.  पण मग येशू असे काही सांगतो की ते ऐकण्याची त्या तरुणाला मुळीच अपेक्षा नव्हती.  तो म्हणतो, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याकडे जे आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये आणि माझ्यामागे चाल.”  किती बोचरे शब्द!  हे शब्द त्या श्रीमंत तरुणाच्या जिव्हारी लागले असतील.  या उताऱ्यात पुढे सांगितले आहे की येशूचे हे बोलणे ऐकून तो तरुण दुःखी होऊन निघून गेला.

त्या तरुणाचा सुरुवातीचा हेतू चांगला होता, हे स्पष्ट आहे.  पण चांगले हेतू पुरेसे नाहीत.  येशूचे अनुसरण करण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग त्याला निःशेषपणे समर्पित करावा लागतो.  ‘आम्ही आज्ञा पाळू, पण तेवढेच,’ असे येशूला सांगणे पुरेसे नाही.  एवढ्याने कदाचित आपल्याला शुद्धिस्थानात प्रवेश मिळेल, पण आपली इच्छा स्वर्गात जाण्याची असली पाहिजे!  मग स्वर्गप्राप्ती कशी होते?

परिपूर्ण जीवन जगण्यानेच आपल्याला स्वर्गप्राप्ती होते.  होय, हे खरे आहे.  आपल्याला स्वर्गप्राप्ती हवी असेल, तर शेवटी आपण सर्व बाबतींत परिपूर्ण झाले पाहिजे.  सांसारिक गोष्टींची प्रत्येक आसक्ती नाहीशी झाली पाहिजे आणि प्रत्येक पापावर मात केली पाहिजे.  आपले चांगले हेतू स्वतःला पूर्णपणे आणि काहीही राखून न ठेवता येशूला अर्पण करण्यात उतरले पाहिजेत. आपण त्याचाच, केवळ त्याचाच, शोध घेतला पाहिजे.

तो श्रीमंत तरुण दुःखी होऊन निघून गेला, कारण आपल्याजवळचे सर्व काही देऊन टाकण्याचे येशूचे आमंत्रण ही खरे तर प्रेमाची कृती होती, हे त्याला उमगले नाही.  ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी असे संपूर्ण समर्पण केल्याने आपल्याला आनंद मिळेल, हे त्याला समजले नाही.

तुमच्या जीवनात येशू तुम्हाला संपूर्ण समर्पणासाठी जी हाक देतो, तिच्यावर आज चिंतन करा.  त्याला तुमच्या जीवनाचा प्रत्येक भाग हवा आहे.  चांगले वागण्याचा प्रयत्न करण्याचा तुमचा हेतू असेल, पण कोणतीही मर्यादा न घालता, पूर्णपणे ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास तुम्ही तयार आहात का?

हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्यावर आणखी प्रेम करायचे आहे.  मला माझ्या संपूर्ण अस्तित्वाने तुझ्यावर प्रेम करायचे आहे.  तुझे अनुसरण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे आणि काहीही राखून न ठेवता तुला अर्पण करणे आवश्यक आहे, हे मला उमगू दे.  माझ्या जीवनात तुझे अनुसरण करण्याच्या आड येणारी कोणतीही आसक्ती सोडून देण्याची इच्छा आणि तयारी माझ्यात असू दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: ‘ख्रिस्त आणि श्रीमंत तरुण’ — चित्रकार: बार्थोलोमेउस ब्रेनबर्ख, विकिमीडिया कॉमन्सवरून