मराठी

आपले जीवनकार्य पूर्ण करणे

बुधवार, 2 फेब्रुवारी 2022
प्रभूच्या मंदिरार्पणाचा सण

आजची वाचने

व्हिडिओ

“हे स्वामी, आता तुझ्या वचनाप्रमाणे तू आपल्या सेवकाला शांतीने जाऊ देऊ शकतोस. कारण तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केलेले तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. हे तारण म्हणजे परराष्ट्रीयांना देवाचा उलगडा करून देणारा प्रकाश आणि तुझ्या इस्राएल लोकांचे गौरव आहे.” लूक 2:29-32

मरिया आणि योसेफ यांनी येशूला मंदिरात आणून प्रभूला अर्पण केले, त्या गौरवशाली घटनेचा सण आज आपण साजरा करतो. शिमोन हा “नीतिमान आणि भक्तिमान” मनुष्य आयुष्यभर या क्षणाची वाट पाहत होता. तो क्षण अखेर आला, तेव्हा शिमोनाच्या मुखातून वर दिलेले शब्द उमटले.

हे गहन उद्गार नम्र आणि श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणातून आले. शिमोनाला जणू असे म्हणायचे होते: “हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, आता माझे जीवन परिपूर्ण झाले आहे. मी त्याला पाहिले आहे. मी त्याला माझ्या कुशीत घेतले आहे. तो हाच आहे. हाच मशीहा आहे. आता जीवनात मला आणखी कशाचीही गरज नाही. माझ्या जीवनाची सार्थकता झाली आहे. आता मी मरण्यास तयार आहे. माझ्या जीवनाचा हेतू साध्य झाला आहे; माझे जीवन पूर्णत्वाला पोहोचले आहे.”

इतर कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे शिमोनालाही आयुष्यात अनेक अनुभव आले असतील. त्याच्याही अनेक आकांक्षा आणि ध्येये असतील. अनेक गोष्टींसाठी त्याने खूप कष्ट घेतले असतील. त्यामुळे आता आपण “शांतीने जाऊ” शकतो, या त्याच्या शब्दांचा अर्थ एवढाच की त्याच्या जीवनाचा हेतू साध्य झाला होता आणि त्याने ज्यासाठी इतके कष्ट व प्रयत्न केले होते, ते सारे या क्षणी पूर्णत्वाला पोहोचले होते.

या शब्दांना किती मोठा अर्थ आहे! शिमोनाची ही साक्ष आपल्या दैनंदिन जीवनासाठी मोलाची आहे. आपण कशासाठी प्रयत्न करावेत, याचा आदर्श त्याने आपल्यासमोर ठेवला आहे. शिमोनाच्या या अनुभवातून आपल्याला दिसते की ख्रिस्ताला भेटणे आणि देवाच्या योजनेनुसार आपल्या जीवनाचा हेतू साध्य करणे, हे आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. श्रद्धेच्या देणगीतून शिमोनाला त्याच्या जीवनाचा हेतू उलगडला: बाल येशूला समर्पणासाठी मंदिरात आणले जाईल, तेव्हा त्याचा स्वीकार करणे आणि नंतर नियमशास्त्रानुसार त्या बालकाला पित्याला समर्पित करणे.

तुमच्या जीवनातील कार्य कोणते आणि तुमच्या जीवनाचा हेतू काय आहे? तो शिमोनाच्या जीवनाच्या हेतूसारखाच नसेल, पण दोघांत काही साम्य असेल. देवाची तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे; ती तो तुम्हाला श्रद्धेतून उलगडून दाखवेल. शेवटी, या पाचारणाचा आणि जीवनाच्या हेतूचा गाभा हाच आहे: तुम्ही आपल्या हृदयाच्या मंदिरात ख्रिस्ताचा स्वीकार करावा आणि सर्वांना दिसेल अशा रीतीने त्याची स्तुती व आराधना करावी. तुमच्या जीवनासाठी देवाची जी इच्छा आहे, तिच्यानुसार तुमच्या पाचारणाला एक आगळे रूप मिळेल. तरीही ते शिमोनाच्या पाचारणाइतकेच अर्थपूर्ण आणि महत्त्वाचे असेल व जगाच्या तारणासाठी असलेल्या देवाच्या संपूर्ण योजनेचा अविभाज्य भाग असेल.

आज तुमच्या स्वतःच्या पाचारणावर आणि जीवनातील कार्यावर चिंतन करा. देवाच्या हाकेकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यावर सोपवलेले कार्य हातचे जाऊ देऊ नका. देवाची योजना जशी उलगडत जाईल, तसे श्रद्धेने त्याचे ऐकत राहा, त्याच्या पुढील मार्गदर्शनाची वाट पाहा आणि त्यानुसार कृती करा. म्हणजे एके दिवशी तुम्हीही आपले पाचारण पूर्ण झाले आहे, या खात्रीने आनंद करू शकाल आणि “शांतीने जाऊ” शकाल.

हे प्रभू, मी तुझा सेवक आहे. तुझी इच्छा काय आहे, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. श्रद्धेने आणि खुल्या मनाने तुला प्रतिसाद द्यायला आणि तुला “होय” म्हणायला मला मदत कर, जेणेकरून ज्या हेतूने तू मला घडवलेस तो हेतू माझ्या जीवनात पूर्ण होईल. सिमेओनने दिलेल्या साक्षीबद्दल मी तुझे आभार मानतो. माझेही जीवन सार्थकी लागल्याचा आनंद मला एके दिवशी लाभो, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

सर्व संत / सण

अधिक वाचन – प्रभूचे मंदिरातील समर्पण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

इतर ब्लॉग आणि चिंतने

वरील मुख्य चित्र: ख्रिस्ताचे मंदिरार्पण — चित्रकार जिओट्टो, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने