मराठी

शोकांतिकेतून गौरवाकडे

मंगळवार, 28 डिसेंबर 2021
पवित्र निष्पाप बाल शहीदांचा सण
नाताळच्या अष्टकातील चौथा दिवस
आजची वाचने

व्हिडिओ

ज्ञानी पुरुषांनी आपल्याला फसवले आहे, हे हेरोदाच्या लक्षात आले तेव्हा तो संतापला. ज्ञानी पुरुषांकडून त्याने जी वेळ जाणून घेतली होती, तिच्या हिशोबाने बेथलेहेम आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील दोन वर्षे व त्याहून कमी वयाच्या सर्व मुलांची कत्तल करण्याचा त्याने हुकूम दिला. मत्तय 2:16

आज नाताळच्या अष्टकाच्या चौथ्या दिवशी आपल्याला अशी साक्ष मिळते, जशी 26 डिसेंबरला संत स्टीफन यांच्या हौतात्म्याच्या सणाच्या दिवशी मिळाली होती. पण आजचा सण त्याच दुष्टपणाचे एक वेगळे, अधिक दुःखद रूप आपल्यासमोर आणतो. मत्सर आणि द्वेषापोटी हेरोदाने नवजात राजा येशूचा जीव घेण्याच्या प्रयत्नात असंख्य निष्पाप बालकांना ठार मारवले.

आईवडील असहायपणे पाहत राहिले आणि सैनिक त्या निष्पाप बालकांना ठार मारत फिरले. त्या वेळी बेथलेहेम नगरात आणि आसपासच्या परिसरात किती दुःख पसरले असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. एकीकडे, देवाने हे घडू दिले, ही गोष्ट धक्कादायक आहे. दुसरीकडे, गाढ श्रद्धेने या निष्पाप बालकांनी दिलेली साक्ष समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

हा वर्णनापलीकडचा क्रूर आणि दुष्ट अपराध होता. तरीही अनंतकाळाच्या दृष्टीने पाहता, देव या अन्यायाचा निपटारा करील. स्वर्गात या निष्पाप बळींच्या मस्तकी हौतात्म्याचा मुकुट सदासर्वकाळ असेल. नवजात राजाचे पहिले साक्षीदार म्हणून देवदूत आणि संत त्यांचा सन्मान करतील. या गोष्टीने त्या वेळी त्या कुटुंबांचे दुःख कमी झाले नसेल, तरी स्वर्गात त्यांना न्याय मिळेल तेव्हा त्यांनी सोसलेल्या दुःखाचे स्वरूप नक्कीच बदलेल.

त्यांची साक्ष आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी बरेच काही शिकवते. जीवनात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या मुळीच योग्य नसतात, न्याय्यही नसतात, हे ती आपल्याला दाखवते. या निष्पाप बालकांची कत्तल या सत्याची तीव्र जाणीव करून देते. पण एक गोष्ट आपण पक्की धरून ठेवली पाहिजे: शेवटी देव प्रत्येक अन्याय दूर करून न्याय प्रस्थापित करील. देवाने या शोकांतिकेचे रूपांतर एका गौरवशाली घटनेत केले आहे, हे व्यक्त करण्यासाठी आज आपण या बालकांच्या सन्मानार्थ हा सण भक्तिभावाने साजरा करतो.

हेच आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत खरे आहे. तुमची ‘शोकांतिका’ कोणतीही असो, हे लक्षात ठेवा: सर्व काही नीट करण्यासाठी देवाच्या पुत्राने आपला पतित मानवी स्वभाव धारण करून आपल्या जगात प्रवेश केला.

या नाताळच्या काळात तुम्हाला सर्वांत जास्त वेदना कशामुळे होत आहेत, यावर आज चिंतन करा. कारण काहीही असो, आज आपल्या जखमा आणि वेदना त्या चिमुकल्यांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखाशी जोडण्याचे आमंत्रण तुम्हाला आहे. देवाने अखेरीस त्या सर्वांसाठी जे केले, ते तुमच्यासाठीही त्याला करू द्या. त्याच्या देहधारणेने, मृत्यूने आणि पुनरुत्थानाने तुमच्या वेदनेचे रूपांतर हौतात्म्याच्या मुकुटात होऊ द्या. तुम्ही प्रभूला तुमच्या जीवनात कार्य करू दिले, तर शेवटी तो तुमच्या जीवनात विजयी होईल.

हे प्रभू, माझ्या सर्व जखमा, वेदना आणि मनाचा गोंधळ मी तुझ्या हाती सोपवतो.  ही लहान मुले ज्यांनी गमावली, त्यांच्या दुःखात आज मी सहभागी होतो. ही बालके आता स्वर्गात तुझ्याबरोबर राज्य करीत आहेत आणि त्यांचे जीवन हे पुढे जे घडणार आहे त्याचे माझ्यासाठी चिन्ह आहे, असा मला विश्वास आहे.  तू आमच्या जगात जन्म घेतलास, हेच तू आमचा तारणारा आहेस आणि सर्व गोष्टींतून तू चांगले घडवू शकतोस याचे सर्वांत मोठे चिन्ह होते.  हे येशू, मी माझे जीवन तुझ्या हाती सोपवतो. जे काही चुकीचे आहे ते सर्व तू दुरुस्त करशील, हे मला ठाऊक आहे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

नाताळसाठीचे आमचे साहित्य पाहा!

पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचा सण – पवित्र निष्पाप बाल शहीद

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

नाताळची प्रार्थना

वरील ठळक चित्र: निष्पाप बालकांची कत्तल — चित्रकार: दुच्चो दी बुओनिन्सेन्या, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने