बुधवार, 29 डिसेंबर 2021
नाताळच्या अष्टकाचा पाचवा दिवस
आजची वाचने
संत थॉमस बेकेट, बिशप आणि रक्तसाक्षी—ऐच्छिक स्मृतिदिन

“प्रभू, आता आपल्या सेवकाला शांतीने जाऊ दे; तुझे वचन पूर्ण झाले आहे. कारण तू सर्व लोकांदेखत सिद्ध केलेले तारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. ते राष्ट्रांना तुझी ओळख करून देणारा प्रकाश आणि तुझ्या इस्राएल प्रजेचा गौरव आहे.” लूक 2:29–32
आज, नाताळच्या अष्टकाच्या पाचव्या दिवशी, शिमोन संदेष्ट्याची साक्ष आपल्यासमोर येते. देवाने या पवित्र पुरुषाला वैयक्तिक प्रकटीकरणाद्वारे वचन दिले होते की तो जगाच्या तारणाऱ्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहील. आयुष्यभर त्याने या क्षणाची वाट पाहिली असेल. तो क्षण यावा अशी त्याला उत्कंठा होती आणि तो येईल अशी आशाही त्याने बाळगली होती. आणि मग एके दिवशी तो क्षण आला. त्या दिवशी शिमोन नेहमीप्रमाणे उठून आपल्या नित्याच्या कामाला लागला असेल. पण मरिया आणि योसेफ यांनी आपल्या नवजात बाळाला मंदिरात आणले, त्या क्षणी शिमोनाने अंतःकरणात ओळखले की हेच ते बाळ, देवाने वचन दिलेला तारणारा.
त्याचे शब्द किती प्रभावी आहेत! तो म्हणतो, “प्रभू, आता तू आपल्या सेवकाला शांतीने जाऊ देऊ शकतोस… कारण तू सिद्ध केलेले तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे…” म्हणजेच, आपले जीवन आता कृतार्थ झाले आहे, हे शिमोनाला उमगले. ख्रिस्ताला प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे तो आता मृत्यूला सामोरा जाण्यास तयार होता. त्याने येशूला आपल्या कुशीत घेतले आणि त्या क्षणासाठी पित्याचा गौरव केला.
पवित्र शिमोनाकडून शिकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण काही दोन हजार वर्षांपूर्वी मंदिरात असलेला शिमोन संदेष्टा नाही; तरीही दररोज अनेक प्रकारे ख्रिस्ताला पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभते. शिमोनाने कुशीत घेतलेले बाळ खरोखर देवच होते. पण त्याचे देवत्व एका लहान बाळाच्या देहाआड दडलेले होते. तरीही शिमोनाने त्याचे खरे स्वरूप ओळखले आणि तो आनंदित झाला.
आपल्या सभोवताली तारणाऱ्याची उपस्थिती ओळखण्याचा आणि शिमोनासारखाच आनंद अनुभवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. देवाला अर्पण केलेल्या प्रत्येक हृदयात, ख्रिस्तसभेच्या प्रत्येक संस्कारात आणि पवित्र शास्त्राच्या प्रत्येक वाचनात ख्रिस्त उपस्थित असतो. विशेषतः तो आपल्या हृदयात उपस्थित असतो. आपले हृदय असे मंदिर झाले पाहिजे, जिथे आपल्याला बाळ ख्रिस्ताची उपस्थिती जाणवेल. तो आपल्या किती जवळ आहे याचा आनंद मानत आपण त्याला आपल्या जीवनात सामावून घेतले पाहिजे.
आज त्या प्रसंगावर चिंतन करा: शिमोन बाळाला आपल्या कुशीत घेतो आणि त्या तान्ह्या बाळाच्या हाडामांसाच्या देहाआड त्याला तारणारा दिसतो. शिमोनाने जसा ख्रिस्ताचा शोध घेतला, तसाच तुम्हीही घ्या आणि तो किती वेगवेगळ्या प्रकारे तुमच्याजवळ उपस्थित आहे, यावर मनन करा. तो तुमच्या जवळ आहे आणि तुमचे जीवन आपल्या शांतीने भरून टाकण्याची त्याची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा.
प्रभू, शिमोन संदेष्ट्याच्या थोर साक्षीबद्दल मी तुझे आभार मानतो. शिमोनाला लहान बाळाच्या रूपात तुझे दर्शन घडवून तू त्याला दिलेले वचन पाळलेस, त्याबद्दल तुझे आभार. त्याच्या दृढ श्रद्धेचे मी सदैव अनुकरण करावे आणि आयुष्यभर तुझा शोध घ्यावा. तू माझ्याकडे अशा रूपांत येशील की त्यांत तुला सहज ओळखता येणार नाही; तरीही मी तुझी वाट पाहावी, जेणेकरून तुझ्या उपस्थितीत माझे हृदय आनंदित होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
नाताळसाठीचे आमचे साहित्य पाहा!
आजचे संत – संत थॉमस बेकेट, बिशप आणि रक्तसाक्षी
हेही पाहा: दुःखाची तलवार




